
- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
तशी ती मुंबईकर, शालेय व कॉलेज शिक्षण मुंबईमध्ये झालं. तिने वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. अभिनयाची नाट्य शिबिरे तिने केली; परंतु घरून वडिलांचा विरोध होता. त्यामुळे तिने त्यावेळी अभिनयाला मुरड घातली; परंतु नंतर सासरी प्रोत्साहन मिळाल्यामुळे परत तिने अभिनयाची कास धरली. आज तिला अभिनय करायचाय, विविध भूमिका साकारायच्या आहेत, ती अभिनेत्री आहे प्रीती मल्लापूरकर.
पुण्याच्या एफ.टी.आय.मधून तिने एक कार्यशाळा केली. ‘बदल’ नावाची शॉर्ट फिल्म तिने बनवली. त्याच फार कौतुक झालं होतं. त्याचा विषय देखील चांगला होता. भारत देश पुढारलेला आहे असे आपण म्हणतो; परंतु आज देखील काही जुन्या रूढी पाळल्या जातात. विधवा स्त्रीला आज देखील हळदीकुंकूच्या समारंभाला पुढे केलं जात नाही. ही समाजाची मानसिक स्थिती बदलणे आवश्यक आहे. हा महत्त्वाचा विषय होता; परंतु नंतर तिला जाणवलं की, फिल्म मेकिंग आपला प्रांत नाही. आपली आवड अभिनय आहे. त्यामुळे अभिनयाची वाट धरलेली बरी.
अभिनयासाठी तिने वेगवेगळ्या ठिकाणी ऑडिशन दिल्या. दरम्यान तिला एक महत्त्वाचा चित्रपट मिळाला. त्या चित्रपटाचे नाव होते ‘ईश्वरी’. यामध्ये ईश्वरीच्या मुख्य भूमिकेत ती होती. मूकबधिर मुलीची कथा त्यात दाखविण्यात आली होती. या चित्रपटाला खूप पारितोषिके मिळाली. दिल्लीमध्ये दादासाहेब फाळके अॅवॉर्ड मिळाले; परंतु अधिकृतरीत्या तो चित्रपट रिलीज झाला नाही.
तिच्या जीवनात एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट म्हणून एक चित्रपट आला. त्या चित्रपटाचं नाव आहे ‘आतुर.’ या चित्रपटामध्ये कुमुदिनी नावाच्या गृहिणीची भूमिका तिने साकारली आहे. सस्पेन्स, थ्रिलर व मनोरंजनपर असा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग दादा कोंडके स्टुडिओत, भोर, पुणे येथे झाले. धग, हलाल, भोंगा या चित्रपटाचे दिग्दर्शक शिवाजी लोटण-पाटील या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. त्यांचा हा आतापर्यंतचा खूप वेगळा व चांगला चित्रपट असेल, असे तिचे मत आहे.
‘मुक्काम पोस्ट देवाचे घर’ हा तिचा आगामी चित्रपट आहे. यामध्ये जिल्हाधिकारीच्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ती आहे. तिला पियानो वाजविण्याचा छंद आहे. वेगवेगळ्या देशांत गेल्यावर तिथल्या वेगवेगळ्या गाड्या चालविण्याची तिला आवड आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची तिची इच्छा आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळती-जुळती भूमिका मिळण्याची तिची इच्छा आहे. ती भूमिका मिळाल्यास त्याचं सोनं करण्याची तिची तयारी आहे.