
राज्यकर्त्याला सौंदर्यदृष्टी असावी लागते तरच शहरे सुंदर दिसतात
आर्किटेक्ट दिनानिमित्त राज ठाकरे यांची चौफेर टोलेबाजी
पुणे : शहरे सुंदर दिसण्यासाठी सौंदर्यदृष्टी मुळात सत्तेत असावी लागते. राजा किंवा राज्यकर्त्याला सौंदर्यदृष्टी असेल तरच ती खाली उतरते. नाहीतर तुम्ही खाली कितीही टाहो फोडा, त्याचा काहीही उपयोग नाही. आपल्या महापालिकेत, राज्य सरकारमध्ये डेव्हलपमेंट प्लानिंग होतं पण टाऊन प्लॅनिंग होत नाही. यामध्ये इंजिनिअरला जेवढं महत्व आहे तेवढं आर्किटेक्टला नाही. आपल्याकडे रस्ते बांधले जातात पण कोणत्या प्रकारचे रस्ते बांधायला हवेत याचा विचार केला जात नाही. फक्त पैसे आहेत म्हणून रस्ते बांधले जातात, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. आज जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त (World Architecture Day) पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर (Deepak karanjikar) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे चौफेर टोलेबाजी केली.
मी एका चांगल्या शहरात जगतो आहे असं जर मला वाटलं तर त्या जगण्याला अर्थ आहे. कारण तुम्ही रस्त्यानं जात असताना खड्ड्यात पाय पडतो, पाय मुरगळतोय, फुटपाथ नीट मिळत नाहीत, आणखी काय काय होतं! याला जगणं म्हणत नाहीत तर तुमचा जन्म झालाय म्हणून जगता. अनेक तरुण-तरुणी म्हणतात की आम्हाला परदेशात जायचंय, पण का जायचंय? शिक्षण तर त्यांना इथेही मिळतंय पण सभोवतालचं वातावरण त्यांना मिळत नाही. त्यांना चांगल्या सुविधा मिळतात म्हणून ते जातात. गाडगेबाबांच्या राज्यात आपल्याला लोकांना स्वच्छता शिकवावी लागते. प्रत्येकाने आपापला परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी समाधान मिळेल, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी लंडनमधील त्यांचा एक किस्सा सांगत म्हटलं, लंडनच्या सरकारला तिथल्या काही लोकांसाठी एक कॉलनी बांधायची होती आणि त्यासाठी टेंडर्स निघाले होते. त्यात काही क्लॉजेस होते. एकात म्हटलं होतं की, या कॉलनीत राहणार्या प्रत्येकाच्या घरात सूर्यप्रकाश आला पाहिजे. त्या सूर्यप्रकाशावर प्रत्येकाचा अधिकार आहे, राज्यकर्ते किती बारीक विचार करु शकतात, याचं ते उत्तम उदाहरण होतं. यामुळे चुकीच्या गोष्टी होणार नाहीत. तुम्ही परदेशात गेलात तर एकसारख्या इमारती तुम्हाला दिसायला लागतात. पण आपल्याकडे शिवाजी पार्कमध्ये मागच्या वेळी हेरिटेज बांधण्यासाठी बांधकाम बंद केलं. पण एक बिल्डींग दुसर्यासारखी नाही तर हेरिटेज कुठून येणार? असा टोला राज टाकरेंनी लगावला.
बीडच्या सर्किट हाऊसचं हास्यास्पद आर्किटेक्चर
पुढे राज ठाकरे यांनी बीडच्या सर्किट हाऊसचा किस्सा सांगताना म्हटलं, मी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरलो, सर्किट हाऊसेस पाहिली, तिथे मोठमोठी बाथरुम्स असतात. आता काय त्यात पळत पळत आंघोळ करायची का? पण मागचा पुढचा विचार हे इंजिनीअर करत नाहीत. त्यानंतर बीडमध्ये सर्किटहाऊसमध्ये गेलो होतो. तिथल्या बेडरुमध्ये गेलो. बेडरुमचा मोठा हॉल होता आणि मधोमध पलंग. समजा नवविवाहित दाम्पत्य या बेडरुममध्ये गेलं तर पकडापकडी खेळणार का? मध्ये पलंग ठेवणार का? पण बीडच्या सर्किट हाऊसमध्ये तो आहे, असा टोमणा राज ठाकरे यांनी लगावला.