चेन्नई: तामिळनाडूमध्ये मंगळवारी १७ ऑक्टोबरला दोन फटाका कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत होरपळून तब्बल ११ लोकांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. हे अपघात रंगपालयम आणि किचनायकनपट्टी गावात झाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ३-३ लाखांची मदत केली. तसेच जखमींना एक-एक लाख रूपये मदतीची घोषणा करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार रंगपायमच्या फटाका कंपनीत स्फोटानंतर आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, फायर ब्रिगेडचे कर्मचारी तसेच बचाव पथक दाखल झाले. येथील मलब्यातून ७ जळालेले मृतदेह हाती घेण्यात आले. यांची ओळख अद्याप झालेली नाही.
दरम्यान, या आगीनंतर तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा अपघात किचनायकनपट्टी गावातील फटाका कंपनीत झाला. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन महिला कामगारांना वाचवण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याआधी ९ ऑक्टोबरला सोमवारी तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील विरागलूरमध्ये फटाका कंपनीत आग लागली होती. या दुर्घटनेत ९ लोकांचा मृत्यू झाला होता तर ५ जण जखमी झाले होते.