दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
ईटाचा नाश करणाऱ्या दुर्गेचा उत्सव, नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू आहे. त्यानंतर दसरा साजरा होणार आहे. काळोखातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा सण नेहमीच जीवनात ऊर्जा घेऊन येतो. आपल्या हिंदू धर्मातील प्रत्येक सण, उत्सव नेहमीच अशीच सकारात्मकता, ऊर्जा घेऊन येतात. प्रत्येक उत्सव आपल्याला एक संदेश देत असतो. आपल्याला जगण्यासाठी मार्ग दाखवत असतो. पण आपण या सणांकडून किती शिकतो हे अधिकचे महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सणाचे निसर्गाशी नाते आहे. जणू निसर्गच वेगवेगळ्या देव आणि देवतांच्या रूपाने आपल्याला या सणांच्या निमित्ताने भेटायला येतो, जगण्याचे नवनवे धडे प्रत्येक पिढीला देत असतो. म्हणूनच इतकी वर्षे झाली तरीही हे सण आणि उत्सव तितक्याच उत्साहाने साजरे केले जात आहेत. फक्त विचार केला पाहिजे की हल्लीच्या काळात हे सण साजरे केले जाणारे मार्ग योग्य आहेत का?
गेल्या काही वर्षांपासून किंवा दशकांपासून म्हणूया, या सण आणि उत्सवांचे स्वरूप बदलले आहे. त्यामध्ये उत्सवीपणा आणि आधुनिकता अधिक येताना दिसते आहे. यामुळेच या सण आणि उत्सवाचं मूळ स्वरूप आणि हेतू हरवून जात आहे. नावीन्य आणि आधुनिकता या शब्दाखाली अनेक गोष्टी या सण आणि उत्सवामध्ये खपवून घेतल्या जात आहेत. मग गणेशोत्सव असू दे, दहीहंडी असू दे किंवा अन्य कुठलेही सण असू देत, त्यामध्ये हा आधुनिकपणा अधिक जाणवू लागला आहे. खरं तर गणेशोत्सव हा मांगल्याचा उत्सव असतो. कोकणासह अनेक ठिकाणी घरोघरी गणपती येतात, तर सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाचे आगमन होते. अशा वेळेला त्याचे मांगल्याच्या वातावरणात स्वागत केले पाहिजे; परंतु त्याचे आगमन असू दे किंवा त्याची विसर्जन मिरवणूक असू दे. अनके ठिकाणी डॉल्बी, डीजे लावून होणारे कार्यक्र, गाणी, त्यावर होणारे नृत्य हे प्रकार पाहायला मिळतात. हाच प्रकार नवरात्रमध्ये गरबा आणि दांडियाच्या नावाखाली पाहायला मिळतो.
नऊ दिवस अनेक ठिकाणी हे गरबा, दांडिया उत्सव कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. खरं तर या नवरात्री म्हणजे देवीच्या जागर करण्याच्या रात्री आहेत. महिषासुराचा वध करून या पृथ्वीला, या सृष्टीला त्याच्या जाचातून मुक्त करण्यासाठी दुर्गादेवीने घेतलेलं चंडीचे रूप, दुर्गेचे रूप तिचा दरारा दाखवणारा आणि त्यानंतर येणारा हा दसरा आनंदाचा सण असतो; परंतु गरबा आणि दांडियाच्या नावाखाली अनेक चुकीच्या प्रथा, चुकीच्या गोष्टी समाजामध्ये रुजताना दिसत आहेत. खरं तर सण आणि उत्सव साजरे करताना पोलिसांचा बंदोबस्त असणं ही चुकीची गोष्ट आहे. आपण आपल्या परंपरा जपत असतो. अशा वेळेला त्याच मांगल्य, त्याच पावित्र्य जपणं हे प्रत्येक आयोजकासह त्यातील सहभागी प्रत्येकाचे काम असतं. पण अशा ठिकाणी हुल्लडबाजी करणं, महिलांना त्रास देणं, विक्षिप्त गाण्यांवरती नृत्य करणे यापासून अनेक गोष्टी इथे होताना दिसतात आणि यात सण आणि उत्सवातील पावित्र्य अशा कार्यक्रमांमुळे नष्ट होताना दिसतं.
देवीचा जागर करताना गाणी, नृत्य हे झालंच पाहिजे. देवीचे आवाहन, देवीची स्तुती केलीच पाहिजे. पण अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे अश्लील अर्थ असलेल्या गाणी लावून त्यावर दांडिया खेळताना दिसतात. गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती अनेकदा दिसून येते. दहीहंडीमध्ये सुद्धा विक्रमी थर लावण्याच्या नावाखाली, धाडसी काहीतरी करून दाखवण्याच्या नावाखाली वाईट कृत्य चुकीच्या पद्धतीने केली जातात. असे अनेक सण आहेत ज्यामध्ये हे चुकीचे पायंडे पडताना दिसत आहेत. याला आळा बसावा यासाठी समाजरक्षक म्हणून मग पोलिसांना बोलावलं जातं, अनेक नियम आणि अटी बसवल्या जातात, त्यातून परत समाजमन कलुषित होतं. खरं तर हे सण आणि उत्सव साजरे करताना त्याचा मूळ उद्देश काय आहे याची जाणीव प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.
आज हे सण त्यातल्या उत्सवी रूपाने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढे आले आहेत. पण त्यांचा हेतू काय आहे? हे आजच्या तरुणाईला किती माहिती आहे? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. हातामध्ये टिपऱ्या घेऊन दांडिया खेळायला जाणाऱ्या तरुण पिढीला हा गरबा का खेळला जातो, हा कार्यक्रम नेमका कुठल्या राज्यातला आहे, तो तिथे का खेळला जातो. मग आपण जर महाराष्ट्रात आहोत, तर या नवरात्रीच्या काळात येथे कोणता कार्यक्रम केला जातो, कोणत्या प्रथा परंपरा जपल्या जातात याची माहिती प्रत्येकालाच असली पाहिजे. ती माहिती आई-वडिल, पालक, आजी-आजोबांकडून आजच्या मुलांना दिली जाते का? त्याची शिकवण शाळांत दिली जाते का? महाविद्यालयांत विशेषत्वाने याची जाणीव विद्यार्थ्यांना केली जाते का? हे पाहणं गरजेचं आहे.
सध्या नवरात्र सुरू आहे. देवी राक्षसाचा वध करते, दसऱ्याची उजाडणारी नवी पहाट ही आनंदाची उगवते, रावणाचा वध करून राम सीतेला वनवासातून मुक्त करतात, पांडव याच दिवशी त्यांच्या वनवासातून मुक्त होतात, दसरा हा असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे नेणारा सण आहे. या दिवशी अशीच सकारात्मकता प्रत्येकाकडे यावी, काहीतरी चांगलं करण्याची ऊर्मी मिळावी, आपल्या मूल्य, परंपरा खऱ्या अर्थाने जपण्याची वृत्ती आणि इच्छा प्रत्येकाच्या मनात रुजावी हीच या निमित्ताने सदिच्छा!
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…