Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखBJP Vs INDIA : भाजपाविरोधी इंडियाचे काय झाले हो?

BJP Vs INDIA : भाजपाविरोधी इंडियाचे काय झाले हो?

भाजपा विरोधात स्थापन झालेल्या ‘इंडिया’ नामक आघाडीचे काय झाले? इंडिया कुठे आहे? इंडिया काय करीत आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मोदी हटावो, या एकाच मुद्द्यावर दोन डझन राजकीय पक्षांनी ‘इंडिया’ नामक आघाडी स्थापन केली. पाटणा, बंगळूरु आणि मुंबई अशा तीन बैठका झाल्या. बैठकीनंतर मोदी विरोधाची लागण झालेल्या नेत्यांनी आपली जळजळ बोलून दाखवली. येत्या निवडणुकीत भाजपा संपणार आणि येणाऱ्या निवडणुकीत मोदी सत्तेवरून हटणार अशा वल्गना केल्या गेल्या. पण कालांतराने या घोषणा, वल्गना हवेतच विरायला लागल्या. भाजपाच्या नावाने ठणाणा करणारी ‘इंडिया’ सध्या काय करते, कुठे आहे हे कुणी तरी सांगावे…

ज्या उत्साहाने भाजपा विरोधकांनी ‘इंडिया’ची स्थापना केली, मोदींना टार्गेट करून त्यांच्यावर टीका केली, तो उत्साह गेला कुठे? इंडियामध्ये हौशे, गवशे, नवशे असे बरेच पक्ष आहेत. ‘इंडिया’मध्ये नेते बरेच आहेत. पण कार्यकर्ते कमी आहेत. भाजपा व एनडीएच्या तुलनेत ‘इंडिया’ कुठेच नाही, हे वास्तव आहे. पण मोदींच्या विरोधात सतत जप करणाऱ्या नेत्यांना ते सांगणार कोण? इंडियामध्ये सर्वकाही अलबेल नाही. एकमेकांशी जमत नाही. पण ते कबूल करण्याची हिम्मत कोणात नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाचे ऐकत नाही. इंडियामधील विविध प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यापुरते व आपल्या परिवारापुरतेच मश्गुल असतात. भाजपा आपल्याला कधीही संपवेल अशी त्यांना भीती वाटत असते. म्हणून ते इंडियाचे कवच आपल्या भोवती गुंडाळून असतात. ‘इंडिया’मध्ये कोणी कोणाचे ऐकत नाही किंवा कोणी कुणाला मानत नाही. कोणताही पक्ष इंडियातून केव्हा बाहेर पडेल हे कोणीच सांगू शकत नाही. दुसऱ्याचे आपल्या ओझे नको, अशा विचाराने इंडियातील घटक पक्ष पछाडले आहेत.

दिल्ली व पंजाब म्हणजे फक्त आम्हीच, अशा अहंकारात आम आदमी पक्ष असतो. या दोन्ही राज्यांत आम आदमी पक्षाचे सरकार असले तरी तेथे जागा वाटपात मर्जी आमचीच चालेल अशी मानसिकता आपची आहे. अरविंद केजरीवाल यांचे ऐकले तर आपल्याला हात चोळत बसावे लागेल हे काँग्रेस पक्के जाणून आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. मग इंडियातील घटक पक्ष कुठे आहेत? त्यांचा कोणी विचारच करीत नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोराम या पाचही राज्यात इंडियातील कम्युनिस्ट, आप, तृणमूल काँग्रेस यांना निवडणूक लढवायची आहे. पण काँग्रेस जागा वाटपासंबंधी ब्र सुद्धा काढत नाही. या राज्यात काँग्रेस पक्ष सर्वच जागांवर निवडणूक लढविण्याच्या मन:स्थितीत आहे.

काँग्रेसची या पाचही राज्यांत मनमानी आहे असे अनेकांना वाटते. काँग्रेसही आपले उमेदवार दिल्लीतून जाहीर करते, अन्य पक्ष त्या त्या राज्यातून आपले उमेदवार जाहीर करतात. काँग्रेस व इंडियातील अन्य मित्रपक्ष यांच्यात संवाद राहिलेला नाही. म्हणूनच इंडियात असूनही नसल्यासारखी परिस्थिती अन्य लहान-सहान व प्रादेशिक पक्षांची झाली आहे. आपापसातील कुरबुरी मीडियापर्यंत न्यायच्या नाहीत हे पथ्य सर्व घटक पक्ष पाळत आले असले तरी त्याला सुद्धा काही मर्यादा आहे. त्यामुळे जशा निवडणुका जवळ येतील तशी धुसफूस इंडियामध्ये वाढत जाईल. पाच राज्यातील जागा वाटपाचा मुद्दा काँग्रेस गांभीर्याने घेत नाही. पाच राज्यांतील निवडणुका पार पडू द्या, मग इंडियातील अन्य पक्षांबरोबर चर्चा करू असे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. इंडियातील अन्य घटक पक्षांची काँग्रेसला पर्वा नाही, हेच त्यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे.

विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियामध्ये सन्नाटा आहे. सर्व घटक पक्षांत चुप्पी आहे. पुढे काय होणार आहे, याची कोणाला कल्पना नाही. या वर्षीच्या जून महिन्यात इंडियाला तेजी होती. मोठा गवगवा, मोठी प्रसिद्धी मिळत होती. प्रत्येक महिन्याला बैठक होत होती. पण देशातील विरोधी पक्षांची प्रमुख आघाडी स्थापन होऊनही समान कार्यक्रम आघाडीला आखता आला नाही. केवळ मोदी हटावो, या मुद्द्यावर इंडिया आघाडी कशी काय टिकू शकेल? इंडियाची बैठक मुंबईत ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला झाली होती. त्यानंतर इंडिया एकत्र आलेली दिसली नाही. जसे महाराष्ट्रात महाआघाडीच्या सभांचा बोऱ्या वाजला त्याच मार्गाने इंडियाची वाटचाल चालू आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. इंडियाचा समान कार्यक्रम भोपाळच्या बैठकीत ठरविण्यात येईल असे आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात भोपाळची बैठक अजून झालीच नाही. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी भोपाळची बैठकच रद्द केली. इंडियाचा मेळावा नागपूरमध्ये होणार, असेही जाहीर करण्यात आले होते, पण त्या दृष्टीने कोणतीच प्रगती झालेली नाही. नागपूरच्या सभेसाठी मुंबईतही इंडियाच्या प्रादेशिक नेत्यांची बैठक झाली नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दुभंगली, ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून बहुतेक मोठे नेते, पदाधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले, दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड झाले. काका – पुतण्या दोघांनीही राष्ट्रवादीवर हक्क सांगितल्याने प्रकरण निवडणूक आयोगापुढे गेले. महाराष्ट्रात महाआघाडीने मान टाकली आहे. तशीच गत नजीकच्या भविष्यात इंडियाची झाली तर आश्चर्य वाटायला नको…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -