Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिककोलाजPandav leni : पांडवलेणी

Pandav leni : पांडवलेणी

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्राला एक प्रचंड असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी येथे आणि अशाच ठिकाणी शैक्षणिक सहली आयोजित करण्याची आवश्यकता आहे.

अलीकडेच नाशिकमध्ये जाण्याचा योग आला तेव्हा सर्व मित्र-मैत्रिणींना घेऊन सकाळी ‘पांडवलेणी’ला भेट देण्याचे ठरवले. नाशिकमधला सुखद गारवा आणि निसर्गरम्य असा पांडवलेणीचा परिसर. काही वर्षांपूर्वी असे सकाळी पुण्यात असताना पर्वतीवर जाण्याचा योग आला होता, साताऱ्यात असताना शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा योग आला होता, त्याची आठवण झाली. अशा ठिकाणी पहाटेपासून सूर्य उगवेपर्यंत मोठ्या प्रमाणात त्या त्या भागातली माणसे व्यायामाच्या दृष्टीने असे डोंगर चढतात-उतरतात शुद्ध हवेचा साठा दिवसभरासाठी करून ठेवतात. सकाळच्या वेळेस अति उत्साहाने काही माणसे पायऱ्यांवरून वर चढून जात होते, तर काही ट्रेकिंग करत डोंगरावरील पायवाटेवरून वर चढत होते. एकमेकांना नमस्कार करत होते किंवा ओळखीचे हसत होते, तर क्वचित गप्पा मारत चाललेले होते. सवयीने डोंगर चढताना पर्यटकांकडे आणि त्यांच्या फोटो काढत चालण्याच्या कृतीकडे कौतुकाने पाहत होते.

खरे तर जाण्याआधीच या ऐतिहासिक ठिकाणाची माहिती घेऊन जायला हवे होते. पण तेथून उतरल्यावर त्याविषयीची माहिती घेतली. महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील ‘त्रिरश्मी लेणी’ ही नाशिकमधील लेणी आहेत. त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केले आहे. सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले, असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो.

नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. नाशिकचा उल्लेख शिलालेखांतून वाचायला मिळतो. असे काही वाचल्यावर आपण स्वाभाविकपणे अधिकची माहिती शोधत राहतो. ‘त्रिरश्मी बौद्ध लेणी’ म्हणजे नेमके काय? इतर लेण्यांपेक्षा येथे काय वेगळेपण आहे? पांडवांनी येथे वास केला होता का? ते असतानाच इथे लेण्या खोदल्या गेल्या की त्यांच्या आठवणींसाठी नंतर खोदल्या गेल्या? ते लेण्यांमध्ये राहत असताना कोणते प्रश्न त्यांच्यासमोर होते किंवा त्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्या, असे अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले आणि मग हळूहळू मी त्याची माहिती घेत गेले.

यातील गौतम बुद्ध यांची शिल्पे ‘स्थानक’, ‘प्रलंबपादासन’, ‘पद्मासन’, ‘सिंहासन’ तसेच ‘ध्यानमुद्रा’, “धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा’, ‘वरदमुद्रा’ व ‘महापरिनिर्वाणमुद्रे’त कोरण्यात आली आहेत. हे वाचल्यावर मात्र परत त्या ठिकाणी भेट देऊन अशा लहान लहान; परंतु अति महत्त्वाच्या गोष्टींची परत जाऊन नोंद घेण्याची गरज आहे हे लक्षात आले. याचाच अर्थ एखाद्या ठिकाणाला एकदा भेट देऊन त्याविषयी जाणून घेता येत नाही, तर अशा ठिकाणी परत परत जाऊन त्याविषयीची माहिती घेण्याची गरज आहे. त्याची सौंदर्य स्थळे नव्याने अनुभवण्याची गरज आहे, हे लक्षात आले.

या लेण्यांवरील खोदकाम, नक्षीकाम पाहिल्यावर त्या काळातील कलाकारांबद्दल मनात असलेला अभिमान द्विगुणित झाला. कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसताना त्यांनी हे काम कसे केले असेल, याचे आश्चर्य वाटले.

महाराष्ट्राला एक प्रचंड असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हा इतिहास प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी येथे आणि अशाच ठिकाणी शैक्षणिक सहली आयोजित करण्याची आवश्यकता आहे. तसे आपण गुगल गुरूकडून माहिती घेत पुढे जातो ती माहिती खूपदा त्रोटक असते; परंतु विस्तृत आणि अचूक माहिती कोणत्या तरी मार्गदर्शकाकडून विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे, हे जाणवले.

जेव्हा आपण अशा काही स्थळांना भेट देतो, तेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्याला त्याकाळचे अभावग्रस्त जीवन दिसते, त्याचप्रमाणे ऐतिहासिक समृद्ध वारसाही दिसून येतो. आजच्या सोशल मीडियातीन जगापासून थोडा काळ जाणीवपूर्वक ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी ठेवला पाहिजे हे लक्षात आले.

नाशिक शहराचे विहंगम दृश्य या ‘पांडव लेणी’वरून पाहताना लक्षात आले की, कितीही उंच डोंगर चढलो तरी शेवटी आपल्याला उतरावेच लागते. जमिनीवर यावेच लागते. त्यामुळे उच्च स्थानावर जाणे, हे केवळ काही क्षणांसाठी असते त्यासाठी माणसाने सतत आपले पाय मातीवरच रोवूनच जगले पाहिजे, हे लक्षात ठेवले पाहिजे!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -