ओंजळ: पल्लवी अष्टेकर
जीवनातील यश-अपयश आपल्या शैक्षणिक यशामध्ये तोलण्याची सवय बहुतांशी जणांची असते. अर्थातच शाळांमधले शिक्षणतज्ज्ञ हे प्रत्येक मुलाच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेले नसतात, कारण प्रत्यक्षात ही गोष्टं अशक्य आहे. शालेय परीक्षांपेक्षा फार मोठ्या परीक्षा आयुष्यात द्यायच्या असतात. त्यासाठी मनोबलाची गरज असते. हे मनोबल मुलांना त्यांच्या जडण-घडणीच्या वयात दिले पाहिजे. शालेय वर्षे ही मुलांची स्थापना वर्षे असतात आणि ते शाळेत जीवनाचे विविध पैलू शिकतात. ते जगण्याचे साधन, नातेसंबंधांचे जागतिक स्वरूप, मित्र, प्रेम व आदर यांचा अर्थ जाणून घेतात. शिक्षणाव्यतिरिक्त त्यांना खेळ व आरोग्य समजते. पण काही वेळा या अडचणींना कसे तोंड द्यायचे, हे ते शिकत नाहीत. याबाबत शालेय जीवनात जेमतेम उत्तीर्ण झालेले; परंतु आपल्या अंगभूत गुणांच्या माध्यमातून जीवनाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या काही महान विभूतींबद्दल या लेखात जाणून घेऊया.
एक प्रखर गणितज्ञ म्हणून रामानुजन जनमानसांत प्रसिद्ध आहेत. भारतातील तंजावर या संस्थानात, इरोड या गावी श्री. व सौ. श्रीनिवास अय्यंगार यांच्या पोटी रामानुजन यांचा जन्म झाला. तो दिवस होता, २२ डिसेंबर १८८७ चा. वडिलांचे नेकी, विश्वासूपणा व गणिती गुण रामानुजन यांच्यात उतरले. लहान वयातही रामानुजन आकड्यांच्या खेळात रमत. उंच झाडांच्या खाली उभे राहून त्यांची उंची किती असेल, दूरवरून जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपात किती मेंढ्या आहेत अशा सर्व नोंदी रामानुजन यांच्या मनात होत असत. सन १८९४ पासून रामानुजन यांच्या शालेय जीवनाला सुरुवात झाली. गणित विषय त्यांना फार आवडे. ते १९०३ या वर्षी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी गणितात उत्कृष्ट गुण मिळवले. रामानुजन यांनी पुढल्याच वर्षी कुंभकोणम् येथील शासकीय महाविद्यालयात नाव दाखल केले. त्यांनी गणित या विषयात शिष्यवृत्ती पटकाविली. त्यांचे सारे लक्ष गणितावरच केंद्रित झाले. इतर विषयातील दुर्लक्षामुळे त्यांना कॉलेजच्या पहिल्या वर्षात अपयश आले. त्याचा परिणाम म्हणजे इतरांच्या हेटाळणीने त्यांनी घर सोडले व काही काळ निरूद्देश भटकंती केली; परंतु काही दिवसांनी ते घरी परतले. मग घरच्यांनी त्यांना मद्रासला शिक्षणासाठी पाठविले; परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते पुन्हा घरी परतले. त्यांच्या एका मित्राने त्यांना ‘शास्त्रीय व प्रायोगिक गणित सूत्रसंग्रह’ हे पुस्तक भेट दिले. रामानुजन यांनी या पुस्तकातील उदाहरणे, सूत्रे, प्रमेये सोडविणे हे सुरू केले व त्याची त्यांना गोडी लागली. पुढे घरच्यांनी त्यांचा विवाह केला. ते मद्रास पोर्ट कमिशनर यांच्या सेवेत रुजू झाले. इथे नोकरीच्या फावल्या वेळात ते कागदावर गणितं सोडवायचे. तेव्हाचे कमिशनर फ्रॅन्सिस स्प्रिंग यांच्या लक्षात रामानुजन यांचे गणित वेड आले. यातून कमिशनर यांनी रामानुजन यांचा परिचय आल्फ्रेड वाॅकर या आपल्या मित्राशी करून दिला. वाॅकर तेव्हा केंब्रिजमध्ये गणित शिकवत होते. त्यांनी रामानुजन यांचे गणिती सूत्रे मांडलेले कागद पुढे आपल्या केंब्रिजमधील हार्डी या मित्राकडे पाठविले. त्यांना रामानुजन यांच्यातील गणिती वेगळेपण जाणविले.
हार्डी यांनी रामानुजन यांना ताबडतोब इंग्लंडला बोलावून घेतले. तेव्हाच रामानुजन यांनी ‘लंडन मॅथेमॅटिक सोसायटी’च्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेला लेखक एल. के. राॅजर्स यांचा लेख वाचला व त्यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरू केला. १९१७ मध्ये या गणितवेड्यांची भेट झाली व त्यातूनच नवे सिद्धांत मांडणारा ग्रंथ तयार झाला – ‘राॅजर्स रामानुजन आयडेंटिटीज्’. केंब्रिजमधील त्यांचा अभ्यासक्रम रामानुजन यांनी तीन वर्षांत पार पाडला. त्यांनी पुढे गणित विषयाला वाहिलेल्या अनेक नियतकालिकांतून लेख लिहिले. त्यांच्या गणिती बुद्धीची सर्वत्र प्रशंसा केली जाते. असाच एक कर्मयोगी शास्त्रज्ञ म्हणजे अल्बर्ट आईनस्टाईन. जर्मनीतील वुर्टेम्बर्ग प्रांतातल्या उल्म या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणी अल्बर्ट मंदबुद्धीचा आहे की काय अशी शंका त्याच्या पालकांना त्याच्या संदर्भातील विविध गोष्टींनी यायची. अल्बर्टची आई पाऊलिन ही मनाने कणखर व पिंडाने कलावंत होती. ती उत्तम पियानो वाजवे. कोणतंही काम करायला घेतल्यावर यशापयशाने विचलित न होता ते तडीस नेण्याचा गुण अल्बर्टने आपल्या आईकडून घेतला होता.
अल्बर्टचे वडील हर्मान यांना गणितात भरपूर गती होती; परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते फार शिकू शकले नाहीत. अल्बर्टच्या वडिलांनी वेगवेगळे व्यवसाय केले. अल्बर्टला लहान बहीण होती, तिचे नाव मारिया. अल्बर्ट वयाने वाढू लागला तशी त्याची अपेक्षित प्रगती होताना दिसत नव्हती. तो तीन वर्षांचा होईपर्यंत बोलतही नव्हता. वयाच्या ५व्या वर्षी अल्बर्टला घरी शिकवणीसाठी एक शिक्षिका ठेवली, पण दुसऱ्याने सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास करणे त्याला लहानपणापासून आवडत नसे. सन १८८८ मध्ये अल्बर्टने म्युनिक मधल्या लुईटपोल्ड जिम्नॅशियम या शाळेत प्रवेश घेतला. शाळेतील शिकवण्याची पद्धत त्याला रूक्ष व यांत्रिक वाटे. त्याला गणित व लॅटिन विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळत. पाठांतर व स्मरणशक्तीपेक्षा अल्बर्टचा भर मनन व चिंतन करण्यावर जास्त होता. अल्बर्टच्या घरी येणारा त्याचा मित्र मॅक्स टॅलमूड त्याला विज्ञानावरची उत्तम पुस्तके आणून देत असे. अल्बर्टच्या वडिलांनी लहानपणी त्याला आणून दिलेलं होकायंत्र पुढे त्याच्या वैज्ञानिक होण्याची नांदी ठरली.
१९०० साली अल्बर्ट उत्तम गुणांनी पदवीधर झाले. १९०१ मध्ये स्वीस नागरिकत्व मिळाल्यावर अल्बर्ट यांनी पेटंट ऑफिसमध्ये टेक्निकल कारकून म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरी करतानाच त्यांनी पाच शोधनिंबध सादर केले. त्यातील पहिले तीन उष्णता, वीज व प्रकाश या संदर्भातले होते, त्यापैकी एकात त्यांनी E=MC2 हे सूत्र शोधलं. या सूत्राद्वारे वस्तुमान व ऊर्जा यांचा एकमेकांत रूपांतर होऊ शकतं व सूक्ष्म आकाराच्या वस्तुमानाचं अफाट ऊर्जेत रूपांतर होऊ शकतं हे त्यांनी या सूत्राद्वारे सांगितलं. पुढे आईन्स्टाईन यांना फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या विषयात संशोधनाबद्दल १९२१ या वर्षातले नोबेल पारितोषिक मिळाले. धन्य हे लकाकते हिरे. आपले पाल्य-पालकांनी तणावरहित वाढविण्याचा प्रयत्न करून त्याच्यातील उपजत गुणांना वाव दिला पाहिजे.