दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते. भारतीय इतिहासात भारतीय महिलांचे शौर्य अनन्यसाधारण आहे. या महिलांनी परकीय आक्रमणाला चोख उत्तर दिले.
राणी दुर्गावती
गोंडवानाची राणी दुर्गावती ही अफाट शौर्य असलेली बुद्धिमान आणि पराक्रमी योद्धा होती. पतीच्या मृत्यूनंतर तिने आपल्या मुलाच्या नावावर राज्य केले. जेव्हा मुघल सेनापती ख्वाजा अब्दुल मजीद असफ खानने आपल्या मोठ्या सैन्यासह तिच्या राज्यावर आक्रमण केले तेव्हा तिने शरण जाण्यास नकार दिला आणि गोंडवानासाठी लढण्याकरिता रणांगणावर गेली. ‘शत्रूला शरण येण्यापेक्षा मी स्वत:ला मारून टाकेन’ असे तिने जाहीर केले होते. अनेक जखमा होऊनही ती धैर्याने लढली. तिच्या शौर्याचा सन्मान म्हणून, तिची पुण्यतिथी ‘बलिदान दिवस’ म्हणून साजरी केली जाते.
वेलू नचियार
शिवगंगेची राणी, वेलू नचियार, कित्तूर आणि झाशीच्या राणींपूर्वी ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या पहिल्या महिला स्वातंत्र्य सेनानी होत्या. वीरमंगाई (शूर महिला) म्हणूनही त्या ओळखल्या जातात. तिला मार्शल आर्ट्स, घोडेस्वारी आणि धनुर्विद्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. फ्रेंच, इंग्रजी आणि उर्दू भाषाही तिला अवगत होत्या. तिच्या पतीचा ब्रिटिश सैन्याने खून केला. म्हैसूरचा सुलतान हैदर अलीकडे आश्रय घेतल्यानंतर तिने ब्रिटिशांवर हल्ला केला. जेव्हा तिची मुलगी इंग्रजांविरुद्धच्या लढाईत शहीद झाली, तेव्हा राणीने महिला सैन्याची स्थापना केली आणि तिचे नाव तिच्या नावावर ठेवले. तिची निर्भीडता आणि शौर्य आजही लोकांच्या स्मरणात आहे.
कित्तूरची राणी
कित्तूर चेन्नम्मा ही कर्नाटकातील कित्तूरची शासक होती आणि भारतातील ब्रिटिश राजवटीला विरोध करणारी राणी होती. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर, ब्रिटिशांनी तिचे राज्य ब्रिटिश साम्राज्यात जोडण्याचा प्रयत्न केला. तथापि, तिने विलीनीकरणास साफ नकार दिला. ब्रिटिश सैन्याशी तिने दोन हात केले. खूप लहान सैन्य असूनही तिने ब्रिटिश सैन्यावर हल्ले केले आणि लढाया जिंकल्या. मात्र शेवटी ती हरली. तिला तुरुंगात टाकण्यात आले, ज्या दरम्यान तिचे निधन झाले. तिच्या पराक्रमाच्या कथांनी अनेक महिला स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली.
झाशीची राणी लक्ष्मीबाई
झाशीची राणी लक्ष्मीबाई ही पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील एक लढवय्या योद्धा होती. एक निर्भय आणि उत्कट देशभक्त म्हणून इतिहासात तिचे स्थान आहे. पतीच्या मृत्यूनंतर, तिने ब्रिटिश साम्राज्यात झाशीला विलीन करण्यास नकार दिला. आपल्या राज्याच्या सार्वभौमत्वासाठी तिने हाती शस्त्र घेतले. हातात तलवार आणि पाठीवर तिचा दत्तक मुलगा घेऊन ती इतर क्रांतिकारकांमध्ये सामील झाली आणि मरेपर्यंत झाशीसाठी लढली. तिचे हे अतुलनीय शौर्य जगभरातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
राणी अब्बक्का
उल्लाल (मंगळूरुमधील एक शहर)ची शासक राणी अब्बक्का ही पहिली तुलुवा राणी होती आणि तिला ‘भारताची पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी’ म्हटले जाते. गोवा काबीज केल्यावर पोर्तुगीझांनी दक्षिणेकडे आपला मोर्चा वळवला. यावेळेस पोर्तुगीझांनी पहिले लक्ष्य उल्लाल राज्याला केले होते. राणी अब्बाक्का पोर्तुगीजांशी चार दशकांहून अधिक काळ लढली. तिला पकडल्यानंतरही तिने हार मानण्यास नकार दिला. स्वातंत्र्यासाठी लढताना तिला वीरमरण आले. तिच्या अतुलनीय शौर्यासाठी, तिला अजूनही निर्भय राणी म्हणून ओळखले जाते. तिच्या कथा विविध लोककथांमध्ये आणि दंतकथांमध्ये समाविष्ट केल्या आहेत.
महाराणी ताराबाई
महाराणी ताराबाई या मराठा साम्राज्याच्या महाराणी होत्या, त्यांच्या कथा दूरवर पसरल्या होत्या. या राणीने आपल्या जलद बुद्धिमत्तेने आणि युद्ध कौशल्याने पराक्रमी मुघल सम्राट औरंगजेबला गुडघे टेकवण्यास लावले. मराठा साम्राज्य जिंकण्याचे औरंगजेबाने वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न ताराबाईने पूर्ण होऊ दिले नाही. संभाजी आणि राजाराम यांच्या मृत्यूनंतर, ताराबाईने तिचा मुलगा, शिवाजी दुसरा यास राजा केले. तिची राजवट अत्यंत महत्त्वाची होती कारण तिने प्रतिकार केला नसता, तर मराठा साम्राज्य सहजपणे मुघलांच्या हाती लागले असते.
अहिल्याबाई होळकर
अहिल्याबाई होळकरांनी इंदूरवर ३० वर्षे राज्य केले. आपल्या तीन दशकांच्या राजवटीत अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या विकास कार्याने आणि परोपकाराने सर्वांची मने जिंकली. तिने हिंदू मंदिरांना अनेक देणग्या दिल्या आणि माळव्यातील अनेक किल्ले आणि रस्ते बांधण्याचे काम केले. भारतभर घाट, मंदिरे, टाक्या, विहिरी आणि विश्रामगृहे बांधण्यातही तिचे मोठे योगदान होते. एक आदर्श शासक म्हणून इतिहासात तिला मानाचे
स्थान आहे.
लक्ष्मी सहगल
लक्ष्मी सहगल या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारक होत्या आणि सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या अधिकारी होत्या. सिंगापूरमध्ये सुभाष बाबूंशी झालेली ही भेट तिला आझाद हिंद सैन्याची सैनिक बनण्यास प्रेरक ठरली. आझाद हिंद सेनेत ती कॅप्टन लक्ष्मी म्हणून ओळखली जात होती. तिने आझाद हिंद सेनेत झाशीची राणी रेजिमेंट नावाची महिला सैनिकांची तुकडी निर्माण केली. तिथून पुढे तिने मागे वळून पाहिले नाही. तिने प्रत्येक टप्प्यावर ब्रिटिशांशी लढा दिला. तिला बर्मामध्ये दोन वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते; परंतु तिने शौर्याने ब्रिटिशांचा प्रतिकार केला.
अझीझून बाई
१८३२ मध्ये एका गणिकेच्या पोटी जन्मलेल्या अझीझूनची आई लहान असतानाच वारली. एक तरुण गणिका म्हणून, अझीझून बाई कानपूरमधील उमराव बेगम यांच्या आश्रयाने लुरकी महलमध्ये राहत होत्या. १८५७च्या उठावादरम्यान, तिचे घर उठाव केलेल्या शिपायांसाठी भेटीचे ठिकाण बनले. तिने विद्रोहाला पाठिंबा देण्यासाठी महिलांचा स्वतःचा गट तयार केला, ज्यांनी सशस्त्र पुरुषांसाठी रॅली काढली, त्यांच्या जखमांवर लक्ष दिले आणि शस्त्रे आणि दारूगोळा वाटला. तिने पुरुषी पोशाख घातला आणि घोड्यावर स्वार होताना ती पिस्तूल वापरून लढली. तिने इतर महिलांनाही प्रशिक्षण दिले. तिने नानासाहेबांना कानपूरमध्ये विजय मिळवण्यास मदत केली. नंतर तिला बंडाची मुख्य योजनाकार म्हणून पकडण्यात आले आणि जनरल हॅवलॉककडे नेण्यात आले. तिच्या गुन्ह्यांची कबुली देण्यास सांगितल्यावर, तिने मुक्त होण्याचा प्रस्ताव धुडकावला आणि त्याऐवजी शहीद होणे पसंत केले. आपल्या देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या, लढणाऱ्या या साऱ्या वीरांगना भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या ‘लेडी बॉस’ ठरल्या.
theladybosspower@gmail.com
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…