
बोईसरमध्ये नवरात्रोत्सवाला गालबोट
ग्रामपंचायतीच्या निवडणूकी पूर्वी गुन्हेगारांना तडीपार करण्याची नागरिकांची मागणी
बोईसर : बोईसरमध्ये नवरात्रोत्सवात किरकोळ कारणावरून तरुणांच्या दोन गटात वादनिर्माण होऊन तुंबळ हाणामारीची घटना काल रात्री घडली. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी दोन्ही गटातील पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
बोईसरमधील शुक्ला कंपाऊंड परीसरात बुधवारी रात्री (दि.१८) च्या सुमारास एका सार्वजनिक नवरात्रोत्सवात गरबा खेळण्याच्या शुल्लक वादातून तरुणांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. लाकडी दांडके आणि ठोशा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आल्याने या हाणामारीत सुरज सुनील सिंग (वय २०), सूर्या तेवर (वय २०) फैयाज शेख हे जखमी झाल्याने त्यांना बोईसरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हाणामारीप्रकरणी दोन्ही गटांनी बोईसर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यात दोन्ही गटांतील सूरज सिंग, अजित मिश्रा, संजीत मिश्रा, आशीष प्रसाद, मनीष यादव, अभिषेक झा, अमित यादव व दुसया गटातील नीरज यादव, सूर्या तेवर, फैयाज शेख, सोनू यादव, जुनेद, आदित्य गुप्ता आणि समीर शहा यांच्यावर बोईसर पोलिस ठाण्यात विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, अधिक तपास प्रभारी अधिकारी उमेश पाटील यांच्या नेतृवाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपाली लांबाते या करीत आहेत.
बोईसर परीसरात सण-उत्सवांच्या काळात काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या समाजकंटकांकडून वारंवार कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अशा समाजकांटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या सरावली ग्रामपंचायतीची निवडणूक तोंडावर आली असून अनेक गुन्हे दाखल असलेल्या आणि वारंवार कायदा सुव्यवस्था बिघडवून पोलिसांना आव्हान देणा-या सराईत गुन्हेगारांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची मागणी नागरीकांकडून होत आहे.