Wednesday, April 30, 2025

किलबिलसाप्ताहिक

Earth's atmosphere : पृथ्वीचे वातावरण

Earth's atmosphere : पृथ्वीचे वातावरण
  • कथा : प्रा. देवबा पाटील

पृथ्वीभोवती हवेचे वातावरण असल्याने उल्का वरून खाली येताना हवेसोबत घर्षणाने त्या शक्यतोवर पूर्णपणे जळून जातात. त्यामुळे त्यांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर काहीच विपरित असा परिणाम होत नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील वातावरण खूप दाट असते व जसजसे वर वर जावे तसतसे ते विरळ होत जाते.

रसायनशास्त्र शिकविण्यात आमच्या देशमुख सरांचा हातखंडा होता. रसायनशास्त्राच्या व्याख्या, संज्ञा, संकल्पना, उपकरणे, रसायने, समीकरणे, सूत्रे, आकृत्या, राशी, त्यांची एकके, विविध क्रिया-प्रक्रिया सगळ्या त्यांच्या जीभेवर खेळत होत्या. रासायनिक क्रिया-प्रक्रियांचे घटक, गुणक, त्यांचे प्रमाण, गुणोत्तरे, उत्प्रेरके, सहाय्यके, तापमान, त्यांची रूपांतरे, उत्पादिते आदी सारे त्यांचे तोंडपाठ होते. त्यांची ते सारे शिकविण्याची हातोटीच इतकी विशेष होती की, ते शिकवत असताना प्रत्येक गोष्ट सहजगत्या हसत-खेळत विद्यार्थ्यांच्या तोंडून वदवून घेत असत. त्यामुळे जसे चण्याचे फुटाणे फुटतात तसे साऱ्या मुला-मुलींच्या ओठांतून रसायनशास्त्र पटापट बाहेर पडत असे. जसे संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतले होते तसे आमच्या देशमुख सरांनी गोडीगुलाबीने वर्गातील काही रेड्यांच्या मुखातूनही रसायनशास्त्राच्या प्रक्रिया वदवून घेतल्या होत्या. त्यामुळे त्या रद्दाळांना झोपेतून उठवले तरी त्यांच्याही तोंडातून धडाधड साऱ्या प्रक्रिया जशाच्या तशा बाहेर पडत असत. असे ते आजच्या युगातील आमचे पंत रसायनेश्वर होते. सर वर्गावर आले नि सरांनी हजेरी घेऊन झाल्यावर शिकवणे सुरू केले.

“आपल्या पृथ्वीचे वातावरण सजीवांना कसे काय अनुकूल आहे सर?” देवेंद्राने प्रश्न केला.

“पृथ्वीची रचना, उचित गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि सुयोग्य वातावरण यामुळेच पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली असावी. जे ग्रह सूर्यापासून जवळ आहेत तेथे भयंकर उष्णता असते, तर जे जास्त दूर आहेत तेथे कडाक्याची थंडी असते. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या म्हणजे अतिजवळच्या व अतिदूरच्या ग्रहांवर जीवसृष्टीची शक्यता जवळ जवळ नसतेच. आपल्या पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर असे योग्य आहे की, ती सूर्याच्या फार जवळही नाही व सूर्यापासून अतिदूरही नाही. त्यामुळे आपल्या पृथ्वीवर सदैव समशीतोष्ण म्हणजे थंडी व उष्णता सारख्या प्रमाणात असलेले असे वातावरण राहते. म्हणून सूर्यमालिकेत केवळ आपल्या पृथ्वीवरच सजीव निर्माण झालेत व वाढलेत. म्हणून केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पतीसृष्टी आढळते.” सरांनी खुलासा केला.

“सर, पृथ्वीवर सगळीकडे सारखेच वातावरण असते का?” वीरेंद्राने शंका काढली.

“नाही मुलांनो.” सर म्हणाले, “पृथ्वीवरील वातावरणातही थोडाफार फरक असतो. कोठे तापमान कमी असते, तर कोठे जास्त असते. कोठे बर्फ कमी पडते तर कोठे जास्त पडते. कोठे थंडी कमी असते, तर कोठे अधिक थंडी असते. त्याचे कारण सूर्यकिरणे पृथ्वीवर कोठे तिरपी पडतात, तर कोठे सरळ पडतात. तसेच त्यांचा कोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो व तोही बदलता असतो. त्यामुळे वातावरणातही बदल होत असतो. हे सर्व पृथ्वीच्या भ्रमणामुळे होत असते.”

“सर उल्कांचे वातावरणात घर्षण होऊन त्या जळतात ना?” वृंदाने विचारले.

“हो.” सर म्हणाले, “आकाशातून पृथ्वीवर सतत उल्कापात होत असतो, मोठमोठे दगड पृथ्वीकडे येत असतात. कोणती उल्का पृथ्वीवर केव्हा आणि कोठे येऊन आदळेल हे काही सांगता येत नाही. त्या जर जशाच्या तशा पृथ्वीवर पडल्या, तर खूप हानी होऊ शकते; परंतु पृथ्वीभोवती हे हवेचे वातावरण असल्याने त्या उल्का वरून खाली येताना हवेसोबत घर्षणाने त्या शक्यतोवर पूर्णपणे जळून जातात व ज्या काही न जळता राहिल्याच, तर त्या धुळीच्या कणाएवढ्या बारीक होत असतात. त्यामुळे त्यांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर काहीच विपरित असा परिणाम होत नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हे वातावरण खूप दाट असते व जसजसे पृथ्वीपासून वर वर जावे तसतसे ते विरळ विरळ होत जाते.” अशा त­ऱ्हेने तोही तास संपला व मुला-मुलींचे वातावरणाचे ज्ञानार्जन अपूर्णच राहिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
   
Comments
Add Comment