दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
देवीच्या विविध रूपांचे स्मरण आणि पूजन करायला लावणाऱ्या नवरात्रीच्या उत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. या उत्सवात देवी अन्नपूर्णेचेही पूजन केले जाते. असे म्हणतात की, जिच्यावर देवी अन्नपूर्णा प्रसन्न असते, तिच्या स्वयंपाक घरात केव्हाच अन्नाची कमतरता पडत नाही. सध्या ठाण्यात एका अन्नपूर्णेच्या नावाची आणि तिने बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या फूड आऊटलेटची चर्चा आहे. त्या अन्नपूर्णेचे नाव आहे मनीषा कोळी. आज महाराष्ट्रातील पहिले कोळी रेस्टॉरंट अशी ओळख ‘मी हाय कोळी’ने कमावली आहे. व्यवसायाने इंटिरिअर डिझायनर असणाऱ्या मनीषा कोळीचा एक डिझायनर ते यशस्वी हॉटेल व्यावसायिक हा प्रवास रंजक आहे.
मनीषा सांगते, “इंटिरिअर डिझायनर म्हणून सेटल होते. निरनिराळे प्रोजेक्ट सुरू होते. तरीही ऑथेंटिक कोळी जेवणाच्या प्रेमापोटी ‘मी हाय कोळी’ हे व्हेंचर सुरू केले.” पुण्याची असणारी मनीषा डोके ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्यात लहानाची मोठी झाली. तिने कोळी बांधवांची खाद्यसंस्कृती अतिशय जवळून पहिली आहे. लग्न कोळी कुटुंबातील भावेश कोळीशी झाल्यामुळे कोळी जेवण कसे तयार केले जाते, याचे प्रयोग स्वतः घरी केले आहेत. यावेळी अस्सल कोळी फूड आऊटलेट सुरू करण्याचा विचार मनात आला.
मनीषाने आपली आयडिया पती भावेश कोळीकडे व्यक्त केली. भावेशने मनीषाच्या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीयर असणाऱ्या भावेशला त्याची आईची आई म्हणजे मालवणी आज्जी सुलोचना परब आणि वडिलांची आई म्हणजे कोळी आज्जी गंगुबाई यांच्या अस्सल मालवणी आणि कोळी पद्धतीच्या पाककृती खवय्यांपर्यंत पोहोचवायच्या होत्या. मनीषाने मांडलेल्या आयडियामुळे त्याला पाककृती पोहोचवण्याचे माध्यम सापडले होते. २०११ मध्ये मनीषाने भावेशच्या पाठबळामुळे ठाण्यात नौपाडा रोडवर ३५० चौरस फुटांचे ५ टेबल्सचे आऊटलेट सुरू केले. या आऊटलेटची सुरुवात कोळी पद्धतीच्या पाककृतींनी करायचे ठरवले. त्यामुळे आऊटलेटचे नाव “मी हाय कोळी” ठेवले.
‘मी हाय कोळी’च्या सुरुवातीच्या दिवसांविषयी मनीषा सांगते, “ग्राहकांना ताजी मासळी मिळण्यासाठी भल्या पहाटे उठून वसई-विरार इथला नायगाव परिसर, भाऊंचा धक्का, ससून डॉकमध्ये मासे खरेदी करण्यासाठी जायचे. सोबत भावेश असायचा. आमचे मित्रमैत्रिणी, भावेशचे काका-काकू यांची आम्हाला भरपूर मदत झाली. भरलेलं पापलेट, स्टफ बोंबिल, बोबिंल फ्राय, जवळा मसाला, सुरमयी फ्राय आणि त्याचबरोबर चिकन आणि मटन मसाला खाण्यासाठी खवय्ये गर्दी करायचे. या आऊटलेटला पहिल्या दिवसापासून ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद होता. वर्षभरातच २०१३ मध्ये ‘मी हाय कोळी’ ठाण्यातच १७०० चौ. फुटांच्या मोठ्या जागेत स्थलांतरित झाले. त्यावेळेस माझ्यासमोर दोन पर्याय होते.. इंटिरिअरचा व्यवसाय की मी हाय कोळी…? मात्र ‘मी हाय कोळी’ची निवड केली. एखाद्या लहान बाळाप्रमाणे ‘मी हाय कोळी’ला मोठे करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली.
मनीषा कौतुकाने सांगते, “मला तीन अपत्ये आहेत. त्यातील पहिले अपत्य आणि जबाबदारी म्हणजे मी हाय कोळी! माझी मोठी मुलगी दहा वर्षांची आहे आणि मुलगा ५ महिन्यांचा, तर या मुलांची काळजी मी जितक्या आपुकीने घेते, तितक्याच आत्मीयतेने मी ‘मी हाय कोळी’चे काम बघते. माझ्या या तिन्ही अपत्यांचे मी मनापासून करते.” ग्राहकांचा दिवसेंदिवस ‘मी हाय कोळी’ला लाभलेला प्रतिसाद पाहता २०१९ मध्ये मनीषाने दोन नवीन आऊटलेट सुरू केले. पैकी एक मुलुंडच्या रुणवाल गलेरियामध्ये आहे, तर दुसरे कासारवडवली येथे आहे.
‘मी हाय कोळी’च्या वैशिष्ट्यांविषयी मनीषा सांगते, आमच्या प्रत्येक जेवणात हिरवे वाटण असते. मिरची, कोथिंबीर, आले आणि लसूण या मुख्य पदार्थांनी आमच्या सगळ्या ग्रेव्हीज बनतात. मग त्यात आम्ही कोळी मसाला टाकतो. आमचा २८ घटकपदार्थांनी कोळी मसाला बनवतो. या २८ घटक पदार्थांमध्ये काश्मिरी, पटना, घाटी आणि बेडगी मिरचीचा समावेश आहे. आंबटपणासाठी चिंच वापरतो. इथे १८ प्रकाच्या थाळी आहेत. ५० टक्के थाळी सेल होतात. या थाळीमध्ये खाकडे, तिसऱ्या, सुरमई, बोंबील, चिकन, मटण, खेकडे थाळी आशा विविध थाळी आहेत. बार्बेक्यू खेकड्याला सर्वात जास्त मागणी आहे. त्याचेबरोबरीने व्हेज कोळी थाळी आणि व्हेज कोल्हापूरची थाळी मिळते. व्हेज कोळी थाळीमध्ये बारीक पानांच्या मेथीची भाजी आम्ही देती तसेच उकडीचे मोदक असतात. होळीच्या सणाला आम्ही आमच्याकडून प्रत्येक ग्राहकाला एक पुरणपोळी कॉम्प्लिमेटरी देतो, तर नारळी पौर्णिमेला नारळी भात देतो. पारंपरिक मासे आणि त्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांची चव चाखण्यास उत्सुक असणाऱ्या ग्राहकांसाठी रेस्टॉरंटमध्ये कोळी फेस्टिव्हल भरवतो. गेल्या वर्षभरापासून आम्ही ‘मी हाय कोळी’मध्ये लोकाग्रहास्तव मालवणी डिशेश सर्व्ह करण्यास सुरुवात केली आहे. मालवणी जेवण माझी आज्जेसासू सुलोचना परब यांच्या जेवण बनवण्याच्या पद्धतीप्रमाणे बनवतो. ‘मी हाय कोळी’चे इंटिरिअर, क्वालिटी कंट्रोल तसेच सेंट्रलाइज्ड किचनची जबाबदारी माझ्यावर आहे. रेस्टॉरंटचे इंटिरिअर करताना एखाद्या उच्चशिक्षित कोळ्याचे घर कसे वाटावे त्याप्रमाणे केले आहे. भावेशच्या घरी स्वयंपाकघरात असणाऱ्या जुन्या पितळेच्या वस्तूंनी रेस्टॉरंट सजवले आहे. रेस्टॉरंटचा मुख्य दरवाजा १५० वर्षे जुना आहे. त्या दरवाजाला पितळेचे कडीकोयंडे आहेत, तर दरवाजाची मूठ कातीपासून बनवली आहे. खवय्यांसाठी पर्वणी असणाऱ्या या हॉटेलमध्ये अजिबात अल्कोहोल मिळत नाही.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुषयात संघर्ष असतो. मनीषाच्या आयुष्यातही होता. ती सांगते, “इंटिरिअर डिझायनर म्हणून सेट असताना रेस्टॉरंटसारख्या अनसेट तसेच बेभरवशाच्या व्यवसायात उतरणे सोप्पे नव्हते. उत्साहाच्या भरात सुरू केलेले रेस्टॉरंट वेंचर काही कालावधीच बंद होताना पाहिले आहेत. ‘मी हाय कोळी’ सुरू करण्यापूर्वी हॉटेल इंडस्ट्रीचा बारकाईने अभ्यास केला. त्या क्षेत्राची कार्यपद्धती जाणून घेतली. त्यानंतरच ‘मी हाय कोळी’ सुरू करण्यासाठी सरसावले. रेस्टॉरंटच्या कार्यपद्धतीत जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली. कोळी खाद्यपदार्थांच्या ऑथेंटीसिटी आणि चवीच्या बाबतीत तडजोड केली नाही. मॅकडोनाल्ड, डॉमिनोजच्या जशा साखळ्या आहेत तशी ‘मी हाय कोळी’ची आऊटलेट्स सुरू करायची आहेत. त्यासाठी मी झटत आहे. आजच्या घडीला ‘मी हाय कोळी’ला प्रत्येक महिन्याला दहा हजार ग्राहक भेट देतात.
एखाद्याला प्रेमाने खायला करून घालणे आहे कोळी बांधवांचा स्थायीभाव आहे. हाच स्थायीभाव मनीषाने अचूकरीतीने उचलला आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपल्या व्हेंचरचे अस्तित्व आपले खासगी आयुष्य सांभाळून टिकवून ठेवणे सोप्पे नाही. मात्र ते मनीषाने अचूकरीतीने केले आहे. त्यामुळेच तर ती ‘लेडी बॉस’ ठरली आहे. तसेच कोळी खाद्यसंस्कृती लोकप्रिय करणारी अन्नपूर्णा म्हणून प्रसिद्ध झाली आहे.