रवींद्र तांबे
शालेय जीवनात अभ्यास करीत असताना शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम व वर्षभरातील सुट्ट्यांचा विचार करून विद्यार्थ्यांनी स्वत: वर्षभराचा अभ्यास आराखडा तयार करावा. जरी वर्षाचा आराखडा तयार केला तरी प्रत्येक महिन्याचा स्वतंत्र आराखडा असावा. म्हणजे एका महिन्यातील प्रगतीचा अंदाज घेऊन दुसऱ्या महिन्यात योग्य वेळी त्यात बदल करू शकतो. तेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात अभ्यास आराखड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विषयाचा अभ्यास आराखडा तयार केल्यामुळे अभ्यासक्रम पाहताना वारंवार पुस्तक काढण्याची आवश्यकता नाही. आराखडा पाहिल्यावर आवश्यक माहिती विद्यार्थ्यांना ताबडतोब समजते. त्यामुळे विद्यार्थी तातडीने निर्णय घेऊ शकतो. निर्णय घेतल्यामुळे त्याला विशेष समाधान वाटते. कारण तो आराखडा त्यांनी स्वत: बनविलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केलेला एक प्रयत्न.
शैक्षणिक वर्षामध्ये अध्यापक वर्ग आपल्या शाळेचा कृती आराखडा तयार करतात त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपण शिक्षण घेत असलेल्या वर्गाचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन अभ्यास आराखडा तयार करावा. जेणेकरून त्यांना अभ्यास करणे सोपे जाईल. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचा ताण कमी होऊन बिनधास्तपणे नियमित अभ्यास करू शकतात. त्यासाठी प्रत्येक महिन्याचा अभ्यास आराखडा विद्यार्थ्यांना तयार करावा लागेल. अभ्यास आराखडा तयार करीत असताना कोणत्या विषयाचा कोणता अभ्यासक्रम आहे याची नकळत उजळणी होणार आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. जेव्हा प्रत्यक्षात अभ्यास करतात त्यावेळी त्याचा संदर्भ लागल्यामुळे चटकन समजण्यास सोपे जाते. हा अभ्यास आराखडा तयार करण्याचा मुख्य फायदा विद्यार्थ्यांना होतो. याचा परिणाम विद्यार्थी अधिक जोमाने अभ्यास करतात. अभ्यास आराखड्यामुळे अभ्यासाची अधिक गोडी निर्माण होते. यामुळे अभ्यासामध्ये सातत्य राहते.
सन २०२३-२४ हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळ-जवळ चार महिने पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जो अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे त्यावर एक परीक्षा सुद्धा झालेली आहे. त्यामुळे आपण मागील चार महिने जो अभ्यास केलेला आहे त्याची प्रगती विद्यार्थ्यांना समजली असेल. तेव्हा त्या प्रगतीचा गाजावाजा न करता त्याहीपेक्षा अधिक गुण कसे मिळविता येतील त्या परीने अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी रोज शाळेत जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक विषयाचा अभ्यास आराखडा तयार करावा. त्यामुळे अभ्यासक्रम समजणे सोपे जाते. तसेच कोणत्याही प्रकारचे दडपण येत नाही. विद्यार्थी खुल्या मनाने अभ्यास करू शकतात.
शिक्षकवर्ग आपले अध्यापनाचे काम चोक बजावत असतात ते सुद्धा अभ्यासाचा कृती आराखडा बनवून. तेव्हा विद्यार्थ्यांनी एका महिन्याचे दिवस किती? घरी किती तास असतो? शाळेत किती तास? जाण्या-येण्याचा कालावधी किती? इतर स्वत:ची तसेच घरची कामे गृहीत धरून आपल्याला अभ्यास करायला किती कालावधी मिळतो हे ठरवावे. त्यात खेळाला सुद्धा वेळ द्यावा. त्यानंतर आपले एकूण विषय किती? त्यातील आपल्याला कठीण व सोपे वाटणारे विषय कोणते याची वर्गवारी करून प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा हे सुद्धा आपणच ठरवायचे. त्यात वाचन, लेखन महत्त्वाचे असते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच जेव्हा पूर्ण वेळ घरी असू त्यावेळी जास्तीत जास्त विषयांच्या उजळणीसाठी वेळ द्यावा. तो सुद्धा आपल्याला त्या विषयाचा अभ्यासक्रम पूर्णत: समजला का याची खात्री करून घ्यावी. म्हणजे अभ्यास करणे सुलभ होते. यावरून आपला अभ्यास किती झाला याची सुद्धा कल्पना येते. त्यात अवांतर वाचन व वर्तमानपत्रांकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे दैनंदिन घडामोडी समजत असतात.
वेळेनुसार अभ्यास आराखडा तयार केला तरी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी सुट्टीचा फायदा घेत अभ्यासाला अधिक वेळ द्यावा. जो विषय आपल्याला कठीण वाटत असेल तो इतरांकडून समजून घ्यावा. जर विषय समजला तर पुढील अभ्यास करीत असताना मनावर दडपण येत नाही. एखादे उदाहरण चुकीच्या पद्धतीने समजून घेऊ नये. आपल्या शंकांचे निरसन झाले की अधिक जोमाने विद्यार्थी अभ्यास करतात. हा अभ्यास आराखड्याचा प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना फायदा होतो. तसेच तो इतर सवंगड्यांना समजून सांगू शकतो. असा दुहेरी फायदा विद्यार्थ्यांना होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अभ्यास आराखडा अतिशय महत्त्वाचा असतो. अभ्यास आराखडा तयार करून अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या मनात ताणतणाव वाढत नाही. उलट उत्साहाने अधिक वेळ अभ्यास करतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी जीवनात आपण शिक्षण घेत असलेल्या वर्गाचा अभ्यास आराखडा तयार करून अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून उज्ज्वल यश संपादन करू शकतात. त्यासाठी अभ्यास आराखडा अतिशय महत्त्वाचा असतो. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे. कारण अभ्यास आराखड्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्य संपादन केल्यामुळे त्यांची निर्णयक्षमता वाढण्याला मदत होते. तेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात शालेय अभ्यासक्रमाबरोबर अभ्यास आराखड्याला महत्त्व आहे.