
पुण्यातून तो का पळाला यासंदर्भात आईने केला खुलासा...
मुंबई : पुण्याच्या ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचारादरम्यान पोलिसांच्या नजरकैदेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit patil) मोठ्या शिताफीने फरार झाला. मात्र, तब्बल १५ दिवसांनी मुंबई साकीनाका पोलिसांना (Mumbai Police) सापळा रचून त्याला पकडण्यात यश आले आहे. चेन्नईच्या एका हॉटेलमधून ललितला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेने ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ललित पाटील चौकशीत काय माहिती देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापूर्वीच ललितच्या आईने माध्यमांसमोर हात जोडून एक विनंती केली आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातून ललित फरार झाला यासंदर्भात एक खुलासा करत त्याची आई म्हणाली, त्याचं हार्नियाचं ऑपरेशन होणार होतं. त्याला चेकअपला नेलं असताना डॉक्टर म्हणाले, तुझ्यावर आज ऑपरेशन केलं आणि उद्या तुरुंगात नेलं तर तू जगू शकणार नाही. त्यामुळे तो घाबरून तिथून पळाला.
पुढे आणखी एक खुलासा करत ती म्हणाली, ललितने त्याला जी शिक्षा मिळेल ती भोगावी. पण त्याला फसवलं गेलंय हे सांगावं. तोही घाबरला असेल. मुंबई पोलिसांनी त्याला पकडलंय. त्याने पोलिसांना सहकार्य करावं. मला फसवलं गेलंय. त्यामुळे मी या मार्गाला लागलो. पैशासाठी टॉर्चर केलं जात होतं, त्यामुळे मी पलायन केलं, हे त्यानं सांगावं, असं ती म्हणाली.
पोलीस दोनदा आमच्या घरी आले होते...
ललितची आई म्हणाली, ललितचा एन्काऊंटर होण्याची आम्हाला भीती वाटते. पोलीस दोनदा आमच्या घरी आले. त्यांनी तपासणी केली. पहिल्यावेळी भूषणला घेऊन गेले होते. नंतर पुन्हा भूषणला घेऊन आले आणि घराची तपासणी केली. तेव्हाही भीती वाटत होती. त्याचा एन्काऊंटर करतात की काय? अशी भीती वाटत होती. पोलीस आम्हाला तसं बोलूनही गेले होते. तो सापडला तर एन्काऊंटर करू असं पोलीस म्हणाले. नेते लोकही तेच म्हणत आहेत. असं करू नका. एवढीच पाया पडून विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.
ललितच्या एन्काऊंटरची गरज काय?
पुढे ती म्हणाली, पोलिसांनी ललितला अटक केली आहे. आता पोलीस जो निर्णय घेतील, तोच योग्य. पण ललितने असा काय मोठा गुन्हा केला आहे? त्याच्या एन्काऊंटरची गरज काय? जे लोक मोठमोठे गुन्हे करतात ते सुटतात आणि फिरतात. ललितने असं काय केलंय की त्याचा एन्काऊंटर करावा? आमचं मत आहे की, त्याचं एन्काऊंटर करू नये. त्याच्या मागे दोन मुलं आहेत. आई वडील आहेत, असं ललितच्या आईने सांगितलं.