Wednesday, October 9, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकच्छ युवक संघ, मुंबई

कच्छ युवक संघ, मुंबई

सेवाव्रती: शिबानी जोशी

‘मुंबई नगरी बडी बाका, तिचा तीही लोकी डंका’ असे लिहून ठेवले आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथे देशाच्या कानाकोपऱ्यांतील लोक दीडशे वर्षांपासून काम-धंद्याच्या शोधात आले आणि इथे वसले आहेत. ब्रिटिश राजवटीत बॉम्बे प्रांत किंवा बाँबे प्रेसिडेन्सी हा ब्रिटिश भारताच्या प्रांतीय स्वरूपाचा राजकीय विभाग होता. वर्तमान भारतीय प्रजासत्ताकाच्या पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, वायव्य कर्नाटक हे भूप्रदेश, वर्तमान पाकिस्तानातील सिंध प्रांत, या प्रदेशांचा मुंबई प्रांतामध्ये समावेश होता.  या भागात समुद्री मार्गाने व्यापार उदिम चालत असे. बॉम्बे रेसिडेन्सी हा खूप मोठा  समुद्री भाग होता आणि त्यात  व्यवसाय, उद्योग, व्यापार एकमेकांशी चालत असे. त्यामुळे मुंबई भागात गुजरातच्या लोकांचे येण्याचे प्रमाण खूप होते. गुजरातमधील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे कच्छ.

गुजरातचा जवळजवळ २३ टक्के भूभाग म्हणजे कच्छ. कच्छमधीलही अनेक लोक मुंबईमध्ये व्यापारासाठी स्थायिक झाले होते. १५० ते २०० किलोमिटरचा मोठा सागरी किनारा तसेच ३०० किलोमिटर पाकिस्तानची सीमारेषा ही कच्छ जिल्ह्याला लागून आहे. कच्छमध्ये बराचसा भाग वाळवंटी प्रदेश असल्यामुळे तिथे पाण्याची तसेच शेतीची वानवा होती. तिथले अनेक कच्छी लोक, व्यापारी हे व्यापाराकरता मुंबईत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले कोमलभाई छेडा हे आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगून मुंबईला स्थायिक झाले होते. ते पुण्यात संघाच्या एका शिबिराला आले असताना त्यांना असे वाटले की, इथल्या संघ स्वयंसेवकांनी मुंबईतील कच्छ समाजाला एकत्र आणून संघ विचारानुसार कार्य करावे. तसेच मुंबईत समाजकार्य आणि कच्छचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि म्हणून त्यांनी संघटना उभारण्याचा प्रयत्न सुरू केला. १९८० साली त्यांनी प्रथम प्रयत्न केला होता; परंतु विभिन्न विचाराचे लोक एकत्र आले होते आणि ते तितकासा कामात रस घेत नव्हते. तसेच वेळही देत नव्हते. त्यामुळे त्याला यश आले नाही; परंतु पुण्यातल्या संघाच्या शिबिरामध्ये जे कच्छी युवक आले होते, त्यांनी मुंबईत आल्यावर एकत्र येऊन बैठक घेतली आणि मुंबईत  सामजिक कार्य, त्याबरोबरच कच्छचा विकास करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्याचे ठरवले. त्या काळात कच्छमध्ये एक वर्षाआड दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असे. तसेच पाकिस्तानच्या सीमारेषेवरून घुसखोरी होत असे.

अवैध शस्त्रसाठा पाठवला जात असे. या सगळ्या गोष्टी रोखता याव्यात तसेच कच्छमधील दुष्काळी स्थिती, शिक्षण यावरही काम करता यावे म्हणून १९८४ साली मुंबईत राहणाऱ्या कच्छी युवकांनी ही संकल्पना उचलून धरली आणि १९८६ साली त्यांनी ‘कच्छ युवक संघ’ या नावाने एक संस्था नोंदणीकृत केली.   कच्छ दुर्लक्षित राहायचे मोठे कारण म्हणजे वाहतुकीची वानवा. कच्छमध्ये त्याकाळी फक्त एक ट्रेन जात असे. त्यामुळे ये – जा करणे कठीण होते आणि तो भाग वेगळा पडल्यासारखा झाला होता. त्यामुळे रेल्वे गाड्या वाढवण्यासाठी संस्थेने आंदोलन केली. रेल्वेशी पत्रव्यवहार केला आणि त्याचा परिणाम म्हणून कच्छमध्ये चार-पाच रेल्वे गाड्या जाऊ लागल्या.

दुसरी मोठी समस्या म्हणजे पाणी ही होती. त्यावेळी ‘नर्मदा बचाव आंदोलन’ सुरू होते. सरदार सरोवराची उंची वाढली, तर पाणी कच्छला पोहोचणार होते. त्यासाठी देखील बरेच प्रयत्न संस्थेने केले. त्याशिवाय कच्छमध्ये असलेल्या ‘कच्छ कल्याण संघ’ या संघविचारी संस्थेच्या सहकार्याने खूप पाठपुरावा केला होता, त्याला थोडं फार यशही आले होते. आणखी एक समस्या म्हणजे शिक्षण. त्यासाठी तिथे शिशुमंदिर तसंच विद्याभारतीच्या मदतीने शाळा सुरू केल्या. या शाळांमध्ये राष्ट्रीय विचारांचे शिक्षण दिलं जात. त्यासाठी इथून आर्थिक सहकार्य केले गेले होते.आज कच्छमध्ये पाच शाळा या संघटनेमार्फत चालवल्या जातात. या शाळेत साधारण अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  त्याशिवाय पाकिस्तान लगतच्या सीमारेषेवरील लखपत तालुक्यामध्ये एक आश्रम शाळा देखील चालवली जाते. आजूबाजूच्या गावातील मुलं या ठिकाणी राहतात आणि शाळेत शिक्षण घेतात. भुज मध्ये जेव्हा खूप मोठा भूकंप झाला होता, त्यावेळी देखील संस्थेने खूप मोठी मदत केली होती. तिथल्या ११ गावांचे पुनर्वसन संघटनेच्या वतीने केले गेले होते.

मुंबईतल्या कच्छी युवकांनी एकत्र यावे यासाठी सुद्धा काही कार्य सुरू केली गेली. १९९२-९३ सालापासून ३० वर्षे कच्छी भाषेमध्ये दरवर्षी एक नाटक बसवलं जात आहे. या नाटकामध्ये सुद्धा कच्छमधल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच हरहुन्नरी कच्छी युवक या नाटकात अभिनय करतात. दरवर्षी या नाटकाचे मुंबईत शोज केले जातात. नाटकाच्या माध्यमातून कच्छी कलाकारांना एक  मंच मिळतो .या नाटकात काम केलेल्या काही कलाकारांना आज व्यावसायिक चित्रपट, मालिका मिळाल्या आहेत त्याशिवाय कच्छी युवक नाटकाच्या निमित्ताने एकत्र येतात. गेली तीस वर्षे दरवर्षी नवीन नाटक, नवे कलाकार घेऊन सादर केलं जात. दरम्यान, संघटनेच दादर पूर्वेला स्वतःचं ऑफिस झाले. आज संस्थेचे ५०० ॲक्टिव्ह मेंबर तसेच २०० लाईफ मेंबर आहेत. त्याशिवाय मुंबई आणि आसपास  विविध १४ भागात आज संघटनेच्या शाखा झाल्या आहेत. या शाखातूनही मुंबईतील स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. संघटनेला आरएसएस  कार्यकर्त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळते, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कोमलभाई छेडा यांनी सांगितले.

मुंबईत सेवा कार्य करावं यासाठी १९९८ पासून मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराच आयोजन केलं जात. प्रसिद्ध उद्योगपती, अँकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे आजपर्यंत जवळजवळ दोन लाख दहा हजार युनिट इतकं रक्त गोळा करण्यात आलं आहे. सुरुवातीला एकाच ठिकाणी; परंतु नंतर मुंबईतल्या विविध भागांमध्येही रक्तदान शिबीर आयोजित केली जातात. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये कोणालाही रक्ताची गरज भासली, तर ती संस्थेमार्फत पूर्ण केली जाते. यापुढेही शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा संस्थेची योजना आहे तसंच मुंबईत स्थानिक पातळीवर देखील सामाजिक कार्य वाढवण्याचा संस्थेचा विचार आहे.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -