
पुण्याच्या मुलाखतीत राज ठाकरे यांचं रोखठोक भाष्य
पुणे : आज जागतिक आर्किटेक्ट दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर (Deepak karanjikar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत घेतली. यावेळी 'राज्यकर्त्याला सौंदर्यदृष्टी असावी लागते तरच शहरे सुंदर दिसतात' असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. याचबरोबर त्यांनी प्रश्नांची उत्तरे देताना टाऊन प्लानिंग, आर्किटेक्ट्सना आपल्याकडे दिलं जाणारं कमी महत्त्व अशा मुद्दयांवर भाष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले, मुंबई दर्शनच्या बसेसमध्ये तुम्ही गेलात तर तारापोरवाला मत्स्यालय सोडून सर्व ब्रिटीशकालीन वास्तू दाखवल्या जातात. नवीनमध्ये केवळ शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानचं घर याच गोष्टी असतात. कधी वेळ मिळाला तर शिवाजी पार्क, दादर, माहिम, परळ, नायगांव, वडाळा याचा टॉप व्ह्यू बघा. याचा संपूर्ण टाऊन प्लानिंग ब्रिटिशांच्या काळातील आहे. हे काही रॉकेट सायन्स नाही. किती लोकसंख्या असली पाहिजे आणि त्या लोकसंख्येला लागणार्या गोष्टी कोणत्या याचा विचार झाला पाहिजे.
लोकांना लागणार्या गोष्टींमध्ये मार्केट, थिएटर, शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, बागा या अगदी ठराविक गोष्टी असतात, त्या तुम्हाला सांगाव्या लागतात? आज तुम्ही तेच मुंबईचं टाऊन प्लानिंग जे ब्रिटीशकालीन आहे ते बघा, त्यांनी तर परळला एक हॉस्पिटलचा हब उभा केला. पण स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत अशा गोष्टी कुठे झाल्या? कुठे अशा प्रकारचे हब उभे राहिले? कुठे हॉस्पिटल्स उभे राहिले? आणि आता तर जेवढं काही सरकारने उभं केलं आहे त्या सगळ्याचं खाजगीकरण होतंय. पण जे परदेशात होतं असं काहीही आपल्याकडे होत नाही. त्यामुळे तुम्ही राजकर्त्यांशी बोललं पाहिजे, असं तिथे उपस्थित आर्किटेक्टसना उद्देशून राज ठाकरे म्हणाले.
पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही
मी गेले २५ एक वर्षे पुण्यात येतोय. पुण्यात ही गोष्ट मी अनेकदा माझ्या भाषणातून सांगितली आहे. मुंबई बरबाद व्हायला एक काळ गेला. पुणं बरबाद व्हायला वेळच लागणार नाही. आज पुणे कुठे राहिलं आहे? पाच पाच पुणे आहेत. एक हिंजवडीचं वेगळं, नदीकाठचं वेगळं, विमाननगरचं वेगळं असं पुणे झालं आहे. पुणे म्हणून कुठं राहिलंय? याचं कारण म्हणजे राज्यकर्त्यांचं शहरांकडं लक्षच नाही. टाऊनप्लानिंगचं कोणाला काही घेणं देणं नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.