विशेष: पूर्णिमा शिंदे
मानसिकता बदला हो! खरंच गरज आहे मानसिकता बदलाची. हॉस्पिटलच्या दारातच बाळ रडण्याचा आवाज येतो. बाळ-बाळंतिणीच्या तब्येतीपेक्षाही एक प्रश्न जन्मापासून उभा राहतो. ‘काय झालं, मुलगा की मुलगी?’ मुलगा म्हटलं की, स्वर्गाला दोन बोटे आणि मुलगी म्हटलं की, अख्ख्या जगात मीच दुर्दैवी, असे समजणे. दर हजारी मुलामागे ९३४ मुली हे प्रमाण असताना जगात लग्नाला सामोरे जाताना मात्र उदासीनताच. लग्नासाठी मुलींची स्थळे, वधू संशोधनात तुटवडा का होऊ लागलाय? याचे खरे कारण लिंगभेद चाचणीवर बंदी असूनही मुलगाच हवा या अट्टहासावर आजवर अनेक गर्भपात घडवून आणणारे कमी नाहीतच.
समाजात मुळाशी याची कारणे पाहिल्यास एक स्त्रीला दुय्यम स्थान, कमी लेखणे, अवहेलना करणे, निर्णयात वंचित ठेवणे. स्त्री उपभोग्य वस्तू, कळसूत्री बाहुली पुरुषप्रधान संस्कृतीच्या बेड्या, लक्ष्मणरेषा, अबला, स्त्री माणूस नाहीच असे वागणे, तिला जनावर समजून तिची लगाम आपल्या हाती ठेवून मुलगी ही मुलापेक्षा शूद्र, ती परक्याचे धन, काचेचे भांडे, तू बाई आहेस… वगैरे वगैरे. पण ती बाईसुद्धा माणूसच आहे ना! तिलाही मन आहे, भावना आहे.
एका स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विचार करता आज सर्वच क्षेत्रात कर्तृत्वाला सिद्ध झालेली झालेली ही नवदुर्गा आहे. का ती आधार देऊच शकत नाही, तिच्या शक्तीवर संशय, या अनेक खुळचट कल्पना, पूर्वग्रहदूषित भावना, त्यात वंशाला दिवा मुलगाच हवा! तोच समाजात वृद्धापकाळी आधार देईल. तोच सुख देणारा, सर्वस्व, वंशवृद्धी, पिढी चालवणारा, पारिवारिक गादीचा वारस वगैरे वगैरे असा भ्रम अजूनही समाजात आहे. खूप काळ लोटला तरी यातून अजून काही म्हणावे, असे बाहेर न पडणारेच तोंडावर पडतात. मध्यंतरी लिंगभेदाच्या तपासणीवर बंदी असूनही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होती. पण तरीही मुली या पदोपदी शिक्षण, संगोपन, स्वावलंबन, आधारस्तंभ देऊनही आई-वडिलांना वृद्धापकाळी सांभाळतात सांभाळतात. पण मुलं मात्र पळ काढताना दिसतात. शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेशी स्थिरावणारे तर कारणे देऊन अखेरच्या कार्याला सुद्धा येत नाहीत. जबाबदारी झिडकारून स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवही उरत नाही, ना संवेदना. शिवाय मनाला कुठे बोचही नसते.
विषय असा आहे की, मुलगा व मुलगी जन्म देताना यातना, कळ, वेणा, वेदना तितक्याच होतात. तरीही तो आणि ‘ती’ असा पक्षपातीपणा सुरू होतो. हक्क, न्याय, शिक्षण, अधिकार वारसा, मालमत्ता, वागणूक यासाठी तुलनात्मक भेदभाव इतकच काय तर वाटणी हिस्सासाठी ही मुला-मुलींच्या समानतेचे सुशिक्षित पालकसुद्धा सोयीनुसार वाटप करतात. ती पाहुणी होते. ना पतीच्या घरी ना पित्याघरी. तशी तिला ना घरका ना घाटका. इकडे बोलावं, हे तुझे घर नाही. तिकडे बोलावं, हे तुझं घर नाही. मात्र ती मध्येच राहते मनाने कायमची… अधांतरी…, असो तरीही न डगमगता ती स्वसामर्थ्यावर तिचे स्वत्त्व, अस्तित्व, स्त्रीत्व यावरही अढळ स्थान निर्माण करते. परिस्थितीशी झुंजते. ती होते स्वयंसिद्धा. स्वकर्तृत्वाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी, सिद्ध करून जगाला पटवून देणारी स्वयंसिद्धा. जगाला पटवून देणारी तूच दुर्गा, तू भवानी… तू जगदंबा, तूच जमदग्नी… चंड मुंड विनाशिनी तूच तेजस्विनी, यशस्विनी, कर्तृत्वशालिनी… अशा ‘ती’च्या स्त्रीत्वाचा सन्मानपूर्वक जागर व्हायलाच हवा…