एकीकडे कुरेटिव्ह पिटीशन सुनावणीस सर्वोच्च न्यायालय राजी, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या सभेत उष्माघाताने तरुणाचा मृत्यू
नाशिक : सकल मराठा समाजासाठी रविवारचा दिवस एका बाजूला समाधानाची तर दुसऱ्या बाजूला वेदना देणारी बातमी घेऊन उजाडला. समाधानाची बातमी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कुरेटिव्ह पिटीशन दाखल केली होती. ही पिटीशन दाखल करून घेत सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी होकार दिला आहे. या बातमीनंतर सकल मराठा समाजातून समाधान व्यक्त केले जात असतानाच मराठा समाजाचा एक तरुण मृत झाल्याची बातमी येऊन धडकल्याने दुःख व्यक्त केले जात आहे.
अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या ३६ वर्षीय मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ही बातमी आहे. विलास पवार वय ३६ रा.गेवराई, जि. बीड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विलास पवार यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आले नसले तरी त्यांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा असा अंदाज आहे.