महिलेकडून सात किलो चांदी जप्त, महिलेच्या घरी आर्थिक देवाण घेवाण
नाशिक प्रतिनिधी: नाशिक शहरात सुरु असलेले अंमली पदार्थ विक्रीची साखळी तोडण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली असून यावर्षी आतापर्यंत विक्रीसंदर्भात १०, सेवन करण्या संदर्भात ५, तर कोटपा अंतर्गत ३५७ गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी माध्यमांना दिली. या संदर्भात माहिती देतांना पोलिस आयुक्त म्हणाले की, गुन्हे विरोधी पथकाने कारवाईमध्ये सातत्य ठेवुन अंमली पदार्थांची विक्री करणारे व्यक्तींची धरपकड करून कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये सन २०२३ मध्ये अंमली पदार्थ बाळगणे व खरेदी विक्री संदर्भाने १० गुन्हे व अंमली पदार्थ सेवन करण्याच्या ०५ व शाळा / महाविदयालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांवर कोटपा कायदयाअंतर्गत ३५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सध्या अंमली पदार्थ विरोधी पथक नाशिक रोड, इंदिरा नगर या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यांचा कसोशीने तपास करीत असून नाशिकरोडच्या साडे बारा ग्रॅम एमडीच्या गुन्ह्यात तीन आरोपी अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या कबुली नंतर आणखी चार आरोपी ताब्यात घेतले. तर नाशिकरोडच्या चार किलो आठशे सत्तर ग्रॅम एमडीच्या गुन्ह्यात तीन आरोपी निष्पन्न झाले असून या गुन्ह्यात सात किलो चांदी हस्तगत करण्यात आली आहे. तर इंदिरानगरच्या ५४.५ ग्रॅम एमडीच्या गुण्यात एका महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. निष्पन्न आरोपीच्या शोधासाठी एकूण सहा पथके तयार करण्यात आली असून अटक आणि निष्पन्न आरोपिंचा तपास पुर्ण करून या रॅकेटच्या मुळाशी जाण्याचा प्रयास आहे.
ललित पाटील फरार असतांना नाशिक शहरातील एका महिलेकडे एक दिवस वास्तव्यास राहून आर्थिक देवाण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने त्या महिलेच्या घर झडतीत सात किलो चांदी मिळून आली. ललित या महिलेकडून २५ लाख रुपये रोख घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले असून अधिक चौकशीसाठी त्या महिलेला पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान ही रक्कम ललितचा भाऊ भूषण याने दिल्याचे महिलेने सांगितले.