
पुणे पोलिसांनीही अॅक्शन मोडमध्ये येत दोघींनाही घेतले ताब्यात
नाशिक : पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) पळालेल्या ड्रग्जमाफिया ललित पाटीलने (Lalit Patil) तब्बल १५ दिवस पोलिसांच्या हातावर तुरी दिली. यानंतर अखेर काल चेन्नईमधून त्याला ताब्यात घेण्यात मुंबई पोलिसांना (Mumbai Police) यश आले. ललित पाटील पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर आता अनेक खुलासे होत आहेत. कधी राजकारण्याचं नाव या प्रकरणाशी जोडलं जात आहे, तर कधी ललितला मदत करणार्या नवनवीन व्यक्ती या प्रकरणात समोर येत आहेत.
पोलिसांच्या तपासात नाशिकमध्ये पळून गेलेला ललित पाटील एका महिलेकडे वास्तव्यास होता आणि यात सात किलो चांदी आणि २५ लाख रोकड एवढी प्रचंड आर्थिक देवाणघेवाण झाली असल्याचे समोर आले. यानंतर आता पुणे पोलिसांनीही (Pune police) अॅक्शन मोडमध्ये येत आणखी एका गोष्टीचा तपास केला आहे. नाशिकमध्ये असताना ललित पाटील आपल्या दोन मैत्रिणींच्या संपर्कात होता आणि त्यांच्याकडेच त्याने रोख रक्कम आणि सोने ठेवायला दिले होते, या बाबीचा खुलासा करत पोलिसांनी दोन्ही मैत्रिणींना ताब्यात घेतले आहे.
ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या दोघींना पोलीस आज न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावं आहेत.
दोन मैत्रिणींनी कशी केली मदत?
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलं आहे. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. मेफेड्रॉन विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील काही वाटा ललित पाटील या दोघींवर खर्च करत होता. ललित पाटीलचे लग्न झाले होते मात्र त्याच्या बायकोचा अपघाती मृत्यू झाला होता. सध्या ललितच्या या दोन्ही मैत्रिणींना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.