निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
सर्व जलचर पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर विलक्षण, रंग, पोत, इंद्रधनू चमकते पंख, नक्षीयुक्त आकार, पंखांच्या सुंदर रचना असा वुड डक म्हणजेच लाकूड बदक. वुडी, उन्हाळी, दलदलीचा, कॅरोलिना, एकोर्न, स्क्वीलर, प्लॅटिनम, स्प्लीट सिल्वर अशा अनेक नावाने या लाकूड बदकाला संबोधित करतात. ही बदक युनायटेड स्टेटच्या पूर्वेकडील भागात आढळतात. नदी, झरे, तलाव, दलदल येथे यांचे वास्तव्य असते. यांना लाकूड बदक म्हणतात, कारण हे पाण्यापासून जास्तीत जास्त एक मीटर एवढ्या अंतरापर्यंत असणाऱ्या झाडांवर घरटी बांधतात. घरटे बांधण्यासाठी ते झाडांच्या पोकळ्या शोधतात. कधी कधी तर सुतार पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये सुद्धा स्वतःची अंडी देतात. त्यांच्या घरट्यांचे प्रवेशद्वार हे चार इंच इतके लहान असू शकते आणि दोन फुटांपासून ते पंधरा फूट खोल सुद्धा असू शकते. प्रवेशद्वार पिल्लांच्या संरक्षणासाठी लहान असते.
मादी आणि नर दोघेही वेगवेगळे दिसतात. मादीपेक्षा नर हा खूप म्हणजे खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतो. इंद्रधनुषी हिरवट-जांभळे-निळसर डोक्यावरचे पांढऱ्या किनारीचे चमकदार पंख, काळपट निळे तोंडाजवळचे पंख, लाल काळी किंचितशी पुढे बाक असलेली चोच, लालबुंद डोळ्यांचा, छातीवर तपकिरी रंग आणि त्यावर गळा भरून लांबट पांढऱ्या हिऱ्याचा जणू काही हारच घातलेला आहे असे वाटणारे पंख, पाठीवर इंद्रधनू हिरवट-निळे रंगाचे पंख, तांब्यासारखे चमकणारे तपकिरी रंगाचे दोन्ही बाजूचे पांढरट लांबट रेषायुक्त पंख, पांढरे पोट, काळपट इंद्रधनू शेपूट, गुलाबी पाय असा अतिशय आकर्षक चमकदार, रेशमी पंखांचा नर असतो. काळपट-पिवळी चोच, तपकिरी राखाडी रंगाचे डोक्यावरील पंख, पांढऱ्या पानावर पिवळ्या रंगाच्या किनारीत असलेला काळा डोळा, छाती आणि बाजूला तपकिरी पंखांवर पांढरे ठिपक्यांचे पंख, पाठीवर हलकी इंद्रधनू पंखरचना, काळी शेपूट, पांढरे राखाडी पोट, पिवळे लाल पाय अशी एकंदरीत मादी दिसत असते. त्यातल्या त्यात बदकांच्या या उपजातींमध्ये मादी सर्वात सुंदर आणि नक्षीयुक्त आहे.
खरं तर पक्ष्यांमध्ये मादी दिसण्यास सुंदर नसूनसुद्धा खूपच भावखाऊ असते आणि नर कायमच तिची मनधरणी करत असतो. हे पक्ष्यांमध्येच पाहायला मिळते. गंमत म्हणजे या लाकूड बदकांमधील नर आणि मादी हे दरवर्षी जोड्या बदलू शकतात. एकदा का जानेवारी हिवाळा ऋतू सुरू झाला की हे एकत्र येतात. नर आणि मादी हे दोघं खूप आनंदात असतात. त्यांचे पंख उंच करून, कबुतरासारखे मान मागे पुढे घेत पाण्यात पोहतात. नोव्हेंबरपर्यंत हे पिल्लांना जन्म देतात आणि मग दुसरा जोडीदार शोधतात. म्हणून यांना हंगामी एक पत्नी सुद्धा म्हणतात. यांच्याच उपजातीतील मंडेरियन बदकांसोबत सुद्धा त्यांचे संबंध होऊ शकतात. म्हणजेच पक्ष्यांमध्ये क्रॉस ब्रीड बऱ्याचदा तयार होत असते. म्हणूनच पक्ष्यांच्या अनेक उपजाती आपल्याला दिसतात.
मादी ६ ते १६ अंडी देते. तिची अंडी चमकदार आणि किंचितशी पिवळसर रंगाची असतात. अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याचा अवधी जास्तीत जास्त तीस दिवसांचा असतो. पिल्लं दिल्यानंतर मादी २४ तास घरट्यातच राहते. फक्त दिवसातून काही वेळासाठी ती अन्नासाठी आणि जोडीदाराला भेटण्यासाठी फक्त ४५ मिनिटांच्या कालावधीसाठी बाहेर निघते. तिची सर्व पिल्लं एकाच दिवशी बाहेर पडतात. ही सर्व पिल्लं तपकिरी राखाडी दिसतात. अंगावर भरपूर पिसे घेऊनच पिल्लं जन्माला येतात. त्यामुळेच अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यानंतर २४ ते ४८ तासांच्या आत ती तिच्या पिल्लांना पाण्यात पोहायला नेते. तिथूनच पिल्लं पोहण्यास आणि अन्न शोधण्यास शिकतात. या वुड डकची पिल्लं खूप हुशार असतात. जन्म घेतल्या घेतल्या ३० फूट उंचीवरून पाण्यात उडी घेऊन पोहताना पाहण्यात आली ही पिल्लं. जन्म घेतल्या घेतल्या स्वावलंबी होतात. ही पिल्लं खूप सक्रिय आणि कार्यक्षम असतात. ही पिल्लं आईसोबत पोहत असतात. आईच्या भोवताली तर कधी आईच्या मागे अगदी एकाच रेषेत पोहताना पिल्ल खूप सुंदर दिसतात. पण दुर्दैवाची गोष्ट पहिल्याच एक-दोन आठवड्यांत ९० टक्के पिल्ले दगावतात. या बदकांचे आयुष्य तीन ते चार वर्षांचे असते आणि जास्तीत जास्त १५.
लाकूड बदक हे उत्कृष्ट पोहणारे असतात. तसेच पाण्याखाली सुद्धा ऑक्सिजनचा वापर कमी करून एक मिनिटापेक्षा जास्त काळ राहू शकतात. वनस्पती, बिया, कीटक, जंगलातील एकोर्न, बाजरी, शेंगदाणे, सोयाबीन, कमळ, करवंद, चेरी, पेनिक ग्रास, सुरवंट, माशा, बेडकांसारखे लहान प्राणी, गोगलगायी हा त्यांचा आहार आहे. यांनी खाल्लेल्या अर्धवट बी-बियाणांमुळे अनेक वनस्पतींना पुनरुज्जीवन मिळते. यांचे जेव्हा मी चित्र काढायचे ठरवले, तेव्हा त्यांच्या पंखातली विविधता मला प्रत्येक पंख वेगळा बनवण्यासाठी भाग पाडत होता. यांच्या प्रत्येक पंखाची नक्षी आणि आकार बदलत होता. जेव्हा मी लाकूड बदकामध्ये पंख चिटकवले, तेव्हा एक परिपूर्ण नक्षी त्याच्या गळ्यावर झालेली दिसली. हे चित्र ५७ सें.मी. ४६ सें.मी.पर्यंत आहे. या चित्रात लाकूड बदकाचे कुटुंब, पान वनस्पती, पाण्यावरील शेवाळ आणि या लाकूड बदकांसाठी असणारे परिपूर्ण वातावरण दाखविण्यात आले आहे. खरंच किती आश्चर्य आहे ज्या कोणी या पक्ष्यांच्या कलाकृती त्यांच्या ऊर्जेतून बनवल्या असतील अशा महान शक्तीचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही.
ही लाकूड बदके खूपच हळवी, घाबरट, हळवी, भोळसट, प्रेमळ, बुद्धिमान आणि निरुपद्रवी असतात. या नैसर्गिक सौंदर्याचे जतन, त्याचे संरक्षण आपण करायलाच हवे. ऑर्नीथोलॉजीच्या कॉर्नेल लॅबनुसार सर्व जलचर पक्ष्यांपैकी लाकूड बदक सर्वात सुंदर मानले जाते. यांची जास्त प्रमाणात शिकार झाल्यामुळे ही लाकूड बदके नामशेष होण्याच्या मार्गावर होती. १९३० च्या सुमारास लाकूड बदकांची शिकार करण्यावर बंधने आलीत आणि कडक कायदे केल्यामुळे त्यांच्या संख्या वाढत आहेत. पण आता जर पाहिले, तर यांच्या जोड्यांची विक्री ऑनलाइनसुद्धा होत आहेत. घरातील पाळीव पक्षी म्हणून हे पक्षी नाहीत. सर्व पक्षी हे निसर्गात राहणारे स्वतंत्र जीव आहेत. परमेश्वराने त्यांची निर्मिती विचारपूर्वक केली आहे. त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रत्येक क्षण निसर्गाच्या संतुलनासाठीच आहे आणि या सजीव सृष्टीतील प्रत्येक जीव हा त्याचे निसर्गासाठी असणारे कार्य योग्य पद्धतीनेच करतो. जर आपल्याला यांचे संरक्षण आणि संवर्धन करायचे असेल, तर त्यांची शिकार करणे थांबवून त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…