सिन्नर : कोनांबे सिन्नर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाले आहेत. दोघेही कोनांबे गावातील रहिवासी आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश डावरे आणि दुर्गेश डावरे हे दोन युवक एमएच १५ जेजी ९६४५ क्रमांकाच्या पल्सरने घोटी सिन्नर महामार्गांवरुन सिन्नरकडे येत होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकीवर स्वार असलेले हे दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या मेंदूला जबर मार लागल्याने त्यात ते जागीच ठार झाले.
सिन्नर येथील रतन सोनवणे, पुरुषोत्तम भटजीरे आणि राहुल शिरसाठ यांच्या मदतीने या तरुणांचे मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीत त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या तरुणांच्या मृतदेहाच्या सभोवताली पडलेल्या रक्ताच्या सड्याने या अपघाताची भीषणता स्पष्ट होते. या दोन्ही तरुणांच्या अपघाती निधनाने ऐन नवरात्रौत्सवात कोनांबे गावावर शोककळा पसरली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra