इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लबमध्ये नुकताच समाजवाद्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला एकवीस समाजवादी संघटनांनी हजेरी लावली होती. जनता दल यु, जनता दल एस, राष्ट्रसेवा दल, राजद, शिक्षक भारती, काही मुस्लीम व ओबीसी नेतेही हजर होते. एकेकाळचे शिवसेनेचे विरोधक आमदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन समाजवाद्यांचा हा कुणबा जमवला होता. उबाठा सेनेच्या पक्षप्रमुखांना तिथे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलावले होते हे त्याचे वेगळेपण होते. जे जे भाजपा विरोधक आहेत, त्यांना शोधून गोळा करायचे हा उबाठा सेनेचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्रीपद गेले म्हणून सहानुभूती मिळवावी असा पक्षप्रमुखांनी प्रयत्न करून बघितला. गर्दी जमवली तरी मते मिळतील याची हमी कोणी देऊ शकत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा करून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवले. पण आपल्याच पक्षात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव झाल्याने मुख्यमंत्रीपद तरच गेलेच पण राज्याची सत्ता गमावण्याची पाळी पक्षप्रमुखांवर आली. सत्तेसाठी शिवसेनाप्रमुखांनी अशी अभद्र युती कधी केलीच नसती आणि हिंदुत्वाची कास कधी सोडली नसती.
शिवसेनाप्रमुखांना समाजवादी, कम्युनिस्ट यांच्याविषयी कमालीचा तिटकारा होता. समाजवादी हे तर नेहमी दुसऱ्याच्या विरोधात बोलतात किंवा विरोधात काम करतात. कधी काळी शिवसेनाप्रमुखांनी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर मुंबई महापालिकेत युती केली होती, पण भविष्यात ती टिकली नाही. काँग्रेससोबत जावे लागले, तर एक वेळ दुकान बंद करीन पण जाणार नाही अशी कणखर भूमिका मांडणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात उबाठा सेनेची फरफट काँग्रेसबरोबर होते आहे हे पाहून त्यांना स्वर्गातही वेदना होत असतील. वंचित बहुजन आघाडी, संभाजी नगर यांच्याबरोबरही उबाठा सेनेने जवळीक केली, केवळ भाजपाला विरोध म्हणून अशी केविलवाणी धडपड चालू आहे. बुडत्याला काडीचा आधार, अशी मराठीत म्हण आहे. तसे वंचित ते समाजवादी अशी वणवण उबाठा सेनेची होते आहे.
पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना जे समाजवादी पत्रकार त्यांना खत्रूड म्हणून हिणवत होते, आता तेच पत्रकार अडीच वर्षे त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले, त्यांची प्रतिमा चांगली होती असे गुणगान करीत आहेत. त्यांच्यासारख्या सभ्य राजकारण्याची महाराष्ट्राला गरज आहे, असे कौतुक समाजवाद्यांकडून ऐकायला मिळत आहे. गुजरातमधील मोदी स्टेडियमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर फुलांचा वर्षाव भाजपा करीत असेल तर समाजवादी काय बाहेरच्या देशातून आले आहे का? असा प्रश्न पक्षप्रमुखांनी मेळाव्यात बोलताना केला. लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलोत, मग तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? असा त्यांनी भाजपाला प्रश्न विचारला. बिहारमध्ये नितीशकुमार यांची सत्ता असली तरी राजद व काँग्रेसचा टेकू घेऊन ते सरकार चालवत आहेत. भाजपाच्या मदतीने ते किती वेळा मुख्यमंत्री व केंद्रात मंत्री झाले हे त्यांनीच जाहीरपणे सांगावे. नितीशकुमार यांचे सरकार ही तारेवरची कसरत करीत चालले आहे. कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलरची सत्ता होती. देवेगौडा पुत्राच्या हातून सत्ता निसटली. आता त्यांनी भाजपाबरोबर मैत्रीचा हात पुढे केला आहे.
महाराष्ट्रात मात्र भाजपाशी युती तोडून, हिंदुत्वाचा त्याग करून उबाठा सेना काँग्रेस ते समाजवादी असा खो-खो खेळत आहे. एमआयजी क्लबमध्ये २१ समाजवादी संघटना जमल्या होत्या. त्यांच्या मागे किती लोक आहेत, हे कोणी सांगू शकेल का? त्यामुळे अशा मेळाव्यातून काही निष्पन्न होणार नाही, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिष्याची गरज नाही. ना. ग. गोरे हे समाजवादी परिवारात नानासाहेब म्हणून ओळखले जात होते. केंद्रात जनता सरकार असताना ते ब्रिटनला भारताचे उच्चायुक्त होते. त्यांचा नेहमी ज्येष्ठ समाजवादी नेते असा उल्लेख केला जायचा. त्यांच्या मृत्यूनंतर उबाठा सेनेच्या मुखपत्रात त्यांच्याविषयी काय अग्रलेख आला होता, हे जरी पक्षप्रमुखांनी वाचले असते तरी समाजवाद्यांच्या मेळाव्याला येण्याचे धाडस केले नसते. शिवसेनाप्रमुखांची समाजवाद्यांविषयी काय भूमिका होती, याचे तो अग्रलेख म्हणजे जळजळीत उदाहरण होते. ना. ग. गोरे यांचे निधन झाले तेव्हा राज्यात शिवसेना- भाजपा युतीची सत्ता होती. तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी ना. ग. गोरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक अशा अर्थाची त्याची शब्दरचना होती. पण शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी समाजवादी नेत्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीनेही शिवसेनाप्रमुख कमालीचे भडकले होते.
मुख्यमंत्र्यांनी केलेले आपणास मान्य नाही, त्यांनी माफी मागावी, असे त्यांनी म्हटले होते. मधू दंडवते, मृणाल गोरे अशा अनेक समाजवाद्यांची हजेरी शिवसेनाप्रमुखांनी वेळोवेळी कडक शब्दांत घेतली होतीच. पण त्याचे स्मरण पक्षप्रमुखांनी ठेवले नाही. पुढील वर्षी २०२४ मध्ये विधानसभा, लोकसभा निवडणुका अपेक्षित आहेत. महापालिका निवडणूक ही उबाठा सेनेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. भाजपा विरोधक तितुका मेळवावा, हेच काम पक्षप्रमुखांनी चालवले आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली स्थापन केलेल्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत १९८५ च्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळाली. शिवसेनेने मुंबईत १३९ जागा लढवल्या व ७४ जिंकल्या. काँग्रेसने सर्व १७० जागा लढवल्या व ३७ जिंकल्या. भारतीय जनता पक्षाने १३६ जागा लढवल्या व केवळ १३ नगरसेवक निवडून आले. जनता पक्षाने १०२ जागा लढवल्या व १० जागा मिळाल्या. समाजवादी काँग्रेसने ६३ जागा लढवल्या व ९ जिंकल्या. या निवडणुकीत मुस्लीम लिगला ५, कामगार आघाडीला ५, अपक्ष व इतर मिळून १६ जागा मिळाल्या.
शिवसेना स्थापन झाल्यापासून अठरा वर्षे सतत संघर्ष केल्यावर मुंबई महापालिकेवर स्वबळावर भगवा झेंडा फडकला. महाराष्ट्राच्या राजधानीत शिवसेनेने घडविलेला हा चमत्कार होता. शिवसेनेने मुंबई आणि मराठी या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढवली होती. १९८५ मध्ये मुंबईची लोकसंख्या ८२ लाख होती. त्यात फक्त ३८ टक्के मराठी होते, ६२ टक्के अमराठी होते. शिवसेनाप्रमुखांनी मुंबईतील मराठी लोकांना शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले. मुंबईतील मराठी मतांच्या जोरावरच मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा पहिल्यांदा भगवा फडकला. शिवसेनाप्रमुखांनी ५ मे १९८५ रोजी शिवतीर्थावर विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात भाषण करताना ते म्हणाले, यापुढे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, मुंबईतील लोंढे थांबविण्यासाठी परवाना पद्धतीचा आम्ही विचार करू. १९७४ नंतर मुंबईत आलेल्यांना परत पाठवायला हवे…
शिवसेनाप्रमुखांच्या भाषणावर तेव्हा शिवसेना विरोधी पत्रकारांनी आणि विविध राजकीय पक्षांनी काहूर उठवले. त्याच वेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे काँग्रेस महासमितीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते. शिवसेनाप्रमुखांच्या भाषणावर तेथे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले. त्यावर दादा म्हणाले-मुंबईत येणारे लोंढे रोखण्याची आता वेळ येऊन ठेपली आहे.शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेला काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची साथ, असे चित्र देशात निर्माण झाले. संसदेतील समाजवादी खासदारांनीच या संदर्भात पुढाकार घेतला. जनता पक्षाचे लोकसभेतील नेते म्हणून प्रा. मधू दंडवते लोकसभेत उभे राहिले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल केंद्र सरकारची काय भूमिका आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. शिवसेनाप्रमुख हे मराठी माणसाच्या व मुंबईच्या हिताविषयी बोलले होते, मुख्यमंत्र्यांनीही मुंबईवर सतत आदळणाऱ्या लोंढ्याविषयी वक्तव्य केले होते. पण समाजवादी नेत्यांना अख्या देशातील जनतेची काळजी वाटली. लोंढे थांबविण्यासाठी कोणत्याही प्रांतातील लोकांवर बंदी घातली जाणार नाही, असे आश्वासन समाजवादी नेत्यांनी केंद्राकडून मिळवले. मुंबईवर आदळणारे लोंढे थांबवले जाणार नाहीत याचे समाधान मिळवले. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेला छेद देण्याचे काम संसदेत केले. मुंबईवर प्रथम मराठी माणसाचा हक्क आहे, असे सांगणाऱ्या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेच्या मुळावर समाजवादी कसे उठले त्याचे हे एक उदाहरण आहे. याच समाजवादी विचाराच्या संघटनांबरोबर उबाठा सेनेने त्यांच्या पश्चात चुंबाचुंबी सुरू केली आहे.
[email protected]
[email protected]