
चिपळूण : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa highway) काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असतानाच चिपळूणच्या (Chiplun) बहादूर शेख नाक्यावरील पुलाचा भाग मधोमध तुटल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी आठ वाजता पुलाचा भाग मधोमध तुटल्याने सर्वांनाच धक्का बसला.
या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. मात्र बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग मधोमध तुटल्याने त्याच्या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बहादुरशेख नाका येथील फ्लायओव्हरला आधीच तडे गेले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे. त्यात आज सकाळी पुलाचा काही भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
दरम्यान, मनसे (MNS) मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरुन आक्रमक झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने या रस्त्याच्या कामाची पाहणी सुरू ठेवली आहे. मात्र आता या बांधकामाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.