Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलTeacher : नव्या शिक्षिका

Teacher : नव्या शिक्षिका

  • कथा : रमेश तांबे

सिद्धी हुशार होती, पण बोलण्या-वागण्यात जरा उर्मटदेखील होती. तिच्याभोवती नेहमी ५-६ मुलींचा गराडा असायचा. जणू काही वर्गातली ताईच! आज वर्गात नवीन शिक्षक येणार होते. त्यामुळे सिद्धीदेखील कोण नवीन येणार, त्यांची कशी फजिती करता येईल यावर विचार करीत होती…

आज वर्गात नवीन शिक्षक येणार होते. त्यामुळे सारा वर्ग आनंदात होता. कोण येणार? कोणता विषय शिकवणार? याबद्दल मुलांचे तर्कवितर्क सुरू होते. नवे शिक्षक सर असतील की मॅडम? ते रागीट, मारकुटे, तापट की शांत, मुलांना समजून घेणारे असतील. वर्गातल्या मुलांची नुसती चुळबुळ सुरू होती.

याच वर्गात सिद्धीदेखील होती. सिद्धी वर्गातल्या सर्व मुलींची प्रमुख होती. ती हुशार तर होतीच, पण स्वभावाने खूपच बिनधास्त आणि बोलण्या वागण्यात जरा उर्मटदेखील होती. तिच्याभोवती नेहमी पाच-सहा मुलींचा गराडा असायचा. जणू काही वर्गातली ताईच! त्यामुळे तिच्यापुढे कुणा मुलींची टाप नव्हती. सिद्धीदेखील कोण नवीन येणार, त्यांची काय मजा करता येईल, कशी फजिती करता येईल यावर विचार करीत होती. तितक्यात मुख्याध्यापकच सरळ वर्गात आले. ते वर्गात येताच साऱ्या मुली गप्प बसल्या. आणि सर बोलू लागले, “मुलींनो आज तुमच्या वर्गात नवीन शिक्षक येणार आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घ्या” असे म्हणून सर निघून गेले. त्यानंतर वर्गात पुन्हा एकदा गप्पा सुरू झाल्या.

तेवढ्यात साधारण वीस-बावीस वर्षे वयाची एक मुलगी अपंगांच्या सायकलवरून वर्गात आली. ती वर्गात येताच साऱ्या मुली बघतच बसल्या. उठून नमस्ते, गुड मॉर्निंग करायची देखील आठवण त्यांना राहिली नाही. ती मुलगी सरळ पुढे आली. व्हीलचेअरमधून बाहेर आली आणि समोर ठेवलेल्या टेबलाचा आधार घेत त्या खुर्चीवर बसली. तिचे दोन्ही पाय अधू होते. दोन्ही पायांना लोखंडी पट्ट्या लावल्या होत्या. चालताना, उठता-बसताना तिला बरेच कष्ट घ्यावे लागत होते. त्या तरुण शिक्षिकेला बघताच सारा वर्ग विस्मयचकीत झाला होता. त्या वर्गातली दादागिरी करणारी सिद्धी, तर एकटक त्या तरुण शिक्षिकेकडे बघत बसली. नवीन मॅडमची चांगलीच टर उडवायची, फजिती करायची, उगाचच प्रश्न विचारून वर्गाचा वेळ वाया घालवायचा, टवाळक्या करायच्या, वर्गात खसखस पिकवायची असा एकंदरीत प्रकार असायचा सिद्धी आणि तिच्या मैत्रिणींचा. पण समोरच्या मॅडमकडे बघून सिद्धी अवाक होऊन बघतच बसली. मॅडम काय बोलतात याकडे साऱ्या मुलींचे लक्ष लागून राहिले होते.

खुर्चीवर बसूनच त्या म्हणाल्या, “नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी मुग्धा देशमुख. मी मराठी विषयात पदवी घेतली असून मला विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळालं आहे. त्याशिवाय मी पीएचडीदेखील पूर्ण केली आहे. मराठी भाषेबरोबरच जर्मन, फ्रेंच या भाषांचा मी गेली चार वर्षे अभ्यास करते आहे. तरीदेखील मराठी हा खूप आवडता विषय असून माझी कविता, कथांची सहा पुस्तके प्रसिद्ध आहेत.” मॅडम बोलत होत्या आणि वर्गातल्या मुली तोंडात बोट घालून आश्चर्ययुक्त नजरेने ऐकत होत्या. सिद्धीचा सारा जोश उतरला होता. एक अपंग मुलगी आपल्यापेक्षा साधारण आठ-दहा वर्षांनी मोठी असलेली. एवढे शिक्षण घेतलेली, डॉक्टर झालेली, लेखिका-कवयित्री बनलेली. शिवाय तिला अपंग असल्याने चालता-फिरतादेखील येत नव्हते. तिच्या व्यक्तिमत्त्वाने सिद्धी अगदी भारावूनच गेली. तासाला सुरुवात करण्यापूर्वी मॅडम प्रार्थना म्हणू लागल्या. त्या त्यांच्या गोड आवाजातल्या गायकीने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध करून टाकले.

मॅडम म्हणाल्या, “आज अभ्यास नाही. पण मी माझी कहाणी थोडक्यात सांगणार आहे आपल्याला! मी साधारण चौथीत असताना तापाचं निमित्त झालं. पण त्यात माझे दोन्ही पाय लुळे पडले. तोपर्यंत मी अनेक खेळ खेळायची. धमाल मस्ती करायची. पण दोन महिन्यात सारे संपले. माझ्या डोळ्यांपुढे अंधार निर्माण झाला. शाळा नको, मित्र मैत्रिणी नको असे झाले होते. पण एक दिवस बाबांनी मला एका अनाथ आश्रमात नेले. तिथे आई-बाबा नसलेली असहाय मुले मी बघितली. त्यानंतर मी माझं रडणं सोडलं. मैदानात खेळणारी मी आता पुस्तकांबरोबर मैत्री करू लागले. खूप अभ्यास करायचा हे मी त्याचवेळी ठरवले. आई-बाबा आणि मित्रांनी साथ दिली म्हणून मी आज इथे आहे. मला शिकवायला खूप आवडते म्हणून मी शिक्षिका झाले.” मॅडमचं बोलणं संपलं तरी वर्गात एक आश्चर्ययुक्त शांतता पसरलेलीच होती! इकडे सिद्धी स्वतःची तुलना मॅडमशी करू लागली आणि बघता बघता तिचे डोळे भरून आले!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -