विशेष: लता गुठे
फेसबुक उघडलं आणि सहजच माझीच एक हिंदी कविता समोर आली… त्या कवितेचे शीर्षक आहे मै कहां अकेली हूं… त्याच कवितेतील काही ओळी वाचक दिनाच्या निमित्ताने…
‘मेरी किताबें मेरे हमसफर
कहां मुझे अकेले छोड़ते हैं
जब से मैंने होश संभाला हैं
तब से वह मेरे साथ रहते हैं’
जेव्हा एखादी गोष्ट खूप काळ आपल्याबरोबर सोबत करते, त्यावेळेला त्या गोष्टीवर आपली मैत्री होते आणि ही मैत्री कायम आपल्या सोबत आनंदाचे सरोवर निर्माण करते. आपला एकांत दूर करते तीच खऱ्या अर्थाने आपले साथीदार असू शकतात. जेव्हा आपण जोडीदार किंवा साथीदार याचा विचार करतो, त्या वेळेला फक्त आपल्या लाईफ पार्टनरचा विचार केला जातो; परंतु आज वाचक दिनाच्या निमित्ताने ‘मी आणि माझे साथीदार माझी पुस्तकं’ याविषयी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याला व्यापलेलं पुस्तकांचं गारूड वाचकांना सांगावसं वाटतं.
पुस्तकाचं आणि माझं नातं मला कळतंय तेव्हापासून निर्माण झालं. पुस्तकाशी मैत्री केली ती मी दुसरीला होते तेव्हापासून. मला गोष्टी प्रचंड आवडायच्या. दुसरीला आम्हाला गोष्टीचं पुस्तक अभ्यासाला होतं त्या पुस्तकातील गोष्टी वाचता येण्यासाठी मी लवकर वाचायला शिकले. नंतर हळूहळू वाचत गेले आणि पुस्तकांशी माझी मैत्री झाली. फक्त मैत्रीच झाली नाही, तर प्रेम जडलं. मला आजही आठवतंय चौथीत असताना मला माझ्या वडिलांनी नवीन पुस्तकं आणली होती. त्या कोऱ्य पुस्तकांचा वास दिवसभर घेत होते. पुस्तकांच्या कोऱ्या वासाची टेस्ट डेव्हलप झाली ती कायमचीच. शाळेत येणारी चांदोबा, चंपक ही बालमासिके आवडती. त्याचे वाचन करू लागले आणि बालमनावर या बालमासिकांची छाप उमटवली. माझ्या वयाच्या वेगवेगळ्या वळणांवर पुस्तकांनी साथ दिली.
आमच्या लहानपणी शालेय पुस्तकांमध्ये कविता आणि धडे अतिशय छान असायचे अगदी पटकन कळतील असे. सोप्या, साध्या शब्दांत लिहिलेली असल्यामुळे त्या कविता अगदी चटकन ओठांवर बसायच्या आणि सारख्या म्हणून म्हणून पाठही व्हायच्या. पाठ्यपुस्तकातील कविता श्रावणमासी, गवतफूल, औदुंबर, माझी बाहुली, गाई पाण्यावर आल्या अशा अनेक कविता आजही तोंडपाठ आहेत. विशेष म्हणजे गोष्टींच्या पुस्तकातील गोष्टी वाचताना आजूबाजूच्या जगाचं भानच राहत नसे. गोष्टीतील पऱ्या, राजकुमार, राजकुमारी, बोलणारे पक्षी, प्राणी बालमनाला साद घालू लागली. ती विशेष आवडीची झाली. त्या पुस्तकाचा कोऱ्या पानांचा वास मनापर्यंत अलगद पोहोचला. पुस्तकांच्या मुखपृष्ठावरील अक्षरांवर डोळे एकरुप व्हायचे आणि शाळेतील मित्र, मैत्रिणींसारखे पुस्तकंही मित्र बनून सोबत करायला लागले. पुस्तकांनी भरभरून आनंद दिला. शब्दांचे अर्थ विचारांना खाद्य देऊ लागले. पुस्तकांना कव्हर घालून त्याला जीवापाड जपायला मी लहानपणीच शिकले.
पुस्तकांमुळेच मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण झालं. विकासाच्या एक टप्प्यावर हाती लागलेल्या पुस्तकांनी मानवी इतिहास, संस्कृती आणि ज्ञान यांची जोपासना केली. पुस्तकांमधूनच माणसाचे माणूसपण आकाराला आले. माझ्याच एका कवितेत मी म्हटलं आहे…
‘कवितेचं पुस्तक चाळताना
जरा सावकाश हं…
कवीचं काळीज
गुंतलेले असेल एखाद्या पानात…’
असं पुस्तकांचं आणि माझं हळुवार हळवं नातं एकमेकांत गुंफलं गेलं आहे. मला आजही आठवतंय मी पाचवीत असताना शाळेत पुस्तक विसरले. त्या दिवशी कितीतरी वेळ झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांच्या आधी न जेवता शाळेत गेले. शोध शोधलं पण पुस्तक भेटलच नाही. कितीतरी दिवस ते पुस्तक मी शोधत होते. किती लळा लावतात पुस्तकं, हे पुस्तकांवर प्रेम करणारांनाच समजतं. आठवी-नववीला गेल्यानंतर पुस्तकं मला सुख-दुःख वाटून घेणारे सख्खे साथीदार वाटू लागले. वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांच्या कादंबऱ्या, कथासंग्रह माझ्या स्वप्नातील सुप्त भावनांना आकार देऊ लागले आणि पुस्तकं माझे आयुष्यभराचे सोबती झाले. म्हणूनच मला वाटतं माझं संपूर्ण जीवनच पुस्तकांनी व्यापून टाकलं आहे. खरं तर माझं जीवनच एक पुस्तक झालं आहे. त्याची काही पानं लिहिलेली, तर काही कोरी आहेत.
काही पूर्वसंचिताने लिहिलेली, तर काही माझ्या अनुभवाचे संचित मांडण्यासाठी आहेत. जगण्यातील सुख-दुःखाचे अनेक धागे या पुस्तकामध्ये अडकलेली आहेत. ‘मी आणि माझी पुस्तक’ जेव्हा याचा विचार करू लागले, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली. पुस्तकानेच मला माझी ओळख निर्माण करून दिली. प्रथम वाचू लागले, वाचता-वाचता लिहू लागले आणि लिहिता-लिहिता पुस्तकं प्रकाशित करू लागले. गेली बारा वर्षे दोन दिवाळी अंकांचे संपादन आणि प्रकाशन करताना अनेक अनुभव आले. ही माझ्यासाठी एक कार्यशाळाच ठरली. निर्मितीची सर्जनशील प्रक्रिया माझ्या सृजन मनाला आव्हान करते. रोज नवीन संकल्पना आकार घेऊ लागतात आणि त्या साकार करताना मी मला विसरते. नवनिर्मितीचा आनंद उपभोगताना जो आनंद होतो तो शब्दांच्या पलीकडला असतो. पुस्तकांनी ज्ञान दिलं, जगाची ओळख पुस्तकातून झाली. मदर टेरेसा, बराक ओबामा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मचरित्रातून परिस्थितीशी झुंजण्याचं बळ मिळालं. मनात घडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं पुस्तकातून मिळाली.
गेली १५ वर्षे लेखिका, प्रकाशिका, संपादिका या तीनही क्षेत्रात कार्य करताना प्रत्येक दिवशी पुस्तकांची नव्याने ओळख झाली. समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. माझंच नाही तर आजूबाजूच्या समग्र जीवनाचं चित्रं साहित्यातून आधोरेखित करू लागले, तेव्हा ते पुस्तक फक्त माझं न राहता वाचकांचं झालं. मी लिहिलेल्या ‘मना मना दार उघड’ पुस्तकाने अनेकांचे विचार परिवर्तन केले. समग्र जीवन पुस्तकांनी व्यापलं. त्यामुळे माझं जीवन समृद्ध झालं. पुस्तकांची मैत्री ही सर्वश्रेष्ठ मैत्री आहे असं मला तरी वाटतं… माझे खरे साथीदार हे पुस्तकंच आहेत, हे मी आवर्जून वाचकांना सांगेन.