भारताच्या कर्णधाराने असं कृत्य करणं बरं नव्हे…
मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या वर्ल्डकपचे (Cricket World cup 2023) वारे वाहत आहेत. मात्र, हे वारे उलट्या दिशेने वाहतायत की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, तुलनेने दुबळे संघ तगड्या संघांविरोधात बाजी मारत आहेत. त्यामुळे भारतालाही आता प्रचंड सावध राहून खेळण्याची गरज आहे. असं असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मात्र निष्काळजीपणा केला आहे.
त्याचं झालं असं की, अहमदाबादमधील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना संपल्यानंतर रोहित शर्मा पवन हंस हेलिकॉप्टरने मुंबईला आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला होता. तिथे दोन दिवस मजेत घालवल्यानंतर तो पुन्हा संघात सामील होण्यासाठी सज्ज झाला. यासाठी मंगळवारी तो मुंबईहून पुण्याला जायला निघाला. मात्र, जाताना त्याने आपली आलिशान स्पोर्ट्स कार लेम्बोर्गिनी उरस तब्बल २०० किमी प्रति तास अथवा त्याहूनही अधिक वेगाने चालविली. यासाठी त्याला तीन चालानही बजावण्यात आले आहेत.
वाहतूक विभागाच्या नियमांनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वेग मर्यादा ताशी १०० किलोमीटर एवढी आहे. मात्र, आपल्या कर्णधाराने गाडी दुप्पट वेगाने चालवली. प्रवासादरम्यान रोहित शर्माने वाहतुकीचे नियम मोडले. ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने कधीकधी २०० किमी/तास हून अधिक, तर कधी-कधी २१५ किमी/तास एवढ्या प्रचंड वेगाने कार चालवली. या मुळे, त्याच्या कारच्या नंबर प्लेटवर तीन ऑनलाइन ट्रॅफिक चालान जारी करण्यात आले आहेत.
वाहतूक विभागाच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “वर्ल्ड कप सुरू असताना भारतीय कर्णधाराने एवढ्या वेगाने कार चालवणे अयोग्य आहे. त्याने संघाच्या बसनेच प्रवास करायला हवा आणि त्याच्या सोबत पोलिसांची गाडीही असायला हवी”. अख्खा भारत ज्यांच्याकडे आपले आदर्श म्हणून पाहतो, ज्या क्रिकेट वर्ल्डकपकडे अख्ख्या देशाचे डोळे लागून राहिले आहेत, त्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराने असं कृत्य करणं बरं नव्हे, अशा प्रतिक्रिया यामुळे उमटत आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra