नवी दिल्ली: भारताने विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धची आपली विजयी मालिका कायम राखली आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या विश्वचषक २०२३मधील सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेटनी हरवले.
हा पराभव पाकिस्तान संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर यांच्या पचनी पडलेला नाही. ते पराभवामुळे चांगलेच भडकलेत. त्यांनी या सामन्यानंतर बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. मिकीने म्हटले की ही आयसीसीची स्पर्धा आहे असं वाटत नाही तर बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटते आहे.
पाकिस्तानी क्रिकेट संघाचे डायरेक्टर मिकी आर्थर म्हणाले, खरं सांगायचं तर भारत वि पाकिस्तान हा सामना आयसीसीची स्पर्धा असल्यासारखा वाटत नाही. से वाटते की ही द्वीपक्षीय मालिका सुरू आहे. बीसीसीआयची स्पर्धा असल्यासारखे वाटत आहे.
असे मानले जात होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार टक्कर रंगेल मात्र असे झाले नाही. भारताने पाकिस्तानवर ७ विकेटनी एकतर्फी विजय मिळवला. जेव्हा मिकी आर्थरला विचारण्यात आले की विश्वचषकात पक्षपातपूर्ण माहोल असणे योग्य आहे आणि याला मंजुरी मिळायला हवी का? यावर त्यांनी सांगितले की मला नाही वाटतं की मी यावर काही कमेंट करायला हवी. मला स्वत:ला दंड लावून घ्यायचा नाही आहे.