मानवी उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी ‘जीवनविद्या मिशन’ झपाटून काम करत आहे. सुखी जीवनासाठी मनाचे सामर्थ्य किती महत्त्वाचे आहे. बालसंस्कार, शुद्ध विचार यातून आयुष्याला कलाटणी कशी मिळू शकते. याविषयी जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाददादा पै यांनी नुकतेच प्रहारच्या वतीने आयोजित केलेल्या ‘गजाली’ कार्यक्रमात प्रहारच्या टीमबरोबर संवाद साधला. यावेळी दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले.
“लहानपणापासून सद्गुरूंबरोबर होतो. त्यांच्या कार्यक्रमांना त्याकाळी जायचो. त्यांचे विचार ऐकत होतो. सद्गुरूंचे महत्त्व असे आहे की, ते श्रद्धा ठेवतात, अंधश्रद्धा नाही. म्हणजे, पूजा करा पण पूजेमध्ये अडकून राहू नका. काही काही लोक दोन-दोन, तीन-तीन तास पूजाच करत असतात. सद्गुरूंनी ज्ञानातून अंधश्रद्धा घालवली. त्यासाठी त्यांनी आंदोलन केले नाही. अंधश्रद्धा म्हणजे काय तर भीती असते. मला काही तरी होईल म्हणून पैसे देऊन यज्ञ करून घेतात. सर्व काही पैशांनी होत नसते. सद्गुरूंना ते मान्य देखील नाही.” जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाददादा पै हे ‘दै. प्रहार’च्या कार्यालयात ‘गजाली’निमित्त आले, तेव्हा सद्गुरू वामनराव पै यांच्याबद्दल असे भरभरून सांगत होते. पुढे त्यांनी सांगितले, “सद्गुरू म्हणतात खरा परमेश्वर आपल्यातच आहे. मूर्ती ही शेवटी ईश्वराचे प्रतीक आहे. मूर्तीमध्ये लोक गुंतून जातात. मूर्तीला काही झाले तर सगळे घाबरून जातात. पण ही भीती काढून टाकली पाहिजे. कारण की मूर्ती ही माणसाने बनवलेली असते. सद्गुरू म्हणतात, तुम्ही देवाकडे काही मागताना डोळे मिटून का मागता. समोर जर मूर्ती आहे, तर तुम्ही मूर्तीकडे बघून का मागत नाही. डोळ्यांसमोर मूर्ती आहे तरी आपण काही मागताना डोळे मिटतो. सद्गुरू म्हणतात मूर्ती हे प्रतीक आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. खरा तो म्हणजे परमेश्वर आतमध्येच आहे. त्यामुळे मागायचे ते आतमध्ये मागितले पाहिजे.”
सद्गुरूंचे हे प्रॅक्टिकल विचार मला भावले. मी विज्ञानाचा विद्यार्थी. त्यामुळे सद्गुरूंचे प्रॅक्टिकल विचार पटले. सद्गुरूंनी सुरुवात हरिपाठ, ज्ञानेश्वरीने केली. हरिपाठावर ते खूप बोलायचे. नंतर सद्गुरूंना समजून आले की, आताची जी पिढी आहे, तिला हरिपाठ सांगून उपयोग नाही, त्यासोबत जीवनाला काय लागते हे सांगणे ही महत्त्वाचे वाटले. मग सद्गुरूंनी मनावरील विश्लेषण सुरू केले. अंतर्मन, बहिर्मन, अमन, शुद्धमन असे सर्व काही लोकांपुढे मांडले. शेवटी मन हेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. मन तुम्हाला परमेश्वराकडे घेऊन जाईल आणि जगाकडेही घेऊन जाईल. मनाच्या समर्थ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. आज काही होत नाही, कारण मनाचे सामर्थ्य बदलले नाही आणि मनाचा वापर कसा करायचा हे माहीत नाही. आज आपण जे विचार करतो किंवा येतात. आपण विचार काय करतो, हे देखील आपल्याला माहीत नसते. विचार सुरूच असतात. चिंतन, नको त्या चिंता सुरूच असतात. सद्गुरूंनी मनाचे विश्लेषण खूप छान पद्धतीने केले आहे. मनाने तुमचे जीवन कसे सुधारते, प्रपंच कसा सुखाचा करते ते सांगितले आहे. ज्यांना परमार्थाची आवड आहे, त्यांना मन परमार्थाकडे कसे घेऊन जाते हे देखील सांगितले आहे. सद्गुरूंनी प्रपंच आणि परमार्थ याचा मेळ घातला आहे हेच सद्गुरूंचे वैशिष्ट्य वाटते.
एकीकडे जन्मात काही न करता नुसते बसून राहायचे, तर दुसरीकडे सकाळपासून जो पैशांच्या मागे लागलेला माणूस ‘याचे पाय खेच, त्याचे पाय खेच’ याच्यामागे तो संबंध दिवस लागलेला असतो. नाहीतर सगळे सोडून अध्यात्माच्या तरी मागे लागलेला असतो. सद्गुरूंना हे दोन्ही मान्य नाही. त्यांचे म्हणणे की, दोन्ही ठिकाणी तुम्हाला सुख पाहिजे. देव म्हणजे कुणी माणूस नाही आहे. त्यामुळे सद्गुरूंनी ‘जीवनविद्या’ नाव मुद्दाम दिले आहे.
जीवनाला लागणारी विद्या, जीवन कसे जगावे हे सांगितले आहे. आम्ही संन्यास घ्या असे कोणास सांगत नाही, त्याऐवजी आम्ही ‘लेमन’ म्हणतो. म्हणजे ‘मन हातात’ घे. तुकाराम महाराजांनी अभंगात हेच सांगितले आहे, “आधी मन घेई हाती, तोची गणराजा गणपती” माझे मन प्रसन्न झाले तर तोच गणपती आहे. हे सगळे सद्गुरूंनी इतके छान मांडले की, जीवनाभिमुख लोकांना रस्ता दाखवला. तुम्हाला काही सोडायची गरज नाही, आहे ते सर्व करायचे. ते करताना वृत्ती, दृष्टी आणि विचारांमध्ये बदल करा. दुसरे काही करू नका. हे बदलले की जीवनात बदल होईल. प्रपंच सुखी होईल.
निर्णयाची ताकद तुमच्या मनामध्ये आहे. म्हणूनच “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” म्हटले आहे. तुमचे जीवन बदलण्यास कुणी बुवा बाबा येणार नाही. डोक्यावर हात ठेवून जर कल्याण झाले असते इंजिनीअरिंग, डिग्री घ्यायची गरज नसती. माणसाच्या आयुष्याबद्दल सद्गुरूंनी महत्त्वपूर्ण व्याख्या केली आहे, माणसाचे जीवन आनंद वाटता वाटता, आनंद लुटण्यासाठी आहे.
आनंद दुसऱ्याला दिला पाहिजे. हा खूप मोठा सिद्धांत आहे, तो मी एका वाक्यात सांगतो आहे. सद्गुरू म्हणतात का? हा प्रश्न विचारणारी माणसे मला आवडतात. मी सांगतो म्हणून स्वीकारायचे, असे न करता का प्रश्न विचारल्यास मी शेवटपर्यंत म्हणजे स्वरूपापर्यंत घेऊन जाईन.
आमचे कार्य देखील आनंद देणे हेच आहे. आमच्याकडे अनेकांनी न सांगता ज्ञानातून दारू सोडली, अंधश्रद्धा गळून पडली, आम्ही नाही घालवली. पापभिरू माणसाचे मन चिंता, काळजी यानेच भरलेले असते. जसे आपण विचार करणार तसे जीवनाला वळण मिळणार. म्हणून सद्गुरूंनी विचाराला महत्त्व दिले आहे. लोकांची मने जपणे म्हणजे जप होय. दुसऱ्या अर्थाने आपण नाम जप करणे. नामस्मरण करताना ज्याचे स्मरण करतोय त्याची माहिती असणे आवश्यक आहे. कोणत्याही माहितीशिवाय स्मरण करणे योग्य नाही.
मला वाटते ३३ कोटी देवच नाहीत. आपली संस्कृती खूप मोठी आहे. आपण गाईलाही देव मानतो. जो जो आपल्याला देतो त्याला देव मानतो. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास जो देतो तो देव. देव आणि देवाची नावे आपण तयार केली आहेत. देवाची रूपे ही आपण निर्माण केली आहेत. आपण संस्काराने वेगळे झालो. तू या जातीचा, कुळाचा हे माणसांनी निर्माण केले. आपले शरीर पंचमहाभुताचे आहे. प्रत्येकाच्या शरीरात अवयव सारखेच आहेत. अहंकार हा संस्थांमधून निर्माण झाला आहे. आपण सगळे ईश्वराचे अवतार आहोत. आपण जन्म आनंद घेण्यासाठी घेतला आहे. पण आपण दुसऱ्यांना दुःख देत आहोत. दुसऱ्याच द्वेष मनात ठेवल्याने आपले आरोग्य बिघडते. म्हणून मनाला शांत करण्यासाठी द्वेष, मत्सर बाजूला ठेवले पाहिजेत. म्हणून सद्गुरू म्हणतात, “देवा सर्वांचे भले कर.” शुद्ध मनच सर्व काही देऊ शकते. जो माणूस दुसऱ्याचा द्वेष करत नाही, भले म्हणतो. त्याचे भले होते. आणि वाईट विचार करणाऱ्याचे वाईट होते. देवाने मनुष्यप्राण्याला बुद्धी दिली आहे. निर्णय घेण्याची ताकद दिली आहे. कर्म, कष्ट करून मोठे होणे आपल्या हातात आहे. यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचेच आहेत. सद्गुरूंचा सिद्धांत असा आहे की, प्रयत्न करणे हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढता येतो. निसर्ग नियमावर आधारित जीवनमूल्ये आहेत. समता, सभ्यता, सामंजस्य, समाधान ही मूल्ये लहानपणापासून मुलांमध्ये रुजवली पाहिजेत. संस्कारासोबत चांगली संगतही महत्त्वाची असल्याचे सद्गुरू सांगतात.
“मन जहरी जहरी
याचं न्यारं रे तंतर
अरे विंचू साप बरा
त्याला उतारे मंतर…”
बहिणाबाईंच्या या शब्दांमध्ये व्यक्त झालेल्या लहरी, जहरी मनाची अवस्था आपल्या आयुष्यातील अस्वस्थता चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढत असते. परिणामी ताण-तणाव, मनस्ताप, व्यसने हे भाईबंद वस्तीला येऊन राहतात. यावरचा उताराही आपल्याच मनात असतो. भूकंपाच्या ठिकाणीच त्याचे केंद्र असते ना अगदी तसेच. कोणत्याही कारणाने मन दूषित न करता प्रेम, मैत्री, करुणा, आदर या सद्गुणांनी आयुष्य सुंदर करता येते. हे कठीण वाटत असले तरी “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असे अगदी सुलभरीत्या सद्गुरू वामनराव पै सांगतात. त्यांच्या जीवनविद्या मिशनने आजवर लाखो लोकांच्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा दिली आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे हे मिशन सर्वार्थाने पुढे चालवीत आहेत त्यांचे पुत्र प्रल्हाद पै. दैनिक प्रहारच्या ‘गजाली’ कार्यक्रमात गप्पा मारताना प्रल्हाद पै यांच्या शब्दाशब्दांतून आयुष्याची आश्वासकताच पाझरत होती.
स्वतः आयआयटी पवई आणि जपानमधून तंत्रज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रल्हाद पै यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनातील मन:शक्तीचं मोल जाणून त्यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले. आपल्या प्रशासकीय व्यवस्थापनाच्या ज्ञानाचा वापर करून या सर्व महान कार्यात त्यांनी एक सूत्रबद्धता आणली. जीवनविद्या तत्त्वज्ञानावर आधारित प्रवचने, नावीन्यपूर्ण कार्यक्रम, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि वेबिनार यांची निर्मिती केली. जीवनविद्येच्या कार्यशाळेत सात स्तरांवर प्रशिक्षण दिले जाते. यात मनाचे, विचारांचे, साधनेचे सामर्थ्य, विश्व प्रार्थनेचे महत्त्व, पॉवर ब्रिदिंग अशा विषयांवर त्यांच्या कर्जत इथल्या जीवनविद्या मिशनमध्ये, विविध शासकीय, निमशासकीय, खासगी अास्थापनांमध्ये ऑनलाइन ऑफलाइन मार्गदर्शन केलं जातं. आज देश-विदेशातील लोक याचा लाभ घेत आहेत. या शिबिरात चौथी ते सातवीच्या मुलांसाठी जीवनशिल्प कसे घडवावे, स्वयंसूचनेचे तंत्र, कृतज्ञता, संगत आणि विचार यांचे महत्त्व या गोष्टी तर सातवीतील विद्यार्थी ते पुढील सर्व वयोगटातील लोकांसाठी आधीच्या विषयांसोबत अभ्यासाच्या अभिनव पद्धती, पर्यावरण, राष्ट्रप्रेम यांचं महत्त्व सांगितलं जातं. स्वानंदयोग या कोर्समध्ये आयुष्यातील महत्त्वाचं धन कोणतं, सुख म्हणजे काय, उत्कर्षाचा पासवर्ड, निसर्ग नियम, मन:स्वास्थ्य, परमेश्वराविषयी समज, गैरसमज, परमेश्वराचे रूप स्वरूप, प्रपंचात राहून परमार्थ कसा साधायचा यावर मार्गदर्शन केलं जातं. जो देतो तो देव, म्हणजेच आई-वडील, नातलग, मित्र, वृक्ष, प्राणी, पक्षी या सर्वातच ईश्वर आहे. त्यामुळे ‘सर्वांचं भलं कर’ अशी प्रार्थना केल्यास त्याचे सकारात्मक पडसाद आपल्या आयुष्यावर नक्कीच उमटतात. तुकोबांच्या “मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण”, या पंक्ती प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याचं तंत्र प्रल्हाद पै यांच्या मनोज्ञ विवेचनातून मानत उतरत जातं आणि आपसूक ओठांवर विश्वप्रार्थना येते, “हे ईश्वरा, सर्वांचं भलं कर, कल्याण कर…”
‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तत्त्वज्ञान जगासमोर मांडले ते सद्गुरू वामनराव पै यांनी. त्यांच्या विचारात जगण्याच्या सत्याचे गमक दडलेले आहे. माणसाचे मन हेच त्यांच्या वागण्याला पूर्णत: जबाबदार असते. “षडरिपूंनी गांजलेल्या मनावर ताबा मिळवता आला की, जगणे अापोआप निरामय होते. हे कौशल्य ज्याला जमले, तो आनंदाचा साक्षीदार होतो, खरं तर आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो”, असे सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितले आहे. त्यांच्या या मौलिक विचारांची धुरा त्यांचे सुपुत्र प्रल्हाददादा पै हे नेटाने सांभाळत आहेत. त्यांनी जगण्याच्या तत्त्वज्ञानाची उत्तम सांगड घालून जगणे कसे आनंदी करावे हे गप्पा मारताना सांगितले.
सद्गुरूंप्रमाणे प्रल्हाददादा अगदी सहज सोप्या अन् ओघवत्या शैलीतून आनंदाची गुरुकिल्ली आपल्या हातात देतात. आनंद मिळवण्यासाठी खूप मोठा त्याग करायची गजर नाही, फार खर्च करून आणि नवससायास करून जे प्राप्त होणार नाही, ते दादांच्या अमृतवाणीतून प्राप्त होते असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘जीवनविद्या’ म्हणजे जीवनाचे विज्ञान आणि सुसंवाद, यशस्वी जीवन जगण्याची कला. त्यासाठी त्याने सर्व गोष्टी आपल्याच मनासारख्याच झाल्या पाहिजेत हा आग्रह सोडला पाहिजे. दुसऱ्याबद्दल मत्सर, इर्षा, पैशाची हाव यात दु:खाचे मूळ दडलेले आहे. प्रत्येकाने ‘मी’ म्हणून जगण्यापेक्षा ‘आम्ही’ आणि ‘आपण’ असे जगले पाहिजे. कारण सृष्टीच्या या कालचक्रात ‘मी’ कधीच एकटा नाही. प्रत्येकाचा परस्पर संबंध आहे, कारण माणसाचे शरीर पंचमहाभुतांपासून बनलेले आहे. माणसाच्या मनात अचाट सामर्थ्य आहे. त्याची अनुभूती घेण्यासाठी त्याच्या दिव्य मनाने नेहमी सकारात्मक गोष्टींचे चिंतन केले पाहिजे, तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही आनंदी होऊन माणसाला सुख प्राप्त होऊ शकते. ‘आनंद हाच गोविंद’ आहे. माणसाचा जन्म हा आनंद उपभोगण्यासाठी असतो; परंतु अनेकदा दुसऱ्याला दु:ख देण्यात बराच वेळ निघून जातो. मग आनंद सोडा माणसाला कोणतीच तृप्तता मिळत नाही, आपण जर दुसऱ्याला आनंद दिला, तर आपल्याला अनेक पटींनी तो आनंद परत मिळतो. ज्ञानामुळे अंधश्रद्धा गळून पडते, व्यसने सुटतात, कामात यश मिळते, आरोग्य उत्तम राहते, आजार दूर पळतात म्हणजेच जीवनाची प्रगतीच्या दिशेन दौड सुरू होते. ज्या वेळेस नकारात्मक विचार संपून सकारात्मक विचार निर्माण होतात. माणूस चिंतामुक्त होतो. ‘जे चमकते ते सगळे सोने नसते’ या म्हणीप्रमाणे बाहेरून चांगली दिसणारी सगळीच माणसे अंर्तमनातून स्वच्छ असतातच असे नाही.
प्रारब्ध, संचित भोगावे लागले तरी देखील या जन्मात चांगले जगण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्वस्वी आपल्याच हातात असते. निसर्गाच्या नियमात बदल होत नाही. कोऱ्या पाटीवर सकारात्मक बदल करायला पाहिजे म्हणजेच लहान मुलांवर चांगले संस्कार करायला पाहिजेत, तर चांगली पिढी तयार होईल. दूषित विचार हेच दु:खाचे कारण आहे. चांगल्या विचारांचे फळ मोठे आहे. ज्ञान देणे, आनंद वाटणे हेच स्वत:साठी, राष्ट्रासाठी आणि जगासाठी महत्त्वाचे आहे. यावर्षी सद्गुरूंच्या जन्मशताब्दी प्रीत्यर्थ प्रल्हाददादा यांनी ही आनंदाची चळचळ राष्ट्रीय करण्याचा संकल्प केला आहे. पुढे जाऊन ही चळवळ ‘वैश्विक मनात’ एकरूप होऊन एका नव्या सत्याला गवसणी घालणार आहे. ही चाकोरीबाहेरची वाट देखील त्यांना सकारात्मक चिंतनातून सापडलेली,अद्भुत,अलौकिक आणि अर्तक्य असून, सुगम आणि सहजसुंदर आनंदी मनाला गवसणी घालणारी आहे आणि हे असेच निरंतर घडत राहिले, तर नक्कीच अवघाची संसार सुखाचा होईल आणि ‘अवघा रंग एक झाला’चा आनंद प्रत्येकाला उपभोगता येईल.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…