Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजAdishakti : आदिशक्तीच्या सर्जनशील शलाका

Adishakti : आदिशक्तीच्या सर्जनशील शलाका

  • दरवळ : लता गुठे

स्त्री स्वातंत्र्याचा पहिला हुंकार संत कवयित्रींच्या काव्यरचनेतून…

संत कवयित्रींच्या काव्यातून स्त्री स्वातंत्र्याचा पहिला उद्गार जाणवला तो संत सोयराबाई, संत जनाबाई व संत कान्होपात्रा यांच्या रचनांमधून. त्यांच्या अभंगाचा अभ्यास करताना खरंच आश्चर्य वाटते. नवरात्रीनिमित्ताने काही अभंगांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. कारण यातूनच स्त्री भावनांचे अनेक पदर मानसिक पातळीवर उलगडताना दिसतात.

सुमारे सातशे वर्षांपूर्वी ज्या काळामध्ये समाजात अज्ञान, अंधश्रद्धा याचे आवडंबर माजले होते. अनेक अधिकारापासून स्त्रियांना वंचित केले होते. ‘स्त्री म्हणजे पापाचा देह’ असे समजले जात होते. यामुळे धर्म कार्यापासून तिला वंचित केलं जात होतं, त्या काळामध्ये स्त्री वर्गाची एकूण स्थिती पाहता वारकरी संतांनी महिलांना दिलेलं अवकाश, स्थान, सन्मान हे विशेष लक्षणीय आहे. जात-धर्म, स्त्री-पुरुष समानता यामध्ये कोणताच भेदभाव न केल्यामुळे अनेक स्त्रियांना संत पदापर्यंत पोहोचता आले. या संत कवयित्रींच्या अभंगातून त्या काळातील स्त्रियांच्या स्थितीचा आलेख जाणवतो. या तीनही कवयित्री समाजाच्या खालच्या थरातून जन्माला आलेल्या. त्यामुळे समाजातील उच्चवर्णीयांचा होणारा जाच आणि घरातील अठराविश्व दारिद्र्य यामुळे त्यांच्यासाठी आंतरबाह्य सदा युद्धाचा प्रसंग असा अनुभवत असतानाही विठ्ठल नामाचे अमृत प्राशन करून संत मेळ्यामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कवयित्री संत सोयराबाई आणि संत जनाबाई. यांच्या होरपळलेल्या मनाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून पदोपदी उमटताना दिसते. स्वतःलाच चोखयाची माहारी म्हणवणाऱ्या सोयराबाई आणि नामयाची दासी स्वतःला उपाधी लावणारी जनाबाई.

गणिकेच्या पोटी जन्मलेली अतिशय सुंदर असलेली कान्होपात्रा. तिच्या जीवनातील एक प्रसंग अतिशय बोलका आहे. आजही अनेक लेकीबाळी अशा प्रसंगांना सामोरे जातात. ही खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे… कान्होपात्राच्या सौंदर्याची भूल बिदरच्या सुलतानाला पडते आणि तो शिपायांना कानोपात्राला घेऊन येण्याची आज्ञा करतो शिपाई तिला सांगतात, “तू जर आमच्याबरोबर आली नाहीस तर तुला आम्ही जबरदस्तीने घेऊन जाऊ” त्यावर ती शिपायांना सांगते, “मी विठ्ठलाचा निरोप घेऊन येते तोपर्यंत थांबा” तसेच धावत ती पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जाते आणि पांडुरंगाला आर्तपणे टाहो फोडते त्याचवेळी तिची प्राणज्योत विठ्ठलात विलीन होते…

विठ्ठलभक्तीत मनाने एकरूप झालेली कान्होपात्रा विषय वाचताना मन सैरभैर होते. त्यांच्या अनेक भावपूर्ण व रसाळ अभंगातून विठ्ठल भक्तीची साक्ष पटते.

अतिशय निर्भयपणे काव्यातून आपले विचार मांडताना या संत कवयित्री दिसतात. सोयराबाईच्या एका अभंगांमध्ये किती सहजपणे विठ्ठलाची हितगुज करताना दिसतात त्यांच्याच अभंगातील काही ओळी…
बैसुनी एकांत बोलू गुजगोष्टी
केधवा भेटशी बाई मजा
ही नीत नव्हे बरी
म्हणे चोखियाची महारी!!

मनात साठलेला उद्वेग असह्य झाला की विठ्ठलाला आर्त साद घालताना दिसतात. विठ्ठल भेटीची मनाला लागलेली ओढ आणि संसाराचा व्याप ताप तो सांगण्यासाठी विठ्ठलाशी गुजगोष्टी करण्यासाठी जेव्हा विठ्ठलसख्याला हाक देऊनही तो येत नाही त्या वेळेला सोयराबाई म्हणतात, “मी तुझ्याशी जे नातं जोडलं आहे ते तुला ठाऊक आहे, तरीही तू येत नाहीस ही तुझी रीत बरी नाही. तू आमचा मायबाप, सखा सोबती सर्व काही तूच आहेस म्हणून तुझ्याशी मोकळेपणाने बसून हितगुज करावेसे वाटणे यात गैर ते काय आहे? सोयराबाईच्या अनेक अभंगातून त्यांच्या ठिकाणी असलेली निर्भयता लक्षात येते. म्हणूनच सोयराबाई एका अभंगातून म्हणतात…
देहासी विटाळ म्हणती सकळ 
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्मला
सोहळा तो झाला कवन धर्म 
विटाळा वाचोनि उत्पत्तीचे स्थान 
कोण देह निर्माण नाही जगी?

या अभंगातून सोयराबाईच्या विचाराची प्रगल्भता लक्षात येते. हा प्रश्न त्या फक्त विठ्ठलालाच विचारत नाहीत तर समस्त व्यवस्थेलाच विचारतात. ज्या समाजव्यवस्थेमध्ये पाप-पुण्य, उच्च-नीचता यामुळे समाजामध्ये मिळणारी हिनत्वाची वागणूक या सर्व व्यवस्थेलाच त्या म्हणतात, देहाचा विटाळ हा शरीर धरणातून निर्माण झालेला आहे त्यात सोहळे करण्यासारखे काय आहे! पवित्र-अपवित्र हे माणसाच्या कल्पनेचे आणि कर्मकांडाचे अविष्कार आहेत. विटाळाशिवाय माणसांच्या जन्माचे स्थान कोणते आहे? मनाची निर्मळता हेच शुद्ध भक्तीचे लक्षण आहे. हे सत्य सोयराबाई त्यांच्या प्रगल्भ विचारातून अधोरेखित करतात. काळाच्या पुढे जाणारे तर्कशुद्ध विवेकपूर्ण विचारातून स्त्रीत्वाची प्रतिष्ठा जपण्याचे कामही सोयराबाईने जाणीवपूर्वक केले आहे.

त्याचप्रमाणे संत जनाबाई, सोयराबाईच्या आणखी एक पाऊल पुढे जाऊन व्यक्त होतात. स्त्री मनाच्या सुलभ भावनांचे प्रतिबिंब त्यांच्या अभंगात उमटलेले दिसते म्हणतात, “विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा.” या अभंगातून त्यांच्या मातृत्वाची वात्सल्य भावना अधोरेखित होते. तसेच “स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास” या शब्दांत जनाबाईंनी समस्त स्त्रियांना जणू एक संदेश दिला आहे. स्त्रीलाही प्रत्येक अधिकार असायला हवेत तिला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे. ज्या वेळेला त्यांनी विठ्ठल चरणी स्वतःला समर्पित केले त्यावेळेला त्या म्हणतात मला बाह्य जगाची परवा नाही.
डोईचा पदर आला खांद्यावरी 
भरल्या बाजारी जाईन मी!
पंढरीच्या पेठे मांडीयेले पाल
मनगटावर तेल घाला तुम्ही
जनी म्हणे देवा मी झाले येसवा
निघाले केशवा घर तुझे…

समाज रहाटीच्या, नीतीनियमाच्या, सामाजिक रीतीरिवाज विरुद्ध बंड करून उठणार स्त्री मन वरील अभंगातून आपल्या लक्षात येते…

जनरिती सोडून केशवा घरी जाणारी ही जनाबाई तिचे जगणे आणि तिचे अभंग वेगळे नाहीत. तिच्या निर्भीड मनाची प्रगल्भता आजच्या स्त्रीला अधिक जवळची वाटते. साक्षात विठ्ठलाला जनाबाई घरी बोलवतात आणि विठ्ठलही आनंदाने जनाबाईला तिच्या रोजच्या कामांमध्ये मदत करतो. भक्ती मार्गाने जाणाऱ्या जनाबाई, सोयराबाई यांना आपण एकट्या नाहीत, तर आपल्याबरोबर साक्षात विठ्ठल पाठीराखा आहे, ही साक्ष त्यांच्या कृतीतून अभंगात साकार होताना दिसते. त्यांच्यानंतरच्या अनेक कवयित्री आपले सुख दुःख निर्भयपणे काव्यातून व्यक्त करू लागल्या.

स्त्री जीवनातील विविध रंगाने रंगलेल्या संसारिक भावनांचे चित्र अनेक साहित्य गुणांचे दर्शन घडविते. स्त्रीच्या विविध भूमिकांची जाणीव या संत कवयित्रींनी त्यांच्या काव्यातून करून दिली आहे. आपल्या आध्यात्मिक आणि आत्मिक बळावर आत्मोन्नतीचा मार्ग त्यांना सापडला. त्या काळातील महिलांमध्येही संघर्ष करण्यासाठी बंडखोरी करावी लागली आणि परमेश्वराशी संवाद साधताना त्यांच्या मनाची झालेली अवस्था याचं चित्रण संत कवयित्रींच्या काव्यात आलेलं आहे. स्त्री स्वातंत्र्याचा प्रगल्भ हुंकार या संत कवयित्रींच्या रचनांमधून मला जाणवला, तो मी या लेखांमध्ये अतिशय अल्प प्रमाणात रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -