
नवी दिल्ली: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३(cricket world cup 2023) सुरू होण्याआधी वर्ल्डकप खिताबाचा दावेदार म्हणून इंग्लंडकडे पाहिले जात होते. विश्वचषकाआधी जोस बटलरच्या टीमने गेल्या दीड वर्षात जो काही खेळ केला होता ते पाहून इंग्लंड टॉप ४मध्ये सामील होईल हे म्हणणे अजिबात अतिशयोक्तीचे वाटले नसते.
मात्र संघाने ज्या पद्धतीने सुरूवातीचे ३ सामने खेळले आहेत ते पाहून क्रिकेट पंडितही हैराण झाले आहेत. कालच्या सामन्यात तर इंग्लंडने हद्दच केली. त्यांना चक्क अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार जोस बटलरने पाहा काय म्हटले आहे.
अफगाणिस्तानकडून धक्कादायक पराभव स्वीकारल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने मान्य केले की त्यांच्या संघाने विश्वचषक स्तरावरील कामगिरी केली नाही. अफगाणिस्तानने या विश्वचषकात धक्कादायक निकालाची नोंद करत रविवारी इंग्लंडला ६९ धावांनी हरवले.
आम्ही अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही
पराभवानंतर बटलर म्हणाला, हे निराशाजनक आहे. टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी निवडली मात्र अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलो नाही. अफगाणिस्तानने प्रत्येक विभागात आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली. आम्ही त्या स्तरावर खेळ करू शकलो नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात आम्ही निराशा केली. अफगाणिस्तानकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे आणि मैदानावर तसे दवही नव्हते जशी आम्ही अपेक्षा केली होती.