Friday, October 4, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीRituals : संस्कारकर्मांचा मूळ हेतू...

Rituals : संस्कारकर्मांचा मूळ हेतू…

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

धार्मिक संस्कार फार चांगले असतात, कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते. प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच. ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही. मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो. खरे म्हणजे कोणतेच कर्म यथासांग घडत नसते. पण त्यातल्या त्यात, संस्कारकर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे. त्यामध्ये जिथे कमी पडेल तिथे भगवंताचे स्मरण करावे, कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूल हेतू आहे. संस्कार करीत असताना जरूर असलेला धार्मिक विधी तर करावाच, पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत, त्यांना जेवायला बोलवावे. लौकिक मात्र वाढवू नये. वाईट ते सोडणे आणि चांगले ते धरणे हाच संस्काराचा मुख्य हेतू.

संस्कार हे भगवंताचे स्मरण करून देतात. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. ‘आम्हाला बंधने नकोत’ असे म्हणणारे लोक वेडे आहेत. बंधनामुळेच आपल्या धर्माला सनातनत्व आले आहे. म्हणून बंधनांना अतिशय महत्त्व आहे. धर्म हा कधीच बुडत नसून बंधने बुडत जातात. सध्या बंधने बुडत चालली आहेत. पूर्वी धर्मावर श्रद्धा होती, म्हणून इतक्या सुधारणा नसूनसुद्धा स्वास्थ्य होते. पण आज बाहेरच्या जगात पुष्कळ सुधारणा झाल्या तरी त्या सुधारणांना धर्माचा पाया नसल्यामुळे मानवाला स्वास्थ्य नाही. अलीकडे काही लोक असे म्हणतात की, समाज जसा बदलेल तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजेत. पण अध्यात्मविद्या असे सांगते की, नीतीचे नियम कायमच आहेत. ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे. एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल, पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभेल. धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय. धर्म समाजाला संस्काराच्या रूपाने धरून ठेवतो.

व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय आणि जो परमार्थाला उपयोगी तोच खरा आणि योग्य व्यवहार होय. भगवंत आम्हाला हवा आहे असे म्हटले, तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते. जग आडवे का येते, तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणून जगाशी वागताना आम्हाला निःस्वार्थीपणाने व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला सुटत नाही. हे सर्व नाहीसे होण्यासाठी आम्ही निःस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे. त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे, आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे. जन्माला येऊन काही करणे असेल, तर भगवंताला न विसरता कर्मे करावी, म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -