केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) काल इस्राइली दहशतवाद्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यावर शरद पवार (Sharad pawar) यांनी टीका केली. यासंबंधी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.
नारायण राणे म्हणाले, आदरणीय शरद पवार यांनी इस्राइल व हमासबद्दल केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन. दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरोधात नसून तो माणुसकीविरोधात असतो अशी भूमिका आदरणीय पंतप्रधानांनी घेतली होती. जी-२० आणि संयुक्त राष्ट्र यांसारख्या व्यासपीठांवर देखील त्यांनी आपली ही भूमिका मांडली आहे. पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवाद्यांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. मग दहशतवादाविरोधी भूमिका घेणं चुकीचं आहे, असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? पॅलेस्टाईन आणि दहशतवाद एकच आहे असं पवार साहेबांना म्हणायचं आहे का? असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
शरद पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात बरीच मंत्रीपदं भूषवली. मुख्यत्वे संरक्षण मंत्री, कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. मला त्यांना आठवण करुन द्यायची आहे की, १९९३ दंगलीच्या काळात जेव्हा साखळी बॉम्बब्लास्ट झाले त्यात ५४ मृत्यूमुखी पडले तर १४०० जण जखमी झाले. त्या वेळी ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी १३ बॉम्बब्लास्ट मस्जिदीमध्ये झाल्याची खोटी बातमी देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता का? असा गौप्यस्फोट नारायण राणे यांनी केला.
तुष्टीकरणाच्या धोरणामुळे आजवर देशावर अनेक संकटे आली. आज तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहेत का? दहशतवादाने होरपळलेल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? असे सवाल उपस्थित करत नारायण राणे यांनी शरद पवारांना खडसावले.