क्राइम: ॲड. रिया करंजकर
सुरेश यादव यांनी प्रभाकर राजाध्यक्ष यांच्या मृत्यूनंतर आपण त्यांचे वारसदार आहोत यासाठी कोर्टामध्ये सक्सेशन पिटिशन दाखल केली. हे सुरेश याचा भाऊ सुरेंद्र याला समजले आणि त्याने या सक्सेशनला विरोध केला व आपल्याकडे प्रभाकर राजाध्यक्ष यांच्या बहिणीचं नम्रताचं विल असल्याचं त्याने कोर्टाला दाखल केले आणि इथूनच वादाला सुरुवात झाली. खरं तर राजाध्यक्ष यांची स्वत:च्या कमाईच्या मुंबई शहरामध्ये प्रॉपर्टी होती. हे दोन भाऊ आणि एक बहीण अशी ३ भावंडे होती. पण या तिन्ही भावंडांनी लग्न केलेली नव्हती. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर ही तीन भावंडे त्यांच्या मालमत्तेला वारस होती.
सुरेश यादव हा प्रभाकर राजाध्यक्ष यांची काळजी घेत होता. तो त्यांचा केअरटेकर होता. त्यांचा छोटा-मोठा खर्चही सुरेश यादव बघत होता. त्यामुळे प्रभाकर राजाध्यक्ष यांनी २०१६ मध्ये विल बनवली आणि त्यांच्या हिश्श्यात आलेली प्रॉपर्टी त्यांनी सुरेश याला मिळावी असं त्यात नमूद केलेलं होतं. तो त्यांची देखभाल आणि काळजी घेत आहे, त्यामुळे सुरेशला त्यांची प्रॉपर्टी मिळावी, अशी इच्छा त्यांनी आपल्या मृत्यूपत्रामध्ये व्यक्त केलेली होती आणि त्यात त्यांनी असे नमूद केलं होतं की, ‘या माझ्या प्रॉपर्टीला माझ्या रक्ताचं कोणी वारसदार नाही. ती माझ्या स्वकमाईतून घेतलेली आहे.’ कालांतराने २०१८ मध्ये प्रभाकर राजाध्यक्ष यांचा मृत्यू झाल्यानंतर सुरेश यादव यांनी ती प्रॉपर्टी मिळावी म्हणून हायकोर्टामध्ये सक्सेशन दाखल केलेलं होतं.
ही गोष्ट सुरेंद्र याला समजताच त्याने नम्रता राजाध्यक्ष ज्या प्रभाकर राजाध्यक्ष यांच्या बहीण होत्या. त्यांच्याकडून विल बनवून घेतली आणि त्यामध्ये नम्रता राजाध्यक्षांनी असं लिहिलेलं होतं की, ‘माझे आई-वडील दोघेही मृत्यू पावलेले आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीचे आम्ही तीन भावंडं वारसदार आहोत आणि आम्ही तिन्ही भावंडे अविवाहित असून माझ्या मोठ्या दोन भावांचा मृत्यू झालेला आहे व त्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीची मी एकटीच वारस आहे.’ ‘दोन भावांनी आणि मी आमच्या स्वकमाईतून प्रॉपर्टी जमा केलेली आहे; परंतु दोन भाऊ माझे रक्ताचे भाऊ असल्यामुळे त्यांच्या कमाईच्या प्रॉपर्टीची मी एकुलती एक वारस आहे. त्यामुळे सुरेश यादव यांनी त्यांच्या मृत भाऊ प्रभाकर राजाध्यक्ष यांचा प्रॉपर्टीचा वारसदार असल्याचं म्हणणं चुकीचं असून, तो प्रभाकर राजाध्यक्षांच्या प्रॉपर्टीचा वारस नाही, तर माझ्या भावाच्या प्रॉपर्टीची मीच वारसदार आहे’, असं त्यांनी नमूद केले.
तसेच त्यांनी असेही नमूद केले की, ‘माझी काळजी हा सुरेंद्र यादव घेत असल्यामुळे माझ्या सगळ्या भावांच्या प्रॉपर्टीची मी वारस असल्याने त्या सगळ्या प्रॉपर्टीचा अधिकार मी सुरेंद्र यादव याला देत आहे. त्यामुळे प्रभाकर राजाध्यक्ष याचा वारस हा सुरेश यादव नसून ती माझ्या भावाची प्रॉपर्टी असल्यामुळे ती आता माझी आहे. त्याच्या मृत्यूपश्चात त्यामुळे माझ्याकडे असलेल्या सर्व प्रॉपर्टीचा वारसदार हा सुरेंद्र यादव असणार आहे. कारण, तो माझी काळजी घेत (केअरटेकर) आहे आणि मला गरजेच्या वस्तू पुरवत आहे. त्याचप्रमाणे तो आमच्या बिल्डिंगमध्येही राहत आहे’ असं त्यांनी त्यात नमूद केलं. त्यामुळे सुरेश यादव यांनी सक्सेशनसाठी जो अर्ज केलेला आहे तो खारीज करण्यात यावा, असं त्यांनी हायकोर्टाला कळवलं.
नमूद दोन केअरटेकर हे सख्खे भाऊ असून आपल्या मालकाच्या प्रॉपर्टीसाठी आपापसात भांडत आहेत. नम्रता राजाध्यक्ष यांनी २०१८ मध्ये स्वतःची नवीन विल बनवून त्या सर्व प्रॉपर्टीला सुरेंद्र यादव वारस असल्याचे नमूद केलं; परंतु प्रभाकर राजाध्यक्ष यांनी २०१६ मध्ये विल बनवलेलं होतं व त्यात एकच प्रॉपर्टीचा उल्लेख करून ती त्यांच्या स्वकमाईची असून तीत त्यांनी सुरेंद्र यादव याला वारस म्हणून सांगितलेलं होतं.
प्रभाकर राजाध्यक्ष यांची विल ती बनवताना व्यवस्थित बनवलेली होती. त्याला प्रभाकर राजाध्यक्ष यांनी डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट लावलेलं; परंतु नम्रता राजाध्यक्ष यांनी डॉक्टरचे फिटनेस सर्टिफिकेट लावलेलं नव्हतं. त्यामुळे हा वाद आता कोर्टामध्ये चालू आहे. राजाध्यक्ष फॅमिलीने कष्ट करून स्वकमाईने आपली प्रॉपर्टी उभी केली आणि ती आता केअरटेकर यांच्या वादात अडकली आहे. कष्टाने कमवली कोणी आणि त्याच्यावर हक्क दाखवतोय कोण? अशी अवस्था त्या प्रॉपर्टीची झालेली आहे. (सत्यघटनेवर आधारित)