Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीठाणे-बोरिवली दरम्यान प्रवास अवघ्या काही मिनिटात!

ठाणे-बोरिवली दरम्यान प्रवास अवघ्या काही मिनिटात!

ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास मिळाली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर कमी होणार आहे. ज्यामुळे या भागातील प्रवासाच्या वेळेत सुमारे १ तासांची बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी महत्त्वाची असलेली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी प्राप्त आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या २२ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगरात पूर्व आणि पश्चिम जलद जोडणी करणारा हा प्रकल्प कसा असेल?

मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या सदर प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये १०.२५ किमीचा बोगदा आणि १.५५ किमीचा पोहचमार्ग असा १३.०५ मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे १२ किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस २+२ मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक ३०० मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक २ पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे १२ किमी लांबीच्या प्रकल्पातील ४.४३ किमी लांबीचा ही ठाणे जिल्ह्यातून तर ७.४ किमी लांबी ही बोरीवलीमधून प्रस्तावित आहे. प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जातील. तसेच नियमांच्या तरतुदींनुसार बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे. प्रकल्पाची किंमत ही सुमारे रुपये १६,६०० कोटी इतकी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा ही समावेश आहे. प्रकल्पाची व्याप्ती आणि चॅलेंजस पाहता सदर प्रकल्प हा २ स्थापत्य आणि १ पॅकेज सुनियोजित वाहतूक प्रणाली संबंधित कामे अशा एकूण ३ पॅकेजेस मध्ये विभागला गेला आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि पूर्वेकडील ठाणे जिल्ह्याला जोडणारा सुमारे हा १२ किमीचा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. ज्यामध्ये प्रदेशाची वाहतूक व्यवस्था सुधारून पर्यावरणीय स्थैर्य राखत नागरीकांचे जीवन आणखीन सुसह्य करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व-पश्चिम लिंक रोड तयार होऊन राष्ट्रीय महामार्ग ३ आणि ८ मधील अवजड व्यावसायिक वाहतुकीसाठी एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर म्हणून कार्यरत राहील. सद्यःस्थितीत ठाणे ते बोरिवली दरम्यान घोडबंदर मार्ग २३ किमी अंतराच्या प्रवासासाठी सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळी एक ते दोन तास आणि इतर वेळी किमान एक तास लागतो. एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाची लक्षणीयरीत्या बचत होऊन तासांचा प्रवास काही मिनिटांत करता येणार आहे. ज्यामुळे सामान्य प्रवाशांना, अवजड वाहतुकीस आणि व्यवसायांना मोठा दिलासा मिळेलच पण कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन देखील होणार आहे.

“एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या ठाणे – बोरीवली भूमिगत भुयारी मार्ग प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याने प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा साध्य झाला आहे. मुंबई आणि ठाणे सारख्या गजबजलेल्या शहरात भूमिगत बोगद्याचे बांधकाम हा सध्याच्या रहदारीच्या आव्हानांवर उपाय तर आहेच पण शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा उपक्रम शहरी नियोजनाच्या दृष्टिकोणातून पर्यावरण संरक्षणासह प्रगतीचा समतोल साधण्यासाठी आणि भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एक मॉडेल म्हणून अधोरेखित होईल.” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से., म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -