
ड्रग्ज प्रकरणी फडणवीसांकडून थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा
मुंबई : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ललित पाटीलबाबत गंभीर गौप्यस्फोट करून या प्रकरणात ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंची कोंडी केली आहे.
प्रसारमाध्यमांनी ललिल पाटील प्रकरणाबाबत विचारणा केली असता, शिवसेना कनेक्शन दाखवत फडणवीस म्हणाले की, ललित पाटील याला १०-११ डिसेंबर २०२० रोजी अटक झाली. ज्यावेळेस अटक झाली त्यावेळी तेव्हा तो उद्धव ठाकरे यांच्या नाशिकचा शिवसेनेचा प्रमुख होता. त्याला अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. गुन्हा मोठा असल्याने ललित पाटीलला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. मात्र कोर्टाने पोलीस कोठडी सुनावताच ललित पाटील हा ससूनला अॅडमिट झाला. पूर्ण १४ दिवस तो ससूनमध्ये अॅडमिट होता. मात्र सरकारी पक्षाकडून ललित पाटलीची चौकशी केली गेली नसल्याबाबत कोर्टाला अर्जही करण्यात आला नाही. शेवटी १४ दिवसांनी त्याचा एनसीआर करून टाकला. आता गुन्ह्यात केस उभी करायची तर काय उभी राहणार? गुन्हेगाराची चौकशीच झालेली नाही, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, माझा प्रश्न आहे की, ललित पाटीलची चौकशीच झालेली नाही. त्याला कोण जबाबदार होते. त्यावेळचे मुख्यमंत्री जबाबदार होते? की गृहमंत्री जबाबदार होते? कुणाचा दबाव होता. कुणाच्या दबावाखाली हे झालं? कुणाचे संबंध होते? याबाबत मी आज काही बोलणार नाही. आता तुम्ही ठरवा, कुणाची नार्को टेस्ट झाली पाहिजे. ललित पाटील हा शिवसेनेचा नाशिकमधला शहरप्रमुख होता म्हणून त्याला ही सवलत मिळाली का, कुणाच्या फोनमुळे मिळाली, मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या की आणखी कुणाच्या, या प्रकरणात आणखी अनेक गोष्टी समोर येणार आहेत, असे सूचक संकेतही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.