कला ही एक साधना आहे, कलेत आपले भान हरपून कलाकार कलेशी एकरूप होतात. कला ही केवळ हौसमौजेसाठी न ठेवता कलेचे रोजगारासाठी किंवा व्यवसायात रूपांतर करण्यासाठी, कलाकाराला एका वेगळ्या पातळीपर्यंत जावे लागते. अशी पातळी गाठलेल्या दोन कलाकारांची ओळख आपण करून घेऊ.
राज बकरे हे कोल्हापुरातील प्रख्यात चित्रकार. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लता मंगेशकर, दिलीप कुमार अशी व्यक्तिचित्रे रेखाटण्यातही त्यांचा हातखंडा आहे. विविध वृत्तपत्रांत त्यांनी चित्रकार म्हणून काम केले आहे. अनेक लेखक, कवी यांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठाचे व आतील चित्रांचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्याशी गप्पा करण्याची संधी मिळाली, तसे त्यांचे या क्षेत्रातील विविध अनुभवांचे भांडारच जणू खुले झाले.
राज यांच्या घरी कलामय वातावरण होते. त्यांचे वडील सरकारी नोकरीत होते. लहानपणापासूनच राज यांना चित्रकलेची आवड होती. कोणत्याही कलेत स्थिरता येण्यासाठी व प्रावीण्य मिळविण्यासाठी त्यातील आवड व शिक्षण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यादृष्टीने राज यांनी कलानिकेतन महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्रवेश घेतला व जी. डी. आर्टचे शिक्षण घेतले. नंतर त्यांनी आयटीआयमध्ये पेंटर जनरलचा कोर्स केला. राज यांनी स्वत:ची ‘अपोलो ॲड’ एजन्सी’ सुरू केली; परंतु त्यांच्या आवडीची पेटिंगची कामे कमी मिळायची व व्हिजिटिंग कार्ड, लेटर पॅड, लेटरहेड, लग्नपत्रिका, ब्राऊजर्स, लोगो, सिम्बाॅल याचीच कामे खूप येत होती. नंतर त्यांनी एका वृत्तपत्रात पुण्यातील डी. जी. कोर. ॲनिमेशन कंपनीत मुलाखत दिली व तेथे त्यांचे चित्रकलेतील प्रभुत्व पाहून त्यांना लगेच नोकरी मिळाली. पण काही कारणांनी त्यांना कोल्हापूरला परत यावे लागले व पुण्यातील नोकरी गेली.
त्याच सुमारास राज विवाहबद्ध झाले व चित्रकलेसाठी त्यांना कायम पत्नीने प्रोत्साहन दिले. नंतर साधारण एक वर्ष त्यांनी बेळगावच्या एका वृत्तपत्रामध्ये चित्रकार म्हणून काम केले. अशा तऱ्हेने राज यांना वृत्तपत्र क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. या अनुभवानंतर परत कोल्हापूरला आल्यावर ते बाहेरील कामे मिळवण्यासाठी धडपड करू लागले, तेव्हा पुस्तकांचे मुखपृष्ठ व आतील चित्रे काढण्याची संधी त्यांना वासंती इनामदार, जोशी मॅडम व मीनाक्षी सरलष्कर मॅडम यांच्याकडून मिळाली. राज यांनी त्यांच्या पुस्तकांची खूप कामे केली. राज यांचे व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी असल्यामुळे ते २००५ पासून दुसऱ्या एका वृत्तपत्रामध्ये चित्रकार म्हणून रुजू झाले. तेथील कामाचा व्याप मोठा व चित्रे काढणे हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस कामात जायचा; परंतु त्यांच्या आवडीचे क्षेत्र मिळाल्याने ते समाधानी होते. आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग सांगताना, राज म्हणतात की, “मी बऱ्याच वर्षांपूर्वी संत नामदेवांचे एक मोठे पूर्ण पेंटिग केले होते. त्यावेळी चंद्रकांत मांडरे सरांनी त्यांचे कौतुक केले होते. तसेच प्रसिद्ध काॅमिक आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले प्रताप मुळीक सर यांच्यासोबत एकदा ३-४ तास गप्पा मारण्याचा योग आला. त्यांनी राज यांना चित्रातले बारकावे सांगितले व साध्या एच. बी. पेन्सिलने काही स्केचेस करून दाखविल्या. त्या इतक्या अप्रतिम झाल्या होत्या की, राज यांनी त्या अजूनही जपून ठेवल्या आहेत.” राज म्हणतात, “आता विविध विषयांचे लेख समजावून घेऊन त्यानुसार चित्रे काढावी लागतात.” आजवर राज यांना त्यांनी केलेले लतादीदींचे पेंटिंग फार आवडते. ते त्यांनी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लतादीदींचे निधन झाल्यावर केले होते. या चित्राने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. राज यांची कन्या किमया भरतनाट्यम शिकत असून तिला चित्रकलेची जाण आहे. “जेव्हा रसिक लोक, जाणते लोक आपल्याला कलेसाठी भरभरून दाद देतात, तेव्हा ती खरी पोहोचपावती असते”, असे राज म्हणतात.
कोल्हापुरातील प्रसिद्ध मूर्तिकार आनंदा शिगावकर यांच्याशी देखील मनमोकळी बातचित करण्याची संधी मला मिळाली. आनंदा यांचे संपूर्ण कुटुंबच भक्तिरसात डुंबलेले आहे. गेली कित्येक वर्षे गणपतीच्या मूर्ती तयार करणे, दिवाळी जवळ आली की, मातीच्या पणत्या, दिवाळीच्या किल्ल्यांसाठी शिवराय व त्यांचे मावळे तयार करणे अशा कामात त्या व्यस्त असतात. त्यांचे बंधू विनायक हे माझे आजोबा कै. शरदचंद्र जोशी यांच्याकडे दरवर्षी गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती आणून द्यायचे. विनायक यांच्या पत्नी विमला व त्यांचा नातू आजतागायत माझ्या आजोळी दरवर्षी गणेशोत्सवात गणपती देण्यास येतात. ही परंपरा आनंदा यांनी सुरू ठेवली आहे. त्यांची पत्नी, मुलगा, नातवंडे असे सारे कुटुंबीय या व्यवसायात आहेत. आनंदा यांच्या आई पंढरपूरच्या वारकरी. त्यामुळे काही संस्कार आपोआपच मुलांपर्यंत पोहोचले. दरवर्षी गणेशोत्सवात आनंदा यांच्या अंदाजे गणेशाच्या अंदाजे १६०० मूर्त्या बनवितात.
आनंदा मनापासून तरुण पिढीला संदेश देऊ इच्छितात की, “प्रत्येकाने नोकरीच्या मागे न लागता असे व्यवसाय जरूर करावेत, ज्यातून ते नक्कीच भुकेले राहणार नाहीत. त्यांच्यापाशी जिद्द, कामातील सातत्य, संयम या गोष्टी असतील, तर ते उत्तमरीत्या जीवनात यशस्वी होऊ शकतात.” आमचे कामच सणा-सुदीला गरजेनुसार वेगवेगळ्या मातीच्या मूर्ती बनविणे असल्यामुळे आमच्या घरातले वातावरण नेहमी चैतन्यदायी असते. नागपंचमीला पूजनासाठी मातीचे नागोबा, बैलपोळ्याला बैलांच्या जोड्या, हरतालिकेच्या बाहुल्या, गौरी-गणपतीच्या वेळी त्यांच्या मूर्त्या, संक्रांतीला सुगड अशा वस्तू ते विक्रीसाठी ठेवतात व अनेक लोक या गोष्टी आपल्या कुटुंबीयांसह खरेदीला येतात. त्यांची खरेदीसाठी झुंबड, गर्दी यामुळे आमचा उत्साह अधिक दुणावतो. आनंदा सांगतात, “मी एका वर्षी कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीत पाच फुटांचा स्वामी विवेकानंदरूपी गणपती तयार केला होता. त्या गणपतीला घरातून निरोप देताना, ट्राॅलीवर चढविताना मला अश्रू अनावर झाले.” आनंदा पूर्वी सेल्स टॅक्स विभागात ३७ वर्षे नोकरीला होत्या. तेव्हाही वेळ काढून ते मूर्त्या बनवायच्या. ‘आवड असली की सवड मिळते’ या उक्तीनुसार आपली तहान-भूक विसरून या कुटुंबीयांचे काम सुरू असते. चित्रकार राज बकरे व मूर्तिकार आनंदा शिगावकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…