
व्हीआयपींच्या वाढत्या गर्दीमुळे सर्वसामान्य भाविकांची नाराजी
नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्ती पीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील नवरात्र उत्सवास आजपासून प्रारंभ झाला आहे. आईच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून हजारो भक्तांनी सप्तशृंगी गडावर गर्दी केली होती. आज सकाळपासून ते दुपारपर्यंत जवळपास तीस हजार भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले. पहिल्या दिवसाचे नवरूप बघण्यासाठी भक्तांनी आज गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सप्तशृंगी मातेच्या पहिल्या महापूजेचा मान संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष, नाशिक जिल्ह्याचे प्रधान, जिल्हा सत्र न्यायाधीश एच डी जलामनी, नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना मिळाला. उभय महानुभवांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. अकरा वाजता शारदे नवरात्र उत्सवानिमित्त १,१११ घटांची स्थापना करण्यात आली.
मंदिरात जाण्यासाठी ५२० पायऱ्या चढून गेल्यानंतर बारा ठिकाणी बारी लावण्यात आली आहे. मंदिरामध्ये पायऱ्यांवरती ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच प्रवेशद्वाराजवळ नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. देवी संस्थानतर्फे भक्तांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. गावाच्या दीड किलोमीटर अंतरावर ती मेळा बस स्थानकातून भाविकांसाठी परिवहन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दीड किलोमीटर अंतरावरून भावी भक्तांना गावात प्रवेश दिला जात आहे. सप्तशृंगी गडावर भक्तांना सुलभ दर्शन होण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासह संस्थानाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
व्हिआयपी वर्दळीमुळे भाविकांची कुचंबना
सप्तशृंगी गडावर विराजमान झालेली आई भगवती खान्देश आणि गुजरात मधील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खान्देश हे आईचे माहेर मानले जात असून या परिसरासह गुजरात मध्ये स्थायिक झालेले खान्देशवासीय तसेच गुजरातचे भाविक नवरात्रौत्सवात आईच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. हजारो भाविक आठ आठ दिवस पदयात्रा करून आईच्या दर्शनासाठी आल्यानंतर व्हिआयपी लोकांना आधी दिल्या जाणार्या दर्शनामुळे या भाविकांची अनेकदा अडवणूक होते. यावर भाविक नाराजी व्यक्त करताना दिसले.