
आगीचे कारण अस्पष्ट
अहमदनगर : नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात आष्टी रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागल्याची (Ahmednagar Railway Fire) भीषण घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान झाले आहे.
नगरमधील रेल्वेला आग लागताच सर्व प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आलं, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. तसेच या गाडीला प्रवाशांचा तेवढा प्रतिसाद नसल्याने गोंधळही झाला नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये रेल्वेचे मोठं नुकसान झालं आहे. आज संध्याकाळी साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या ठिकाणी आता अग्निशमन दल पोहोचलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.