Friday, November 8, 2024
Homeसाप्ताहिककोलाजस्त्री शक्तीचे शारदीय नवरात्र!

स्त्री शक्तीचे शारदीय नवरात्र!

गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी

भारतीय संस्कृतीत देवदेवतांच्या विविध रूपाची, स्वरूपाची उपासना, नामस्मरण, भजन, कीर्तन करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्राला विशेष महत्त्व असून संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. शरद ऋतूच्या सुरुवातीला, अश्विन माहिन्यात, अश्विन शुल्क प्रतिपदा ते नवमी या नऊ रात्री, दहा दिवसांच्या कालावधीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ते शारदीय नवरात्र!

घटस्थापना म्हणजे पवित्र पाण्याने भरलेला कलशांत (घटात) माता दुर्गाला आवाहन केले जाते. घटामध्ये देवीची स्थापना केली जाते, म्हणजेच देवीदुर्गा घटात नऊ दिवस निवास करते. काही ठिकाणी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती आणतात. कलश पूजन, बाजूला अखंड दिवा तेवत असलेला नंदादीप, झेंडूंच्या फुलांच्या माळा, जागरण, गोंधळ, भोंडला, गरबा, कन्यापूजन, महाअष्टमी, महानवमी व दसरा इत्यादीने शारदीय नवरात्र नटलेले असते. देवी दुर्गेचे वाहन सिंह असले तरी नवरात्रांत पृथ्वीवर येताना वारानुसार तिचे वाहन ठरते. या वर्षी नवरात्रीचा पहिला दिवस रविवार असल्याने दुर्गामाता हत्तीवर स्वार होऊन येते आणि तो दिवस शुभ आहे.

शस्त्रात्र धारण करणारी देवी दुर्गा शक्तीची प्रतीक मानली जाते. पौराणिक कथेनुसार, भगवान ब्रह्मदेवाकडून ‘कोणताही मनुष्य तुला मारू शकणार नाही’ हा वर दैत्य महिषासुराला मिळाल्याने, गर्वाने त्यांनी सगळीकडे दहशत पसरवली होती. यानंतर ब्रह्मा-विष्णू-महेश यांनी त्याचा वध करण्यासाठी देवी दुर्गाकडे साकडं घातलं. देवी दुर्गाने महिषासुराबरोबर नऊ दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी महिषासुराचा वध करीत विजय साजरा केला, तो दिवस ‘दसरा’!

देवी सरस्वती ही ज्ञान, विज्ञान, कलेची देवी! दसऱ्याला सरस्वती देवीची पूजा करतात. त्याचबरोबर प्रत्येकजण आपल्या व्यवसायातील यंत्राची, उपकरणांची, साधनांची पूजा करतो. नवरात्र सण म्हणजे स्त्री शक्तीच्या पूजेचा सण! अशाच काही कर्तबगार महिलांचा आढावा! इतिहासात डोकावताना – सतत स्वारीवर असणाऱ्या संभाजीराजेंच्या स्वराज्याची दोर महाराणी येसूबाई सक्षमपणे सांभाळत होत्या. पतीच्या मृत्यूनंतर ताराबाई शिंदे यांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी केलेले कार्य. प्रशासकीय आणि सैन्याच्या कामांत पारंगत असलेल्या, न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या, देशांत पूल, रस्ते, मंदिर बांधणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. भारतीय विद्रोहाच्या नेत्या राणी लक्ष्मीबाई ते भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सुषमा स्वराज… भारतीय विधवांच्या कल्याणाचा मार्ग मोकळा करणाऱ्या, स्त्रीहक्क पुरस्कर्त्या पंडिता रमाबाई रानडे.

वैद्यक शास्त्रांतील : आनंदीबाई जोशी, इंदिरा अहुजा. विज्ञानांत कमला सोहनी ते कोरोनासाठी व्हॅक्सिन जे तयार करण्यात आले त्यात महिलांचा समावेश होता. अवकाश शास्त्रांत मिसाइल वूमन टेसी थॉमस ते चंद्रयान २/३मधील महिलांचा सहभाग उल्लेखनीय आहे. शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले, शिक्षण क्षेत्रांत बाल शिक्षणाचे सकस प्रयोग करणाऱ्या अनुताई वाघ, ताराबाई मोडक, नर्मदा सरोवराजवळील मानवी हक्कासाठी लढा देणाऱ्या मेधा पाटकर, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या राजकीय नेत्या मृणाल गोरे, सामाजिक नेत्या विद्या बाळ, रस्त्यावरच्या निराधार मुलांना शिक्षणासहित सहारा देणाऱ्या रेणू गावस्कर, डॉ. राणी बंग यांचे गडचिरोलीत आदिवासी लोकांच्या आरोग्यासाठी आणि तरुणाईना मार्गदर्शनासाठी निर्माण संस्थेचे चाललेले कार्य. गढवाल गावातील सामान्य कुटुंबातील एव्हरेस्ट सर करणारी बचेंद्री पाल. अमृतसर येथील मध्यम कुटुंबातील भारताच्या पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी, पहिल्या स्त्री वकील (बॅरिस्टर) सोराबजी यांनी आपल्या वाट्याला आलेल्या उपेक्षाविषयी निर्भीडपणे मत मांडले होते. भारतीय कुटिर उद्योगात आणि पारंपरिक कलेच्या क्षेत्रांत पायाभूत काम करणाऱ्या कमलादेवी चटोपाध्याय. साहित्यात दुर्गा भागवत ते नीरजा. चित्रपटातील काम करणाऱ्या लोकांच्या पोषाखासाठी ऑस्कर मिळविणाऱ्या भानू अथय्या. भरतनाट्याच्या जनक रुख्मिणीदेवी अरुंडेल, चित्रकलेच्या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय स्तरांवर नावाजलेली अमृता शेरगील. अशा अनेक महिलांची झेप वैयक्तिक असली तरी त्या स्वकर्तृत्वावर, अनेक अडचणींवर मात करीत त्यांनी निर्माण केलेले स्थान पुढच्या महिलांना वाट दाखवते. असे म्हणतात शिवराय घडवायचे असतील, तर जिजाऊ जन्माला आली पाहिजे.

आज मुलाला पाळणाघरात ठेवून, आपल्या मुलाची आवड, कल ओळखण्यासाठी नंतर त्या दिशेने शिक्षण देण्यासाठी आजची आई धडपडत असते. प्रत्येकीचे मूल शिवराया एवढी उंची गाठत नसला तरी स्वतःच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करतात. आज प्रत्येक आई मुलासाठी हिरकणी असते. जेव्हा तिच्या अस्तित्वावर गदा येते तेव्हा ती दुर्गा बनते. त्यावेळी कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर ती कधी मूकपणे, तर कधी उघडपणे लढा देते. तिच्या परिवारावर संकट येते, तेव्हा एकटी एकहाती संसाराचा गाडा निर्भीडपणे पुढे हाकते याची असंख्य उदा. आहेत.

फारशा प्रसिद्ध नसलेल्या पण काही प्रेरणादायी महिला –
१. पारंपरिक पिकाचे शेकडो देशी वाण जतन करणाऱ्या राहिबाई पोपरे. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळने गावात एका संस्थेच्या मदतीने राहिबाईने बियांण बँक सुरू केली.
२. लिहिता-वाचता येत नव्हतं म्हणून माया खोडवे या कचरा वेचक महिलेने कॅमेरा हाती घेतला. सुरुवातीला स्वतःच्या, नंतर आजूबाजूच्या समस्या आणि आता समाजातले अनेक प्रश्न कॅमेराच्या साह्याने मांडत आहे.
३. भारतीयांचा लंडनमधील आधारवड – यवतमाळच्या खेड्यातील अडाणी, अशिक्षित पाच मुली असलेली आजीबाई वनारसे, पतीच्या अकाली निधनानंतर लंडनहून आलेल्या विधुर आजोबांशी पुनर्विवाह करून लंडनला गेल्या. नातवंडांना आजीच्या हातचे खाणे आवडले. आजोबाही गेल्यानंतर स्वतःच्या मुलींना बोलवून स्वतः तिथली भाषा, संस्कृती शिकून हाताला चव असल्याने खानावळ टाकली.

अरुणा ढेरे संपादित, त्यांच्या एका उपक्रमांतर्गत पद्मगंधा प्रकाशकाने ‘त्यांची झेप, त्यांचे आकाश’ या पुस्तकांत भारताच्या सांस्कृतिक उभारणीसाठी स्त्रियांचे योगदान, यांत विविध क्षेत्रांतील कर्तबगार स्त्रियांचा जीवनवेध लिहिला आहे. अनेक पातळ्यांवर संघर्ष करत पुढे जाणाऱ्या महिला ही आजची स्त्री शक्ती! आजची २१व्या शतकातील महिला कुणाहीपेक्षा कोणत्याही क्षेत्रांत कमी नाही. ती स्वतःची क्षमता ओळखते. ती स्वतःच्या पायावर उभी आहे. तिच्या प्रयत्नांत उद्याचा प्रवास आहे. शारदीय नवरात्रांत दुर्गा मातेला प्रणाम आणि स्त्री शक्तीला सलाम!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -