Friday, October 4, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथन‘मन आनंदी, तर जीवन आनंदी’

‘मन आनंदी, तर जीवन आनंदी’

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

आमच्या महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग आहे. पण या विषयाच्या शेवटच्या पदवी परीक्षेच्या वर्षात विद्यार्थी मराठीतून उत्तरे लिहू शकत नाहीत. या कारणांचा शोध घेताना आढळले की, अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध नाहीत. तो अभ्यासता येईल इतकी पुरेशी पुस्तके नाहीत. अर्थात आमचे ग्रंथालय मोठे आहे. पण मुळात विद्यार्थ्यांकरिता मराठीतून मानसशास्त्रातून उपलब्ध पुस्तके खूप कमी आहेत. मानसशास्त्र हा आज कला शाखेत सर्वाधिक लोकप्रिय विषय आहे. अनेक मुले तो निवडण्यास उत्सुक असतात. कोरोनानंतरच्या काळात एकूण समाजात मानसशास्त्रविषयक अभ्यासाबाबतचा कल वाढतो आहे.

मानवी मनाविषयीचे चिंतन, संशोधन व त्याविषयीचा विचार मराठीतून समोर येत राहणे ही वाढती गरज आहे.‌ कारण अवतीभवतीचे ताण-तणाव वाढत आहेत. वैफल्य वाढते आहे. एकाकीपणा वाढतो आहे. अशा वेळी ‘मन आनंदी, तर जीवन आनंदी’ हे सूत्र घेऊन येणारे डॉ. श्रीरंग बखले यांचे पुस्तक प्रकाशित होणे याला निश्चित महत्त्व आहे. हे पुस्तक डॉक्टरांनी इंग्रजीत लिहिले व मुख्य म्हणजे त्याचा मराठीत अनुवाद व्हावा म्हणून त्यांच्यासकट वाचकही प्रयत्नशील राहिले. अतिशय बुद्धिमान व आपल्या रुग्णांना मनापासून वेळ देणारे डॉक्टर बखले मनोविकार शास्त्राचे व्यासंगी अभ्यासक तर आहेतच. पण आनंदी वृत्तीने जगणे कठीण नाही, हा विश्वास पेरत जाणारे व्यक्तिमत्त्व आहेत.

‘मनाचिये गुंती काय दडले आहे’ हे समजणे सोपे नाही कारण, सजगपणे मनोव्यापांचा शोध घेणेही सोपे नाही. उदाहरणार्थ भीती, राग, दु:ख या गोष्टी समजून घेण्याची निकड कुणाला वाटते? आपल्या भोवतालची परिस्थिती मनाला कशी घडवते? आयुष्यात आलेल्या शोकाच्या दु:खाचा सामना कसा करायचा? परिस्थितीवर मात करायची सवय मनाला कशी लावायची? मनाचं कुढणं, घुसमटत राहणं कसं संपवावं? असे अनेक विषय मनाशी संबंधित आहेत आणि यांतले प्रश्न नेहमीच आपल्याला अस्वस्थ करत आले आहेत, हे डॉक्टरांना जाणवते नि ते मानवी मनाच्या विविध पैलूंचा विचार करतात. मानसोपचार क्षेत्राशी गेली ३० वर्षं ते जोडलेले आहेत. संवेदनशील मनाचे डॉक्टर बखले आजारी पक्ष्यांवर उपचार करण्याच्या कामातही सहभागी होतात.

“चित्त स्थिर ठेवा” असे संतांनी आधीच म्हणून ठेवले आहे. पण आयुष्य जगताना हे स्थैर्य राखणे सोपे नाही, कारण जगताना सतत नियतीशी दोन हात करावे लागतात. याकरिताच मनाला सक्षम बनवावं लागतं. मनाबद्दल शिकणं आवश्यक ठरतं. छोटे-छोटे आनंद घेता येणं गरजेचं ठरतं. डॉक्टरांच्या चेंबूर येथील दवाखान्यात माझे जाणे होते ते त्यांच्या सुविद्य पत्नीमुळे. त्यांची पत्नी डॉ. वर्षा बखले याही डॉक्टर आहेत. दोघा पती-पत्नीचा ज्या भागात दवाखाना आहे, तो मराठमोळा मध्यमवर्गीय भाग आहे. सेवाव्रती डॉक्टर आज अभावानेच दिसतात. बखले पती-पत्नी हे या मालिकेतील डॉक्टर आहेत. अशा डॉक्टरांना नुसतं भेटणं हेच आनंददायी असतं, औषधोपचार ही पुढली गोष्ट झाली.शांत व आनंदी मनाची जडणघडण करायला अतिशय सहज नि कळत-नकळत शिकवणारे हे दाम्पत्य अनेकांना आनंद वाटत आहे.त्यांच्या विचारांचा रुजवा मराठीतून वाचायला मिळावा, हे तर फार मोठे समाधान आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -