Tuesday, November 12, 2024
Homeसाप्ताहिककोलाजDussehra : दसरा : गरज वैचारिक सीमोल्लंघनाची

Dussehra : दसरा : गरज वैचारिक सीमोल्लंघनाची

  • प्रासंगिक : साधना कुलकर्णी

दसरा हा विजयाचा सण असल्याने षडरिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे, सामर्थ्याचे, मैत्रीचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे. सण म्हणजे ‘धम्माल’ हे खरे असले तरी त्याचे रूपांतर धांगडधिंगा आणि उन्मादात होऊ नये. हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची गरज आहे.

हल्ली मोबाइल किंवा टीव्हीवर ‘द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ ही ‘अ‍ॅमेझॉन सेल’ची जाहिरात दिसायला लागली की समजावे की सणासुदीचे दिवस आले आहेत… म्हणजेच सण आले की खरेदी करायची, हे समीकरण बाजारपेठेने आपल्या मेंदूवर कोरून ठेवलेय. नखशिखांत दागिन्याने मढलेल्या, उंची तलम वस्त्रे ल्यायलेल्या अत्यंत देखण्या स्त्रिया चुटकीसरशी विविध प्रकारच्या मिठाया स्वतः तयार करून घरच्यांना आग्रह करून खाऊ घालणारी जाहिरात दिसली की समजावे सण आलेत. (अशा महान स्त्रिया शोधा आणि हजार रुपये मिळवा, अशी माझी फार दिवसांची इच्छा… असो.) मुद्दा हा की सध्या समाजात प्रामुख्याने दोन प्रकारचे समूह दिसतात. सण असले की निर्बुद्ध मालिकेत बघितलेल्या सणांचे उत्सवी, पोषाखी अनुकरण करणारा एक समूह… हे म्हणे संस्कृतीचे (?) जतन करतात आणि दुसरीकडे कायम अर्ध्या चड्ड्या घातलेला, दाढीचे खुटं वाढलेला, वर्षभरात कंगवा न लागलेले विस्कटलेले केस असणारा, सदैव लॅपटॉप बडवणारा… यांना दिवस-रात्र आंघोळ, जेवण, झोप, सणवार… यांच्याशी कवडीचेही देणे-घेणे नसते. ओटीटीवर आवडत्या सीरियलचा दुसरा/तिसरा सीझन येई, तोची दिवाळी दसरा, असेच असावे कदाचित आणि या दोन टोकांच्या मध्ये असणारी आमची मध्यमवयीन पिढी. एकीकडे लहानपणी साजऱ्या केलेल्या सणांचा सात्त्विक आनंद शोधण्याची धडपड तर दुसरीकडे सणांचे श्रेयस पकडून ठेवण्याची असमर्थता. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे येऊ घातलेला दसरा. दसरा-दिवाळीची चाहूल हीच मुळात ऊर्जादायक असते पण ती केव्हा? बदललेला ऋतू याची हळुवारपणे जाणीव करून देतो तेव्हा…

सोन पावलांनी येणारा आश्विन महिना येतानाच भक्ती आणि शक्तीचा संदेश घेऊन येतो. आश्विनातले लख्ख केशरी ऊन, मोकळी हवा, निरभ्र आकाश, टिपूर चांदणे, पिवळ्या-नारिंगी झेंडूंनी रंगलेला निसर्ग… सगळेच कसे मेंदूला चेतवणारे असते. आश्विनाच्या हवेतच ऊर्जा असते. नऊ दिवस केलेली जगदंबेची उपासना आणि दहाव्या दिवशीचा दसरा… हे सगळेच दिवस चैतन्याने रसरसलेले असतात. त्यात मनुष्यप्राणी हा उत्सवप्रिय आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत कल्पकतेने आणि योजकतेने या सण-उत्सवांची रचना केली आहे. प्रत्येक सणामागे एक निश्चित विचारांची बैठक आढळून येते आणि त्याच वेळी येणाऱ्या ऋतूचे स्वागत केले जाते आणि सोबतच आरोग्याचा एखादा नियमही जोडला जातो. जीवनप्रणाली, विचारप्रणाली आणि उपासनाप्रणाली या तिन्हींचे उन्नयन या सणामुळे व्हावे हे अपेक्षित असते.

शुष्क उपदेश सांगितले असते, तर ते टाळण्याकडेच माणसाची प्रवृत्ती असते पण सणावारांच्या माध्यमातून आणि प्रतिकांचा उपयोग करून ही संस्कृती आपल्या जीवनात रुजवली गेली आहे. सण, उत्सवांद्वारे मन प्रसन्न होते, कौटुंबिक संबंध दृढ होतात, सामाजिक जाणिवा व्यापक होतात, तर प्रतिकांद्वारे बुद्धीचा विकास होतो. भारताचा सांस्कृतिक इतिहास हा पुस्तकांच्या पानात नाही, तर त्याच्या जिवंत उत्सवात लिहिला आहे. त्यामुळे प्रत्येक सणाचे ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक व शास्त्रीय महात्म्य आपल्याला माहीत असायला पाहिजे. कारण सणांचा संबंध देहाच्या आणि मनाच्या आरोग्याशी तर आहेच पण आत्मीक समाधानाशीही आहे. मानवी जीवन कौटुंबिक, मानसिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक समृद्ध करायचे असेल तर सण-उत्सवामागचा दृष्टिकोन लक्षात घ्यायला हवा. काळ आणि परिस्थितीनुसार कालबाह्य आणि निरुपयोगी प्रथा मोडीत काढून सणांमागचे तत्त्व आणि विज्ञान शाबूत ठेवणे गरजेचे आहे.

या दृष्टीने दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव आहे. या सणासंबंधी अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराजय करण्यासाठी लंकेवर स्वारी केली आणि आश्विन महिन्यातल्या दशमीला रावणाला ठार मारले म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात. दुसरी कथा महिषासुरमर्दिनी देवीची आहे पृथ्वीवरील जनतेचा छळ करणाऱ्या महिषासुराचा नि:पात करण्यासाठी देवाने अष्टभूजा देवीचे रूप धारण करून, दहा दिवस युद्ध करून वध केला म्हणूनही या दशमीला विजयादशमी म्हणतात. म्हैसूरला याच देवीला चामुंडेश्वरी या नावाने संबोधतात. रघुराजाने विश्वजीत यज्ञ केल्यामुळे त्याचा खजिना रिकामा झाला होता. अशात चौदा विद्या पारंगत असलेला कौत्स त्याच्याकडे दान मागायला आला. याचकाला विन्मुख पाठवणे ही रघुराजाची संस्कृती नव्हती. म्हणून द्रव्य संग्रहासाठी त्याने इंद्रावर स्वारी केली. रघुराजाच्या अचाट पराक्रमाची कल्पना असल्यामुळे इंद्राने युद्धाचे कारण जाणून घेतले आणि कुबेराला रात्री शमी आणि आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमोहरांचा वर्षाव करण्याची आज्ञा दिली. रघुराजांनी कौत्साला या संपत्तीचे दान दिले. आवश्यकतेपेक्षा एकही सुवर्णमोहोर जास्त घेणार नाही, हा कौत्साचा निश्चय होता, तर या द्रव्याने मी माझी तिजोरी भरणार नाही, हा रघुराजाचा आग्रह होता. शेवटी हे सोने लुटून घेण्याचा आदेश त्याने जनतेला दिला. लोकांनी त्या झाडाची पूजा करून ते सोने लुटून घरी आणले, तो दिवस होता आश्विन शुद्ध दशमीचा. तेव्हापासून या झाडाची पाने सोने म्हणून लुटण्याचा प्रघात आहे.

पांडवांनी देखील अज्ञातवासात असताना आपली अस्त्रे-शस्त्रे शमी वृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती. इतिहासाचा मागोवा घेतल्यास विजयादशमीचा मुहूर्त स्वारी करण्यासाठी किंवा मोहीम सुरू करण्यासाठी फार महत्त्वाचा होता, हे दिसून येते. शिवाजी महाराज, पेशवे याच मुहूर्तावर कूच करत असत अशी इतिहासात नोंद आहे. हा सण साजरा करत असताना सीमोल्लंघन करण्याची पद्धत आहे. ईशान्य दिशेला असलेल्या शमी किंवा आपट्याच्या वृक्षाची पूजा करताना,
शमी शमयते पापम्, शमी लोहित कंटका |
धारिण्य अर्जुनं बाणानाम् , रामस्य प्रिय वादिनी |
तसेच, अश्वंतक महावृक्ष, महादोष निवारणम् |
इष्टानां दर्शनम् देहि, कुरु शत्रुविनाशनम् |

अशी प्रार्थना म्हणून नंतर शमी तसेच आपट्याची पाने आणायची असतात. ही पाने म्हणजे सुवर्ण मोहरांचे प्रतीक आहे. ही पाने आपण देवाला वाहतो, वडीलधत्नाऱ्यां, मित्रांना देतो. मला हे जे वैभव मिळाले आहे, त्याचा उपभोग मी एकटा घेणार नाही तर सगळ्यांना वाटून या आनंदाचा गुणाकार करायचा, ही कल्पनाच किती उदात्त आहे. मित्रांबरोबर शत्रूशीही प्रेमाचे नाते जोडायचे हा दसऱ्याचा संदेश आहे. या दिवशी शस्त्र लेखणी, वाहनांची पूजा करतात. म्हणजे आपली शक्ती वाढवणाऱ्या साधनांचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही कल्पना किती अभिनव आहे… या दिवशी रावणाचे दहन करतात. याद्वारे मनातली दुष्ट वृत्ती नष्ट होऊन रामप्रवृत्तीचा उदय होण्याची प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे. या सगळ्या पद्धती प्रतीकात्मक आहेत. पौराणिक कथा या कपोलकल्पीत असतीलही, पण लहानपणी अशा कथांवर विश्वास बसतो आणि त्यातून मिळणारा संदेश संस्काररूपात नकळत खोलवर रुजत जातो. हे बालवयात झालेले संस्कार मनाला संयमी आणि विवेकी करतात आणि पुढील आयुष्यात सण साजरे करताना कधी वावगे वागू देत नाहीत.

आश्विन महिना म्हणजे शरद ऋतू. आयुर्वेदानुसार या काळात शरीरातील पित्त प्रभावी असते. पित्त म्हणजे बुद्धी, साहस, पराक्रम. अशा वेळी प्रत्येकानेच एका चौकटीत बंदिस्त न राहता सीमोल्लंघन करावे, अशी अपेक्षा आहे. महिषासूरमर्दिनीचा पराक्रम, रामाने रावणावर केलेली मात, रघुराजाचे दातृत्व, परधनाबद्दल विरक्ती, कौत्साची निर्मोही वृत्ती… यातून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे. आजच्या युगात वैचारिक सीमोल्लंघन आणि त्यानुसार केलेली कृती अपेक्षित आहे. या सणातला उत्साह, उल्हास, आनंद, प्रेम हे जीवनाचे प्रेयस आहे, तर वैचारिक सीमोल्लंघन हे आत्मशक्ती, संघटनशक्ती, अन्याय निवारण यासाठी पोषक ठरणारे म्हणजेच या सणातील श्रेयस आहे. उत्सव साजरा करताना श्रेयस आणि प्रेयसाचा योग्य समन्वय हवा.

दसरा हा विजयाचा सण असल्याने षडरिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे सामर्थ्याचे, मैत्रीचे, परस्पर सामंजस्याचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे. सण म्हणजे ‘धम्माल’, ‘मज्जामस्ती’ हे नक्कीच खरे आहे पण त्याचे रूपांतर ‘धांगडधिंगा’ आणि ‘उन्मादात’ होऊ नये. हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची गरज आहे.

‘आला आश्विन आश्विन, जाती सीमा उल्लंघून, लुटा समतेचं सोनं, गात मानव्याचं गाणं’, असा समानतेचा, वैचारिक उन्नतीचा, परस्परसौहार्दाचा दसरा साजरा करू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -