
क्रिकेटसह बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस, फ्लॅग फुटबॉल, तसेच स्क्वॉशचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश केल्याची ऑलिम्पिक कमिटीची घोषणा
मुंबई : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत २०२८ (Olympic 2028) पासून क्रिकेट (Cricket) या खेळाचा समावेश केला जाईल, अशी घोषणा आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून करण्यात आली. लॉस एंजेलिस (Los Angeles) येथे होणार्या २०२८च्या ऑलिम्पिक सामन्यांत पहिल्यांदाच क्रिकेट खेळले जाणार आहे. यासोबतच आणखी विशेष बाब म्हणजे, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस आणि फ्लॅग फुटबॉल, तसेच स्क्वॉशचाही २०२८च्या ऑलिम्पिक सामन्यांत समावेश करण्यात आला आहे. ऑलिम्पिक समितीने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
२०२८ च्या लॉस एंजेलिस उन्हाळी ऑलिम्पिक गेम्समध्ये क्रिकेटच्या समावेशाबाबत, ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, "१.४ अब्ज भारतीयांसाठी, क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तो एक धर्म आहे! त्यामुळे मला आनंद होत आहे की हा ऐतिहासिक ठराव आहे. आपल्या देशात मुंबई येथे होत असलेल्या १४१व्या ऑलिम्पिक समितीच्या सत्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केल्याने नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये ऑलिम्पिक चळवळींसाठी सखोल सहभाग निर्माण होईल. तसेच, क्रिकेटच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेला चालना मिळेल."
ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले, "या पाच नवीन खेळांची निवड अमेरिकेच्या क्रीडा संस्कृतीशी सुसंगत आहे आणि हे खेळ ऑलिम्पिकला अद्वितीय बनवतील. त्यांच्या समावेशामुळे ऑलिम्पिक चळवळीला यूएस आणि जागतिक स्तरावर नवीन अॅथलेट्स आणि चाहत्यांच्या समुदायांशी संलग्न होता येईल."