
झिम्माचा सिक्वेल येतोय प्रेक्षकांच्या भेटीला...
मराठीत एकदा महिलांना चित्रपट आवडला की तो हिट होतो. पूर्वीच्या काळी अलका कुबलचे सर्व चित्रपट देखील बायकांनीच हिट केले. त्यानंतर नुकताच प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळवलेल्या 'बाईपण भारी देवा'ला (Baipan Bhari Deva) महिला प्रेक्षकांची चित्रपटगृहात भरभरुन गर्दी होत होती. असाच एक बायकांनी डोक्यावर घेतलेला चित्रपट म्हणजे 'झिम्मा' (Jhimma). पण या चित्रपटाला केवळ महिलाच नव्हे तर पुरुष प्रेक्षकांनीही तितकीच पसंती दर्शवली.
'झिम्मा' सिनेमा संपला तेव्हाच या चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) 'झिम्मा २' (Jhimma 2) ची घोषणा केली होती. यानंतर आता या चित्रपटातील कलाकार मंडळींनी आणि तंत्रज्ञांनी आपल्या सोशल मीडियावरुन 'झिम्मा २' चे मोशन पोस्टर शेअर करत अधिकृतरित्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनीदेखील आपल्या सोशल मीडियावर चित्रपट रिलीज करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
"पुढच्या ट्रीपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली!", असं कॅप्शन या पोस्टला दिल्याने प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आणखी वाढली आहे. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कलाकारांच्या टीम मध्ये काही नवीन सदस्यही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे प्रेक्षक आधीच आपल्या व्यग्र वेळापत्रकातून थोडा वेळ बाजूला काढून या ट्रिपला जाण्याची तयारी करतील, यात शंका नाही.
View this post on Instagram