नवी मुंबई : गेली अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेली नवी मुंबई मेट्रो अखेर येत्या ३० ऑक्टोबर रोजी धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यापूर्वी गत १३ व १४ ऑक्टोबर व त्यानंतर १७ ऑक्टोबरची तारीख नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी निश्चित केली जात होती. परंतु, पंतप्रधानांच्या व्यस्त कार्यक्रमांमुळे आजतागायत हा योग जुळून आलेला नाही. त्यामुळे येत्या ३० ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांचा संभाव्य नवी मुंबई दौरा आखण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनासह नवी मुंबईतील विविध शासकीय प्राधिकरणे पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी करण्यात गुंतले आहेत.
विशेष म्हणजे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह त्याच दिवशी राज्य शासनाद्वारे नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ नवी मुंबईतून केला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेवर आयोजित या नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित महिलांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत. या महिला मेळाव्यास संपुर्ण राज्यातून विविध महिला बचत गटातील १ लाखाहून अधिक महिला उपस्थित राहण्याकरिता शासन यंत्रणा दिवसरात्र झटत आहेत.
यासाठी शनिवारी खारघर येथील गोल्फ कोर्सवर सर्व शासकीय अधिकाऱयांची बैठक आयोजित करण्यात आली. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी करण्याची जबाबदारी संपुर्णत सिडको व्यवस्थापनावर असणार आहे. तर जिल्हाधिकारी रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभाची तयारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (एमएसआरएलएम-उमेद) आदी शासकीय प्राधिकरणे करणार आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra