१० कोटीची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप, चौकशीसाठी आझाद मैदानावर उपोषण
नाशिक : नाशिक जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी आपल्या अधिकार व पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्या कुटुंबियांच्या तसेच त्यांच्या आप्तेष्टांच्या नावे १० कोटीहुन अधिक बेहिशेबी मालमत्ता जमा केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी यांनी द्यावे या मागणीसाठी १६ ऑक्टोबरपासून आझाद मैदान मुंबई येथे इमान मुसा पटेल यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा मुद्रांक अधिकारी व त्यांचे उपनिबंधक हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकताच लँड जिहादचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या कार्यालयाचे व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मालेगाव, नानावली व वडाळा येथे कोट्यावधी रुपयांच्या लँड जिहाद चे काम उपनिबंधकांच्या सहकाऱ्याने झाल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात मालेगाव येथील उपनिबंधकावर चौकशी लावण्यात आली असून लवकरच त्याचे निलंबन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु या सर्व प्रकरणामागे जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे असून त्यांच्यावरच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नुकतेच आझाद मैदानावर एका कार्यकर्त्यांने उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व वरिष्ठ स्तरावर मंत्रिमंडळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कैलास दवंगेंचं म्हणणं काय?
दरम्यान, कैलास दवंगे म्हणाले, नियमबाह्य कामे करणाऱ्यांवर करवाई केलेल्या लोकांकडून अशा लोकांना हाताशी धरून दबावाचा हा स्टंट आहे. यापुढेही कडक करवाई खंबीरपणे चालू राहील. गुन्हेगारांना कोणताही थारा देणार नाही. बेकायदेशीर व नियमबाह्य नोंदणी कामे होणार नाहीत. अशा प्रवृत्तींना काही लोक रसद पुरवत असावेत. नोंदणीसाठी यांचा कधीच काही संबंध आलेला नाही. यापुढे कायदेशीर सल्ला घेऊन कार्यवाहीचा पर्याय खुला आहे.
उपोषणकर्ते इमान पटेल काय म्हणाले?
इमान पटेल म्हणाले, नाशिक जिल्हा मुद्रांक अधिकारी कैलास दवंगे यांनी आपल्या कार्य काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा महा भ्रष्टाचार केला आहे. त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती आहे. यासंदर्भात महसूल मंत्री यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे. भ्रष्टाचाराचे सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. त्यामुळेच आझाद मैदानावर त्यांच्या विरोधात उपोषणाला बसलो आहोत. न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra