
भाईंदर : मीरा रोड येथे काशीमीरा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या इंटरनॅशनल बेकिंग कंपनी नावाच्या केक, पेस्ट्रीज, चॉकलेट अशी बेकरी उत्पादन करणाऱ्या दुकानात १३ ऑक्टोबर रोजी सकाळी हेल्मेट घालून घुसून दुकानदारावर बंदूक रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूण हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.
काशीमीरा भागातील इंटरनॅशनल बेकरी नावाच्या दुकानात हेल्मेट घालून शिरलेल्या हल्लेखोराने कर्मचारी चंद्रकांत कोंडगुले (२७) याच्यावर पिस्तूल रोखले. त्याने ३ वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतू पिस्तूल लॉक झाल्याने गोळी सुटली नाही, नंतर त्याने दुचाकीवरून साथीदारासह पळ काढला.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे पिस्तूल रोखणारा हल्लेखोर अकबर अली मोहम्मद शाफिक शेख (वय २८), याला धारावी येथून अटक केली. हल्ल्यासाठी वापरलेली दुचाकी, पिस्तूल तसेच दुचाकीवरील साथीदार याचा पोलिस शोध घेत आहेत.
आरोपी अकबर शेख याला ठाणे न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आदीसारखे अन्य गुन्हे दाखल असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.