
शेकडो कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यापासून त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची (Shivsena) ताकद वाढतच चालली आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचे कार्य आवडले आणि ते ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या पक्षात सामील झाले. आता मनसेच्याही (MNS) कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदेंच्या कार्याची भुरळ पडली असून कल्याणमध्ये (Kalyan) मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत सामील झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष ओम लोके, महिला विभाग अध्यक्ष शहर शितल लोके आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कल्याण-डोंबिवली परिसरात न्यायालयीन लढाई लढणारे अॅड. सुहास तेलंग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सध्या राज्यात टोलच्या झोलची प्रचंड चर्चा आहे. यात राज ठाकरेंनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे. टोलचा हा प्रश्न मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीतून सामंजस्याने सोडवण्यात आला असला तरी निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही तर कठोर भूमिका घेण्याचा इशारा राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे. अशातच राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडून मुख्यमंत्र्यांना साथ दिल्यामुळे हा राज ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "एकनाथ शिंदेंच्या प्रेमापोटी आणि ते ज्याप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत, ते पाहून दरदिवशी मोठ्या संख्येने नगरसेवक, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आमचे नेते आणि मुख्यमंत्री दिवसातील १६-१६ तास काम करत आहेत. जनतेसाठी झटत आहेत, हे लोकांना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
"आज नांदीवलीमधून ओम लोके, सुहास तेलंग यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. कल्याण लोकसभेत ज्याप्रकारे कामं सुरू आहेत. या कामांना प्रभावित होऊन आणि येथे आमचे कार्यकर्ते व पदाधिकारी ज्याप्रकारे काम करतात, त्यांनी जशी संधी मिळते, ते पाहून मनसेचे पदाधिकारी आमच्याकडे आले. राज्यात विकासाची घोडदौड पाहून सगळे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. येत्या काळात वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील,” असा विश्वासही खासदार शिंदे यांनी व्यक्त केला.