स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
इस्रायलवर ७ ऑक्टोबरला हमासने अचानक हल्ला चढवला. अवघ्या वीस मिनिटांत पाच हजार रॉकेट्सचा मारा हमासने इस्रायलवर केला. इस्रायलभोवती असलेले सुरक्षा कवच भेदून आणि तारेचे कुंपण उद्ध्वस्त करून हमासचे दहशतवादी घुसले. अचानक झालेला गोळीबार आणि रॉकेटचा मारा यातून इस्रायलमध्ये हाहाकार उडाला. हमासने केलेल्या हल्ल्यांत इस्रायलचे दीड हजार नागरिक तरी मृत्युमुखी पडले. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तीन-चारशे स्त्री-पुरुष, मुलांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केले. महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्यावर अत्याचार केले. हमासने संपूर्ण जगाला क्रूरतेचे भीषण दर्शन घडवले.
इस्रायलची गुप्तचर यंत्रणाही जगात आधुनिक अत्यंत सक्षम म्हणून ओळखली जाते. मग हमास या दहशतवादी संघटनेने एवढा मोठा हल्ला केला, हजारो क्षेपणास्त्रे आणि रॉकेट्सचा मारा केला. देशात घुसून गर्दीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार केला, बायका-मुलांचे अपहरण केले, त्यांच्यावर अत्याचार केला, देशाच्या सरहद्दीवरील सुरक्षा कुंपण व तारांच्या जाळीच्या मजबूत भिंती बुलडोझरने पाडून घुसखोरी केली, याची थोडी सुद्धा कल्पना इस्रायलला कशी आली नाही?
विज्ञान-तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. युद्ध हे मैदानावर लढण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या चार विमानांचे अपहरण केले होते. या चारही विमानांनी वेगवेगळ्या ठिकाणी धडक देऊन हाहाकार उडवायचा हा दहशतवाद्यांचा हेतू होता. न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरला एक विमान धडकले. याच शहरात दक्षिणेला असलेल्या टॉवरला दुसऱ्या विमानाने धडक दिली. वॉशिग्टनमधील संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनला एका विमानाने धडक मारली. दहशतवाद्यांचे लक्ष्य व्हाईट हाऊस हे होते. पण तेथील गर्दी पाहून वैमानिकाचे नियंत्रण सुटले व पेन्सिलवेनियाच्या शेक्सवीलमध्ये ते कोसळले. अमेरिकेच्या संवेदनशील भागावर धडक देण्यासाठी दहशतवादी प्रवासी विमानांचा उपयोग करतील, असा कधी विचारही अमेरिकने केला नव्हता.
अमेरिकेत झालेले चार विमानांचे अपहरण, भारतात झालेले आयसी १८४ या विमानाचे झालेले अपहरण, पाकिस्तानच्या आयएसआय प्रशिक्षित १० दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेला हल्ला, संसदेत घुसून दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, मुंबईत घडवलेले १२ बॉम्बस्फोट, पुलवामा येथे सुरक्षा दलाच्या वाहनांवर झालेला दहशतवादी हल्ला अशा किती तरी घटना सांगता येतील की, गुप्तचर यंत्रणेला गुंगारा देऊन दहशतवाद्यांनी रक्तरंजित सडे रस्त्यावर शिंपडले आहेत. खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू हमासप्रमाणे भारतावर हल्ला करण्याची धमकी देत आहे.
भारतावर गेल्या चार दशकांत अनेक भयावह दहशतवादी हल्ले झाले आहेत. आयएसआय, हमास, खलिस्तान, लष्कर-ए-तोयबा, जैश ए मोहम्मद अशा अनेक संघटना हल्ले करण्यास संधी शोधत असतात. जुलै २०१६ मध्ये केंद्राने सन २००५ पासून भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची आकडेवारी जाहीर केली. या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये ७०७ लोक ठार झाले व ३२०० हून अधिक जखमी झाले. गेल्या चार दशकांतील दहशतवादी घटनांची यादी पाहिली, तर भारताने सदैव सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. हमासने तिकडे हिंसाचार-रक्तपात घडवला म्हणून भारताने बेसावध राहून चालणार नाही.
दि. १७ ऑक्टोबर १९९१ रोजी खलिस्तान नॅशनल आर्मीने उत्तराखंड येथे रूद्रपूर शहरात केलेल्या बॉम्बस्फोटात ४० जण ठार व १४० जखमी झाले.
दि. २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरूबंदर येथे आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे हत्या झाली. त्यांच्याबरोबर अन्य १६ जण ठार, ४३ जण जखमी झाले. दहशतवाद्यांचे लक्ष्य राजीव गांधी हेच होते. आरडीएक्सने भरलेला पट्टा आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आला. त्याच वर्षी पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेक्यांनी १५ जून १९९१ रोजी लुधियाना जिल्ह्यात रेल्वेमध्ये घडविलेल्या बॉम्बस्फोटात १२६ जण ठार झाले.
दि. ८ नोव्हेंबर १९९१ रोजी कल्याण रेल्वे स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटात १२ ठार व ६५ जखमी झाले.
दि. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत दहशतवाद्यांनी १२ ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले. त्यात २५७ ठार व १४०० लोक जखमी झाले. या हल्ल्याचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दि. २१ मे १९९३ रोजी दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १३ ठार व ३९ जखमी झाले. जम्मू-काश्मीर इस्लामिक लिबरेशन फ्रंटच्या सहा दहशतवाद्यांना दोषी ठरविण्यात आले.
दि. २२ मे १९९६ रोजी राजस्थानातील दौसा येथे सामलेटी गावाजवळ बसमध्ये बॉम्बस्फोट झाला व त्यात १४ प्रवासी ठार झाले व ३७ जखमी झाले. काश्मीर इस्लामिक फ्रंटने हाबॉम्बस्फोट घडवला. ब्रह्मपुत्रा मेलमध्ये ३० डिसेंबर १९९६ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३३ लोक ठार झाले. बॉम्बस्फोटाने रेल्वे रुळावरून घसरली.
दि. १४ फेब्रुवारी १९९८ रोजी कोइम्बतूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ५८ लोक ठार झाले व अन्य ११ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात २००हून अधिक जखमी झाले. राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर २२ डिसेंबर २००० रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन सैनिक व एक नागरिक ठार झाला. पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला घडवला. १ ऑक्टोबर २००१ रोजी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेवर कार बॉम्बस्फोट झाला. तीन आत्मघाती हल्लेखोरांसह हल्ला झाला. त्यात ३८ लोक ठार झाले, ६० जखमी झाले, तीनही हल्लेखोर ठार झाले. भारतीय संसद भवनावर १३ डिसेंबर २००१ रोजी दहशतवादी हल्ला झाला. लष्कर-ए-तोयबा व जैश ए मोहम्मद यांनी हल्ला घडवला. आठ सुरक्षारक्षक, एक माळी असे नऊजण ठार झाले, १८ जण जखमी झाले. लष्करी गणवेशात घुसलेले आठही दहशतवादी ठार मारले गेले.
दि. २ डिसेंबर २००२ रोजी मुंबईतील घाटकोपर बस स्थानकाजवळ बेस्ट बसमधील सीटखाली ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात २ ठार झाले व ५० हून अधिक जखमी झाले.
दि. २४ सप्टेंबर २००३ रोजी गुजरात गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात ३३ ठार व ६० जखमी झाले.
दि. २७ जानेवारी २००३ रोजी मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ सायकलवर ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला व २८ जखमी झाले. त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे मुंबईला त्या दिवशी भेट देणार होते.
दि. १३ मार्च २००३ रोजी मुंबईतील मुलुंड येथे लोकल ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळेत रात्री पावणेआठ वाजता बॉम्बचा स्फोट झाला. हा बॉम्ब प्रथम श्रेणीच्या महिलांच्या डब्यात ठेवण्यात आला होता. त्यात १० ठार झाले व ७० जखमी झाले.
दि. २५ ऑगस्ट २००३ रोजी मुंबईत दुहेरी कार बॉम्बस्फोटात ५४ लोक मारले गेले व ३०० जखमी झाले. एक बॉम्बस्फोट गेट वे ऑफ इंडियाजवळ झाला, तर दुसरा झवेरी बाजारात ज्वेलरी मार्केटमध्ये झाला. दोन्ही ठिकाणी पार्क केलेल्या टॅक्सीत बॉम्ब ठेवले होते.
दि. २९ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्ली झालेल्या तीन बॉम्बस्फोटांत ६२ लोक ठार झाले व २१० जखमी झाले.
दि. ११ जुलै २००६ रोजी मुंबईत लोकल ट्रेनमध्ये ऐन गर्दीच्या वेळेत सात वेगवेगळ्या लोकल्समध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आले. अवघ्या ११ मिनिटांच्या कालावधीत हे सारे घडले. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांत प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. या स्फोटांत २०९ लोकांचा मृत्यू झाला व ७०० हून अधिक जखमी झाले.
दि. १८ फेब्रुवारी २००७ रोजी समझोता एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या बॉम्बस्फोटात ७० जण ठार झाले. त्यात डझनभर तरी जखमी झाले. बहुतांशी पाकिस्तानी होते. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानमधील एका दहशतवादी संघटनेने चार दिवस मुंबईला वेठीला धरले होते. त्यात १७५ ठार झाले. ३००हून अधिक जखमी झाले. ९ दहशतवादी हल्लेखोरही मुंबई पोलिसांनी टिपले.
दि. १३ जुलै २०११ रोजी मुंबईत सायंकाळी ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार, दादर, पश्चिम अशा गर्दीच्या भागात बॉम्बस्फोट झाले. त्यात २६ ठार व १३० जखमी झाले. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिद्दीनचा सहभाग होता.
दि. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर पुलवामा जिल्ह्यात लेथापोरा येथे आत्मघाती हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेने स्वीकारली.
[email protected]
[email protected]