नवी दिल्ली: आयसीसी वनडे विश्वचषकात धक्कादायक निकालाची नोंद सुरूच आहे. आधी अफगाणिस्तानच्या संघाने माजी विजेत्या इंग्लंडला हरवले आणि त्यानंतर आता नेदरलँड्सने आपल्यापेक्षा चांगले रँकिंग असलेल्या द. आफ्रिकेला विश्वचषकात मात देत धक्कादायक निकालाची नोंद केली.
मंगळवारी १७ ऑक्टोबरला खेळवण्यात आलेल्या सामन्याआधी कोणी अपेक्षाच केली नव्हती की असे काही होईल. खरंतर आतापर्यंत टॉप ८मधील संघाना याआधीही अशाच प्रकारचे धक्कादायक पराभव सहन करावा लागला आहे. मात्र असा एक संघ आहे ज्यांना असा धक्का बसलेला नाही.
भारतात खेळवल्या जात असलेल्या आयसीसी वनडे विश्वचषकात आतापर्यंत दोन वेळा धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. सुरूवातीच्या १५ सामन्यांमध्ये अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स या संघांनी आपल्यापेक्षा बलाढ्य संघांना नमवत हम भी कुछ कम नही है हे दाखवून दिले.
माजी गतविजेत्या इंग्लंडला अफगाणिस्तानच्या संघाने ६९ धावांनी हरवले तर तीनच दिवसांत नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला ३८ धावांनी हरवले. आतापर्यंत आयसीसी वनडे विश्वचषकात टॉप ८ संघांपैकी एकच असा संघ आहे जो या उलटफेराची शिकार झालेला नाही.
आतापर्यंत सर्वाधिक धक्कादायक पराभव स्वीकारलेला संघ म्हणजे इंग्लंड आहे. या स्पर्धेत ५ वेळा इंग्लंडच्या संघाला असा पराभव सहन करावा लागला. बांगलादेशने दोनवेळा, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध प्रत्येकी एक वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ४ वेळा असा धक्कादायक पराभव मिळाला. दोनवेळा बांगलादेशने, एकदा झिम्बाब्वे आणि एकदा नेदरलँडने त्यांना हरवले. वेस्ट इंडिजच्या टीमला तीनवेळा अशा पद्धतीने हरवण्यात आले. केनिया, आयर्लंड आणि बांगलादेशकडून विंडीजचा संघ याआधी पराभूत झाला आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोनही संघ दोनवेळा या उलटफेरीची शिकार झाले आहेत. टीम इंडियाला बांगलादेश आणि झिम्बाब्वेकडून हार पत्करावी लागली होती तर पाकिस्तानला आयर्लंड आणि बांगलादेशने हरवले होते. ऑस्ट्रेलियाला झिम्बाब्वेने हरवत धक्कादायक निकाल नोंदवला होता.
न्यूझीलंड असा एकमेव संघ आहे ज्यांना अद्याप कोणी धक्कादायक पराभवचा धक्का दिलेला नाही.