नवी दिल्ली: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२३ची सुरूवात १६ ऑक्टोबरपासून झाली आहे. टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत पहिल्याच दिवशी अनेक स्टार खेळाडूंनी शानदार कामगिरी केली.
पहिल्या दिवशी महाराष्ट्रासाठी खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने ८० धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि विदर्भचा युवा विकेटकीपर जितेश शर्मा यांनी नाबाद राहत तुफान खेळी केली.
गायकवाडने महाराष्ट्राला मिळवून दिला विजय
बंगालविरुद्ध विजयासाठी १५९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या महाराष्ट्राकडून गायकवाडने ४० बॉलमध्ये २०५च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ८२ धावांची तडाखेबंद खेळी केली. यात ९ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. गायकवाडच्या शानदार खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने अवघ्या १४.२ षटकांत हे २ विकेट गमावत पूर्ण केले. या दरम्यान कर्णधार केदार जाधव २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४० धावांवर नाबाद राहिला.
कर्णधार रहाणेची जबरदस्त खेळी
स्पर्धेत मुंबईची कमान सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेने हरयाणाविरुद्धच्या सामन्यात १४८ धावांचा पाठलाग करताना ४३ बॉलमध्ये १७६.७६च्या स्ट्राईक रेटने नाबाद ७६ धावांची खेळी केली. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.पावसामुळे हा सामना १८ ओव्हरचा खेळवण्यात आला यात मुंबईने डकवर्थ लुईस नियमानुसार ८ विकेट राखत विजय मिळवला.